डोंबिवली :- डोंबिवलीतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशा नंतर मंचावर भाषण करण्यासाठी माजी नगरसेवक महेश पाटील यांना संधी दिली गेली. मात्र भाषणा दरम्यान महेश पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण मंचावर हश्या पसरला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नव्हते.
सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी सायली विचारे, सुनीता पाटील आणि महेश पाटील या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान महेश पाटील हे भाषण करीत होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीने भारावून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे असे अनवधानाने ते बोलून गेले. मात्र उजव्या बाजूला बसलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी चटकन चूक लक्षात आणून दिली. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी देखील चुकीचा शब्द पकडला. महेश पाटील यांच्या डाव्या बाजूला पालकमंत्री एकनाथ शिंदे मोबाईल पाहत असताना त्यांचेही लक्ष चुकीच्या वाक्याने वेधले गेले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना हसू आवरता आले नाही. सर्वत्र हास्याची लाट उसळली. यानंतर महेश पाटील यांनी वाक्याची दुरूस्ती करीत मला ते सवयीचे आहे असे म्हणत आणखीन एक विनोद केला. सध्या ही व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
क.डों.म.पा. ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने पक्षप्रवेश आणि राजकीय उलथापालथ शहरात सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुमचा नगरसेवक कोणत्या पक्षातून येणारी निवडणूक लढवणार आहे हे कदाचित तुम्ही देखील सांगू शकणार नाही.
-संतोष दिवाडकर