दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास कल्याण तहसील कार्यलयाच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्यशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व तलाठ्यांना दिले आहेत. त्यानुसार आजपासून पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
कल्याण मधील उंबर्डे, सापर्डे, बारावे, योगीधाम, भवानीनगर, शहाड, बंदरपाडा, वडवली, अटाळी, आंबिवली, म्हारळ, कांबा, वालधुनी आदी परिसरातील आधी घरांमध्ये पाणी शिरलेल्याचे पंचनामे करण्यात येणार असून त्यानंतर शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे