कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवलीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं शर्मिला ठाकरेंनी केलं लोकार्पण; भाजप आमदारांच्या उपस्थितीवर बोलले मनसे आमदार

१५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पार पडले. या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनीही भेट दिल्याने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. आणि याबाबत मनसे आमदारांना राजू पाटील यांना सवाल केला असता त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच काळात महाराष्ट्रातील आणखी काही महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत. अश्या परिस्थितीत मनसे आणि भाजपा या दोन पक्षात युती होण्याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, मनसे आमदार राजू पाटील यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र मनसेच्या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील भेट दिली होती. याबाबत हे युतीचे संकेत आहेत का ? असा सवाल माध्यमांनी मनसे आमदार राजू पाटील यांना केला होता. यावर बोलताना त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे भाजप युती वगैरे असे काही नाहीये. त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. ते पण आम्हाला निमंत्रण देतात तसे आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. युती बाबत पक्षप्रमुख राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यानुसार आमचे काम सुरू केले आहे.

राजू पाटील (आमदार,मनसे)

क.डों.म.पा. च्या नगरसेवकांचा कार्यकाळ हा २०२० मध्येच संपला आहे. त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका खूपच लांबणीवर पडल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई, पुण्यासह आणखी इतर मोठ्या महानगरपालिका निवडणुका होणार असून क.डों.म.पा. देखील तेव्हाच होण्याची शक्यता आहे. व त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीत विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. २००९ साली पदार्पणातच मनसेने स्वबळावर २६ जागा मिळवत विरोधीपक्ष नेतेपद भूषवले होते. यावेळी मनसेला ना भूतो ना भविष्यती असे मतदान झाले होते. पुढे मनसेची हवा कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मनसेची पराभव मालिका सुरू झाली.

क.डों.म.पा. क्षेत्रात मनसेने २०१५च्या महापालिका निवडणुकीत १० जागा जिंकल्या. शिवसेना भाजपा युती कायम असल्याने पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद मनसेला मिळाले. त्यात आता मनसेचा आमदार देखील याच महापालिका क्षेत्रात असल्याने मनसेला आणखीन बळ प्राप्त झाले आहे. यात भरीस भर भाजपा युती झाली तर मात्र इंजिनाचा करिश्मा कल्याण डोंबिवलीत दिसू शकतो असे जाणकार मंडळी म्हणत आहेत.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *