कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.
आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.