कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण डोंबिवली भागात ८३.५ मीमी पावसाची नोंद ; पालिका आयुक्तांची दिवसभर कंट्रोल रूममध्ये निगराणी

परवा रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. काल दुपारी १२ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात ८३.५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सुनील पवार यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागक्षेत्र अधिका-यांनी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवुन आपापल्या मनुष्य बळाच्या सहायाने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. यामध्ये कल्याण (प) छ. शिवाजी महाराज चौक, कल्याण पूर्व मधील दामोदर नगर, डोंबिवली पूर्व स्थानक परिसर येथील सखल भागात साचलेले पाणी मनुष्यबळ लावून, मॅनहोल चेंबर साफ करून त्याचप्रमाणे जेसीबी चा वापर करुन पाण्याचा निचरा करण्यात आला. धोकादायक इमारती कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून सदर इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ‘ड’ प्रभागातील २ अतिधोकादायक इमारतीमधील २८ नागरिक स्थलांतरीत करण्यात आले. ‘ह’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैंकी १५ इमारती रहिवासमुक्त करण्यात आल्या. त्यापैकी ५ इमारती रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘ग’ प्रभागातील २० अतिधोकादायक इमारतीपैकी १२ इमारती रहिवासमुक्त केल्या व ८ इमारतीचे रहिवासमुक्त करण्याचे काम सुरु होते. ‘अ’ प्रभागात १ अतिधोकादायक इमारत असून सदर इमारत रहिवास मुक्त करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका क्षेत्रातील २०१ प्रमुख ठिकाणी कार्यान्वित असलेल्या ५५१ सीसीटीव्‍ही कॅमे-याचा माध्यमातून पाणी साचण्याच्या जागा अवलोकून महापालिका आयुक्तांनी तेथील समस्यांचे निराकारण करणेबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *