कल्याण-डोंबिवली घडामोडी

पगार न मिळाल्याने केडीएमसी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर चौकात कामगारांनी एकत्र येऊन कचरा गाड्या रस्त्यावर उभ्या करत कचरा उचलण्यास नकार दिला. केडीएमसीमध्ये घंटागाड्यांवर  सुमारे २५० कामगार काम करत असून त्यापैकी ५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. तर याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास उद्या हे आंदोलन चिघळण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

       कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रातील ३ प्रभागात खासगी कंत्राटदारामार्फत कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देण्यासह अर्धवट पगार मिळत असल्याचे सांगत आज सकाळी या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले. कल्याण पश्चिमेतील या ३ प्रभागातील कचरा न उचलता त्याशेजारी कचऱ्याच्या गाड्या नेऊन उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे तिन्ही प्रभागात सकाळपासून रस्त्यावर कचरा तसाच पडलेला होता.

       महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *