कल्याण-डोंबिवली घडामोडी

मागवला लॅपटॉप आणि आलं भलतंच; ऑनलाइन शॉपिंग पडली महागात

कल्याण :- पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात राहणारे अनिल शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर जाहिरात पाहून एका लिंकवर क्लिक करून एक नॉटपॅड लॅपटॉप ऑर्डर केला. पुढील काही दिवसांनी कुरियरद्वारे त्यांना पार्सल मिळाले आणि त्यांनी अडीच हजार रुपये कुरियर वाल्याला दिले. मात्र पार्सल उघडून पाहिले असता त्यात लॅपटॉप ऐवजी बंद पडलेला पॉवर बँक देण्यात आला होता.

अलिकडल्या काळात डिजिटल ऑनलाइन व्यवहार आणि शॉपिंग मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे तंत्रज्ञानाची माहिती घेऊन काही स्मार्ट लुटेरे ऑनलाइन स्केम करीत आहेत. अनिल शिंदे यांना फेसबुकवर अडीच हजारात लॅपटॉप मिळण्याची एक जाहिरात दिसली होती. घरातील मुलांना वापरण्यासाठी म्हणून त्यांनी ती वस्तू मागवली देखील. मात्र वस्तू घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील एका लहानग्याला कमी पैशातल्या लॅपटॉपबाबत शंका आली. वजनाने बॉक्स हलका लागल्याने त्याने व्हिडीओ केमेरा सुरू करून पार्सल उघडले. पार्सल उघडल्या नंतर त्यातून भरपूर पुठ्ठे आणि कागद बाहेर निघाले. व त्यानंतर एका कागदात त्याला जुना बंद असलेला पॉवर बँक आढळून आला. हा व्हडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.

‘शॉपिफाय’ नामक एका वेबसाईटवर आपले ऑनलाइन दुकान बनवून आपण त्यावर आपले प्रोडक्ट विकू शकतो. मात्र याच नावाचा वापर करून एका ऑनलाइन स्केमरने ‘माय शॉपिफाय’ नावाची बनावट वेबसाईट बनवली. या वेबसाईटवर एक सबडोमेन दिसून आले. ज्यात कमी पैशात लॅपटॉप विक्रीसाठी आहेत. याच ठिकाणाहुन दाखवलेल्या आमिषाला भुलून शिंदे यांनी वस्तू मागवली होती. मात्र अज्ञात स्केमरने त्यांची फसवणूक केली.

ऑनलाइन व्यवहार करताना कसे सतर्क रहावे याबाबत वारंवार बँके कडून जनजागृती केली जाते. त्यामुळे आता ऑनलाइन शॉपिंगच्या मार्फत घोटाळे करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दररोज समाज माध्यमांवर गिफ्ट, वस्तू अथवा पैशांचे अमिश दाखवून लिंक व्हायरल केल्या जातात. याच व्हायरल झालेल्या लिंकद्वारे अनेक लोकांची फसगत होते. ज्यात अनेकदा फ्लिपकार्ट, अमेझॉनचा लोगो वापरण्यात येतो. मात्र त्या साईटचा वेब अड्रेस (स्पेलिंग सहित) नक्की बरोबर आहे का ? ती वेबसाईट खरी आहे का ? याची अगोदर खात्री करून घ्यायला हवी. जर संपूर्ण खात्री असेल तरच ऑनलाइन व्यवहार अथवा शॉपिंग करावी.

-संतोष दिवाडकर

पार्सल उघडतानाचा व्हडीओ

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *