दुर्बुद्धी सुचली आणि डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे रुळावर मांडली दगडं
डोंबिवली व ठाकुर्ली स्थानका दरम्यान गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे रुळावर कोणीतरी भरपूर दगड मांडून ठेवल्याचे सुरुवातीला निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हे दगड बाजूला केले. हे कृत्य कुणी केले याबाबत सुरुवातीला मात्र पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती.
गुरुवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास रेल्वेच्या ट्रॅकवर १५-२० दगड ठेवल्याचे आढळले होते. आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्तर यांनी घटनेचे परीक्षण केले. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीगार वापरून तांत्रिक शोध घेत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराच्या मदतीने डोक्यात दुर्बुद्धी आली म्हणून खोडसाळपणाने त्याने असे केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्याच्या या खेळामुळे मोठा अनर्थ देखील होऊ शकला असता. त्यामुळेच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला असून दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. या अगोदर रेल्वेवर खोडसाळपणे दगडफेक केली जात होती मात्र आता चक्क रुळाखालची दगडीच रुळावर मांडल्याने खळबळ माजली आहे.

स्टेशन मास्तरांनी स्लॉ डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवली असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्टर अशा सर्वांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रॅक खाली लहान मोठी दगडं असतात. असे १५-२० दगडं त्यावेळी ट्रॅकवर होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी तपासादरम्यान परिसरातील फुटेज काढल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. हा आरोपी अल्पवयीन आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. इतर आरोपी सापडल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येईल.
– मुकेश ढगे (पोलीस निरीक्षक)
-संतोष दिवाडकर


