कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने मरगळ झटकत काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.
स्थानिक पातळीवर पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कमकुवत असलेली काँगेस स्वबळावर लढून किती जागा निवडून घेऊन येईल या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात सेना राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस कल्याण डोंबिवलीत मात्र स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत १२२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत काँग्रेसचे फक्त ४ नगरसेवक निवडून आले होते.

महापालिकेत आयुक्तांना नागरी प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेवक रवी पाटील, कल्याण पूर्व अध्यक्ष शकील शेख आदी बरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरवस्था, अपुरा पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन कर, वाहतूक कोंडी, बी.एस.यु.पी घरे, कचोरे येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी, स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या प्रकल्पा तसेच शहरातील वाढते प्रदूषण या बाबत निवेदन देण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे
