कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राजकीय पक्ष आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता केल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या प्रभागात कोरोनामुक्तीसाठी जोमाने काम करायचे आहे असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई व कार्याध्यक्ष उदय जाधव यांच्यावतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नियुक्तीपद वाटप कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी येथील माळी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सरचिटणीस प्रशांत माळी, विधानसभा युवक अध्यक्ष योगेश माळी, ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे, क प्रभाग अध्यक्ष दिनेश परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमेतील सर्व वार्डचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाची तिसरी लाट येत असून यापासून बचावासाठी कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करून प्रभागातील नागरिकांचे देखील कोरोनापासून रक्षण करा. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे, यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियम पाळा असा सल्ला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेल्या पुरस्कारात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा देखील वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तर आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढवतील असेही सांगितले.
-कुणाल म्हात्रे