गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. हा उत्सव आणखी द्वीगुणीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणपती उत्सवादरम्यान शैक्षणिक साहित्यांची आरास केली जाते. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मखरातील सजावटीचे शैक्षणिक साहित्य आणि काही गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.
दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अशाच दुर्गम भागातील तुंगारेश्वर पर्वतरांगेतील,तालुका भिवंडी येथील जि.प.शाळा पालिवली येथील आदिवाशी पाड्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सदरील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक साहित्याची मखर सजावट आणि याच शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना येथील काही शिक्षकांनाही आवडली असून तेही आपल्या घरगुती गणेशोत्सव काळात राबवत आहेत. यावेळी सर्व पक्षिय युवा संघटनेचे प्रमुख संघटक तथा शिक्षणप्रेमी गणेश पाटील, गजानन पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, मंगेश खुटारकर, युवराज पाटील आदी जण उपस्थित होते.
-कुणाल म्हात्रे

