कल्याण-डोंबिवली घडामोडी

श्रेयवादाची लढाई : मनसे आमदारा नंतर भाजप आमदारावर शिवसेनेची टीका

कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित विधानसभा क्षेत्रात एमएमआरडीए कडून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. मात्र या निधीच्या श्रेयवादावरून शिवसेना, मनसे आणि आता भाजपा अश्या तिन्ही पक्षांत चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. यातून खासदार विरुद्ध आमदार असे एकप्रकारे संघर्ष चित्र पहायला मिळत आहे.

एमएमआरडीए कडून मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या निधीमधील १२३ कोटी हे कल्याण पूर्वेतील रस्त्यांसाठी तर २७ कोटी हे मानपाडा भागा साठी मंजूर झाले आहेत. याचवरून मागील दोन दिवस कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली होती. राजू पाटील यांनी मानपाडा रस्त्याच्या निधीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन श्रेय लाटू नका असे म्हटले होते. हा विषय संपतो ना संपतो तोच आता कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेत जुंपल्याचे समोर आले आहे. माझ्याच जुन्या कामांना नवीन नावे देऊन निधी मंजूर केल्याचे दाखवले आहे असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केला होता. यावर बोलताना शिवसेना पदाधिकारी गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, आमदारांनी काहीही कामे केली नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अथक प्रयत्न करून, अधिकाऱ्यां समवेत भेटी करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील प्रस्तावित रस्त्याला निधी नेमका कुणाच्या प्रयत्नाने मिळाला आहे ? यापेक्षा हे रस्ते लवकरात लवकर बनावे अशी अपेक्षा करदाते नागरिक करीत आहेत. लांबणीवर पडलेली क.डों.म.पा. निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक खासदार आहे. तर भाजपचे दोन आणि शिवसेना मनसेचे प्रत्येकी एक एक आमदार या महानगरपालिका क्षेत्रात येतात. त्यामुळे सुरू झालेल्या राजकीय वातावरणावरून निवडणुकीचा आभास आतापासूनच निर्माण होऊ लागला की काय असे वाटू लागले आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *