कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका महिलेला व तिच्या दोन मित्रांना रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास उशीर होत असल्यावरून स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याला धारेवर धरले आहे.
रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षा प्रवास करीत होती. दरम्यान रिक्षा चालकाने तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे. त्या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे तरुण रिक्षाचालकाला जाब विचारत होते. मात्र यादरम्यान रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने त्या महिलेला व तिच्या दोन्ही मित्रांना अमानुषपणे मारहाण केली. शिवाय एका व्यक्तीने पट्टा काढून त्याने मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्थानीक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या माणसावरच तक्रार दाखल करतात. मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड काढला तर लक्षात येईल की या पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट अधिक प्रमाणात आहेत. दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोघांना अटक करायची व नंतर तोडपाणी करून त्यांना सोडून द्यायचे. पोलिसांच्या या धोरणामुळे या भागात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”
– गणपत गायकवाड (स्थानिक आमदार)
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला असून त्यांनी या बाबत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
-संतोष दिवाडकर