शरद पवार…. लहानपणा पासून हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. अगदी राजकारण कळत नव्हतं तेव्हा पासून. आता पत्रकार असल्याने पवार साहेबांची भाषण पाहण्यात येत होती. भाषण पाहण्यात असल्याने आणि मिमिक्रीची आवड असल्याने या माणसाचा आवाज मला काढता येऊ लागला. आज राष्ट्रवादी पक्षातील कोणीही जेव्हा माझा तो आवाज ऐकतो जाम खुश होतो. आजही त्यांचे जितके चाहते असतील तितके विरोधक देखील नक्की असतील. पण प्रत्येक वेळी माणसाला राजकारणाच्या चष्म्यातून तोलण किती योग्य आहे ?
ज्यांना मी मानतो, ज्यांचे व्यक्तिमत्त्व मला भावते त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही भाषणात पवार साहेबां बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. अदृश्य हात, तेल लावलेला पहिलवान अश्या नानाविध उपमा देऊन जे प्रसंग वर्णन त्यांनी केलं त्याबद्दल खरंच विचार करायला भाग पाडलं.
आता तर पवार साहेबांचं खूप वय झालं आहे. या वयात राजकारणातुन संन्यास घेऊन काही वर्षे विश्रांती घ्यायला हवी असे काहींना वाटते. पण मला वाटत नाही ही व्यक्ती असा विचार कधी करत असेल का? आजच्या तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा यांच्यात आजही आहे. चाहते म्हणतात आमच्या साहेबांनी पावसात भिजून भाषण केले. विरोधक म्हणतात राजकीय स्टंट होता, केवळ मत मिळवण्यासाठी केलेला. काहीही असो… या वयात कसलीही तमा न बाळगता स्वतःला झोकून देणं म्हणजे एक मोठी ऊर्जा आहे आणि हे सत्य मान्य करावेच लागेल.
राजकारणाचा चष्मा जरा बाजूला करा आणि आता फक्त एक व्यक्ती म्हणून पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या काळी म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वीही शरद पवार हे ज्येष्ठ व्यक्तीमत्वच होत. 1999 साली त्यांनी पक्ष उभा केला. त्यावेळी त्यांचं वय 60 च्या घरात होत. या वयात रिटायर्ड होऊन पुढील आयुष्य आरामात घालवायच असा एक समज असतो. मात्र त्याच वयात यांनी पक्षाची स्थापना केली.
२१ व्या शतकाच्या सुरुवातीचे पहिले दशक म्हणजे सोशल मीडियाचा लवलेश देखील नाही. सोशल मीडिया दूरची गोष्ट त्याकाळी साधा मीडिया देखील नव्हता. मोजके टीव्ही चॅनल्स आणि मोजकेच काय ते वर्तमानपत्र. ना कसलं इंटरनेट ना कसला मोबाईल फोन. या अश्या काळात स्वतः महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाची पाळमूळ रुजवली. दिवसभरात छोट्या छोट्या गांवखेड्यात जाऊन सभा घेतल्या. सभेतून लोकांशी जवळीक निर्माण केली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ लोकांच्या पक्क डोक्यात बसल. विशेषतः पुणे,सातारा या सर्व भागात जाऊन त्यांनी संघटन वाढवले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली आणि आज ते सर्वानाच ज्ञात आहेत.
एखाद्याच्या नावाने बोट मोडन किंवा एखाद्या बद्दल वाईट बोलणं सोपं आहे. पण त्या व्यक्तीची कारकीर्द, त्याने घेतलेली अपार मेहनत देखील कधीतरी पाहिली पाहिजे. राजकारणात भले तुम्हाला ते आवडत नसतील. पण त्यांच्या कडे जी ऊर्जा या वयात आहे. ती खरंच अजब आहे. मनातून ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या जवळच असेल हे त्यांच्याकडून शिकता येईल. परिस्थिती काय आहे ? यापेक्षा ती कशी बदलायची हे ज्याला कळलं तो अर्धा खेळ तिथेच जिंकला.
अलिकडल्या काळात त्यांच्या तोंडाला सूज आल्याचे पत्रकार परिषदेत पाहिले. मनात विचार आला की व्यवस्थित बोलत येत नसतानाही ही व्यक्ती पत्रकार परिषद घेत आहे. खरंच अजबच.. पण नंतर एक लेख वाचल्या नंतर समजले की शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांचे समर्थक असाल, विरोधक असाल किंवा कुणीही असाल…. पण त्यांच्या या अदृश्य शक्तीला किंवा सकारात्मक उर्जेला नाकारू शकत नाही. हीच ऊर्जा राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीसाठी अजस्त्र आधारवडाची छाया बनलेली आहे.
–संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
कल्याण 8767948054