शिक्षकांना दिलेले बी.एल.ओ चे आदेश रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांकडे केली असून शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि बी.एल.ओ.चे काम असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववीचे गुण व इयत्ता दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाचे काम शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविल्याने निकाल तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यातच विधानसभा क्षेत्र १४२ मतदार संघातील शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामाचे आदेश काढण्यात आले आहेत. शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती, दुबार, मयत, स्थलांतरित, छायाचित्र चिटकवणे नोटिसा बजावणे इत्यादी कामे करण्याकरिता आदेश काढण्यात आले आहेत.
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील व इतर पदाधिकारी ए.व्ही. पाटील, आप्पाराव कदम यांनी विधानसभा क्षेत्र १४२ चे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदनाद्वारे बी.एल.ओ.चे आदेश रद्द करण्याची मागणी केली.
-कुणाल म्हात्रे