कल्याण मधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड नुकताच बंद करण्यात आलेला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील कचऱ्यासाठी एक वेगळे नियोजन देखील करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर आता सुशोभिकरण होऊन त्या जागेचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आहेत. आशा परिस्थितीत त्यांची बदली होऊ शकते अशी शंका समाज माध्यमांवर शहरवासीय करू लागले आहेत.
डॉ.विजय सुर्यवंशी क.डों.म.पा.चे आयुक्त झाल्या पासून त्यांनी अनेक गोष्टींची दखल गांभीर्याने घेत विविध प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता या महापालिका क्षेत्रात या अगोदरही येणारे नवे आयुक्त जोर लावून काम करताना दिसले होते. मात्र कुणी तरी आतून त्यांना दबाव टाकल्या सारखे ते अचानक थंड पडत आणि परिणामी त्यांची बदली होते असं शहरवासीय सोशल मीडियावर व्यक्त होतात. सध्याच्या आयुक्तांनी कोरोना काळात संपूर्ण मेहनत घेऊन परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. शहरात नगरसेवक महापौर ही पदे अस्तित्वात नसतानाही ते स्वतःच संपूर्ण जोर लावून काम करीत आहेत. त्यामुळे चांगल्या काम करणाऱ्या माणसांची बदली होते असा एक मानस या शहरातील जाणकारांच्या मनात आहे.
आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत महापालिका क्षेत्राला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले आहे. पत्रिपुल देखील त्यांच्याच काळात खुला झाला आहे. शहराच्या विकासासाठी लागणारी सौन्दर्यदृष्टी त्यांच्या कडे आहे असे काही राजकीय पक्षातील मंडळीचे देखील म्हणणे आहे. याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात करावयाच्या उपाययोजना देखील त्यांनी सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्यांची खरोखरच बदली झाली तर ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दुर्भाग्यची बाब ठरेल यात शंका नाही. जर प्रशासनाला या परिस्थितीत त्यांची बदली करणे योग्य वाटले तर ती विनाशकालीन विपरीत बुद्धी ठरणार यात शंका नाही.