कल्याण : गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
ओमायक्रॉन विषाणूचा परदेशात झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात जोखमीच्या देशातून म्हणजेच युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोटस्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बॉबे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्रायल या व शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या इतर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व नागरिकांनी भारतात परतल्यानंतर आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा लोकांना ७ दिवस घरी विलगीकरणात राहायचे आहे. व ८ दिवसांनी पुन्हा तपासणी करायची आहे आणि त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील ७ दिवस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायचे आहे.
परंतू जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येईल व त्यातुन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील उपचाराची रुपरेषा निश्चीत केली जाईल. यामधून ५ वर्षाखालील मुलांना वगळण्यात येत आहे, परंतू जर त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर मात्र त्यांची आरटी पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील.
परदेशातील काही देशात ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीया या देशातून काही दिवसापूर्वी भारतात आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची आरटी पीसीआर चाचणी केली असता ती निगेटिव्ह आढळून आली, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
या नविन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसात परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेस कळवावी त्याचप्रमाणे स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट महानगरपालिकेच्या चाचणी केंद्रातून करुन घ्यावी. तसेच महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटयांनी देखील आपल्या गृहसंकुलात गेल्या १० दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास किंवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे