कल्याण :- इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे.
कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास ही सुरक्षित राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी धाक दाखवून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले ६ जणांचे पैसे रोकड आणि १० जणांचे मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशा सोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या २० वर्षीय प्रवासी पत्नीची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.
कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालि त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.
मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे मनोज पाटील (रेल्वे डीसीपी) यांनी सांगितले आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून उर्वरित आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
-रोशन उबाळे