विठ्ठलवाडी :- महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी एसटी कामगारांकडून सध्या संप पुकारला गेला आहे. या संपात आता विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचारी देखील उतरले आहेत. दरम्यान आज आगाराबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपाची घोषणा करीत निदर्शने केली.
एसटी म्हणजेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच एसटीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या हलाखीचे जीवन काढावे लागत आहे. अगदी कमी पैशात या कर्मचार्यांना राबवून घेत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी हाल अपेष्टा कर्मचारी सहन करीत आहेत. त्यात विलीनीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने शासना विरोधात कामगारांनी महाराष्ट्रभरात संप पुकारला आहे.
रविवार दि. ७ नोव्हेंबर पासून विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील या संपात उडी घेतली आहे. कर्मचाऱ्यांकडून एसटी आगाराबाहेर निदर्शने करण्यात आली. आमचा कोणत्याही युनियन, संघटना तसेच समितीवर विश्वास राहिलेला नसून आता आमचा लढा फक्त आमच्यासाठी असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी बोलून दाखवल्या. मागण्या पूर्ण करा अन्यथा संप सुरू ठेवू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.
-संतोष दिवाडकर