डोंबिवली : हिरकणी प्रतिष्ठानचा सायकल रॅलीचा उपक्रम अतिशय अभिमानास्पद आहे. असे उदगार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हिरकणी प्रतिष्ठान व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विदयमाने डोंबिवली पूर्व येथील कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकापासून महिलांच्या “सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले आणि या सायकल रॅलीस शुभेच्छा दिल्या. या सायकल रॅलीत भर पावसातही सुमारे ७५ महिलांनी आपापल्या सायकलींसह अत्यंत उत्साहात आपला सहभाग दर्शविला होता. या रॅलीमध्ये महिलांसमवेत लहान मुलींची देखील उपस्थिती लक्षणिय होती.
रॅलीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कॅ. विनयकुमार सच्चान स्मारकास पुष्पांजली वाहिली. यावेळी महापालिका आयुक्त तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर देवदत्त रोकडे, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत, कार्यक्रमाचे नोडल ऑफिसर संजय जाधव व इतर मान्यवरांचा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलेखा गटकळ व सचिव पूजा तोतला यांच्याहस्ते फुलांचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: उपस्थित राहून रॅलीमधील महिलांना शुभेच्छा दिल्यामुळे आमचा उत्साह व हुरुप द्विगुणित झाला असे भावोद्गार हिरकणी प्रतिष्ठानच्या सचिव पूजा तोतला यांनी यावेळी व्यक्त केले.
-कुणाल म्हात्रे