कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अश्या परिस्थितीत रुग्णांना इंजेक्शन पासून बेड पर्यंत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी वेकसिनेशन होणे खूप गरजेचे आहे. याकरिता राज्यभरात पातळी पातळीवर लसीकरण केंद्र उभारावीत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
राजू पाटील यांनी पत्राद्वारे केलेली मागणी :-
केंद्र सरकारने दिनांक १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला राज्यातच हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिलेली आहे. व आता राज्यांनाही थेट उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याला कोरोना लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल अशी शक्यता असून लसीकरणही वेगाने होईल. परंतु राज्य सरकारने त्यासाठी युद्धपातळीवर पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा,तालुका व अगदी ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण हाती घ्यावे लागेल. या लसीकरणकेंद्रांचा जिल्हा, महानगरपालिका, तालुका पातळीवर संयुक्त डॅशबोर्ड तयार करावा व लस उपलब्धतेबाबत माहिती उपलब्ध करुन प्रत्येक तासाला सोशल मिडियासह विविध चॅनलवर द्यावी. तसेच ज्या व्यक्तीने लसीसाठी नाव रजिस्टर केले असेल त्यालाही द्यावी. जेणेकरुन त्याचाही वेळ वाचेल व लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
कोरोना महामारीमध्ये कोविड सेंटर, रुग्णालये महत्त्वाची आहेतच परंतु त्याच बरोबर लसीकरणही तेवढेच वेगवान केल्यास कोरोनाच्या संकाटावर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी राज्यात लसीकरण गतीमान करण्यासाठी आधीच पूर्वतयारी व नियोजन केल्यास खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये ‘लस उत्सव’ साजरा होऊ शकतो. तरी कृपया आपण राज्यभरात जिल्हा, तालुका, महानगरपालिका व ग्राम स्तरावर नवीन लसीकरण केंद्रे उघडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.
