कल्याण-डोंबिवली घडामोडी

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयाला एक वर्ष पूर्ण; पालिका आयुक्तांचं आभार प्रदर्शन

नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी, सर्वांनी अशाप्रकारे एकत्र येवून काम केलं, तर काय होऊ शकतं याचं उत्कृष्ठ उदाहरण म्हणजेच डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय होय, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले.

कोविडच्या पहिल्या लाटेत कोविड हॉस्पिटल ही संकल्पना सगळयांसाठी नविन होती, त्यामुळे डोंबिवली जिमखाना बॉस्केटबॉल मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी हे एक आश्चर्यच आहे. त्यामुळे ज्यांनी हे रुग्णालय उभारले त्यांचा सत्कार करणे अत्यावश्यक आहे. महापालिका कर्मचारी/अधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व महापालिकेला मदत करणारी डॉक्टर्स आर्मी यांनी झोकुन देवून केलेल्या कामामुळे महापालिकेला ” कोविड इन्हावेशन अवार्ड” सारखा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला, याचा उल्लेख आपल्या भाषणात करीत आयुक्तांनी कोविडसाठी मदत करणा-या सर्वांचेच आभार आपल्या भाषणात मानले.

आयुक्तांनी दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे सर्वांनी मिळून आपत्तीतून निभावून नेलं आणि यापुढेही निभावून नेतील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. तात्पुरत्या स्वरुपातील कोविड रुग्णालय उभारण्याचा अजिबात अनुभव नसतांना सर्वत्र पाहणी करुन, माहिती घेवून हे रुग्णालय उभारले, अशी माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी दिली. जिमखाना कोविड रुग्णालय चालविणा-या ओमसाई केअरचे डॉ. साहिल शेख यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले.

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयात प्रारंभी 122 बेडची संख्या उपलब्ध होती. त्यामध्ये 70 आयसीयू बेडस्, 3 डायलेसिस बेडस् आणि उर्वरित बेडस् ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. कोविडच्या दुस-या लाटेत कोविड रुग्णांची संख्या अचानक वाढली. दरम्यानच्या काळात सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या पत्नी टाटा आमंत्रातील उत्कृष्ठ व विनामुल्य उपचाराअंती ब-या झाल्यामुळे विजय भोसले यांनी जिमखाना कोविड रुग्णांसाठी 10 बेडस्, 10 गादया व 10 उशांची उपलब्धता करुन दिली. त्यामुळे आता जिमखान्यामध्ये एकुण132 बेडस् रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

आतापर्यंत 3747 रुग्णांनी जिमखाना रुग्णालयात उपचार घेतले आहेत. जिमखाना कोविड रुग्णालय पूर्णपणे वातानुकुलित असून तिथे निगेटिव्ह प्रेशरची सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच वातानुकुलनाची हवा रिसायकल न होता नविन हवेचा पुरवठा सतत होत असतो. सद्यस्थितीत एकुण 63 कोविड रुग्ण जिमखाना कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कोविड रुग्णालयात प्रामुख्याने क्रिटीकल पेशंट दाखल केले जात असून , डायलेसिसची उपलब्धता असल्याने नागरिकांची चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.

डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालय वर्षपूर्ती निमित्त जिमखान्याचे सचिव महेंद्र मोकाशी, माजी अध्यक्ष दिपक मेजारी, ऑक्सिजन पुरवठादार भाऊ चौधरी, महापालिकेचे डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. समिर सरवणकर तसेच डॉ. प्रशांत पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिमखाना कोविड रुग्णालयासाठी सर्वत्तोपरी मदत करणा-या इतर संस्था इतकेच नव्हे तर या रुग्णालयात काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग/महापालिका अधिकारी वर्ग यांचा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आयुक्तांनी स्वतः सत्कार केल्यामुळे कोविडच्या बिकट कालावधीत रुग्णसेवा करणा-या कर्मचारी वर्गाच्या चेह-यावरील सार्थ अभिमान व आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. या समयी अतिरीक्त आयुक्त सुनील पवार, डोंबिवली जिमखानाचे महेंद्र मोकाशी, उपायुक्त सुधाकर जगताप, उपायुक्त रामदास कोकरे, आयएमए कल्याणचे अध्यक्ष प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पाटील व्यास पीठावर उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिमखाना कोविड रुग्णालयाच्या मॅनेजर तथा उप अभियंता रोहिणी लोकरे यांनी केले.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *