मुरबाड :- राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा तर नगर विकास मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचेच असतानाही प्रत्येक वेळी मीच निधी आणला अशी थाप मारणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत सेनेच्या प्रचार सभेत मतदारांना केले आहे.
मुरबाड नगरपंचायतीच्या १७ पैकी १३ जागांवर निवडणुका होत असुन ही लढत अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेत होत आहे. भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत, तर सेनेने दहा ठिकाणी भाजपा विरोधात दंड थोपटले आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक भाजप सेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, पालक मंत्री एकनाथ शिंदे, प्रमोद हिंदुराव, सुभाष पवार असे सर्व दिग्गज नेते रणांगणात उतरले आहेत.
भाजप हा थापाड्यांचा पक्ष आहे. मुरबाडच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी निधी पुरवला, मात्र काहीजण हे श्रेय लाटत असुन त्याच्या पाट्या लावत आहेत. अशी टीका यावेळी प्रकाश पाटील, सुभाष पवार आणि पुष्पा पाटील यांनी स्थानिक आमदारांचे नाव न घेता केली. महागाईने गरीबांचे कंबरडे मोडले असुन पंधरा लाख रुपये कुठे आहेत? असा सवालही प्रकाश पाटील यांनी यावेळी शिवसेनेच्या प्रचार सभेत उपस्थित केला.
मुरबाड नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून १७ पैकी १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर उर्वरित ४ प्रभागातील निवडणूक ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी १३, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ७, काँग्रेस ७, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ३ तर इतर घटक पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
-निलेश अहिरे