कल्याण :- मागील काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग व जोशीबाग परिसरात मोठ्या प्रमाणात साप व घोरपड आढळून येत आहेत. याच भागात मच्छी मार्केट आणि पोलीस वसाहतीच्या पडीक खोल्या असल्याने यांचा वावर असावा असा तर्क लावला जात आहे. नेहमीच साप आणि घोरपड दृष्टी क्षेपात येते असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मागील आठवड्यात या परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र सतीश बोबडे यांनी घोरपड पकडल्या असून एक घोरपड चार फुटाची दुसरी घोरपड दीड फुटाची आहे. परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घोरपड शिरल्याची माहिती सतीश बोबडे यांना मिळताच त्यांनी दोन्ही घोरपडी पकडून वन विभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे.
सर्पमित्र सतीश बोबडे यांच्या माहितीनुसार स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये लोकवस्ती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून यामध्ये सरपटणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाढ झाली आहे. तेथूनच हे घोरपड व साप लोकवस्तीमध्ये येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेहमीच या भागात स्वच्छता आणि औषध फवारणी केल्यास वन्यजीव प्राण्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल.
-रोशन उबाळे