मलंगगड भागातील कुशिवली नदीच्या डोहात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. मागील दीड महिन्यातील बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. या अगोदर चार लोकांचा बळी गेला होता व त्यानंतर आता आणखी एकाला जलसमाधी मिळाली आहे.
डोंबिवली सागाव मधील हा तरुण या ठिकाणी विकेंड निमित्त पर्यटनासाठी आला होता. याचदरम्यान नदीपात्रात पाय घसरून त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने या तरुणाचा बुडून झाल्याचे सांगण्यात येते. विवेक मेहरा असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या एका मित्रासह या ठिकाणी आला होता. दोघेजण विकेंडचा आनंद घेण्यास आले होते मात्र त्यांचा हा आनंद दुःखात परिवर्तित झाला. डोहात बुडून या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. यानंतर हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे मलंगगड भागात या वर्षी मृत्यूंची शृंखला सुरू असल्याचे दिसत आहे. या अगोदर याच भागातील दोन स्थानिक नाबालिकांचा नेवाळी जवळील तलावात बुडून मृत्यू झाला होता. व त्यानंतर कल्याण पूर्वेतील दोन तरुणांचा बंधारा भागात बुडून मृत्यू झाला होता. या दोन घटनांत चार जणांनी प्राण गमावले होते. व त्यानंतर आज अशाचप्रकारची ही तिसरी घटना समोर आली आहे. यामुळे ही मालिका थांबवावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-संतोष दिवाडकर
