डोंबिवली :- ताडीचे सेवन केल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. कोपर भागात राहणाऱ्या सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके या तरुणांचा यात मृत्यू झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे.
विषारी ताडीमुळे हा मृत्यू झाल्याची आधी चर्चा होती मात्र ताडीच्या अतिसेवनामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना डॉक्टरांकडून मिळाली आहे. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता. सचिन आणि स्वप्नील हे दोघे मित्र सोमवारी सायंकाळी आपल्या आणखी दोन मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरमध्ये ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन आणि स्वप्नील घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला.
ताडी पिऊन इतर दोघांची तब्येत सुद्धा खालावली होती, मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन केले असता ताडीचे अति सेवन केल्यामुळे त्यांना झोप लागली आणि त्यात त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.
-संतोष दिवाडकर