घडामोडी

सरकारच्या मदतीपासून वंचित रिक्षा चालकांच्या खात्यात लवकरच जमा होणार मदत

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांना मदत म्हणून राज्य सरकारने प्रत्येक रिक्षा चालकाला १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र या मदतीपासून अद्यापही अनेक रिक्षाचालक वंचित असून याबाबत लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र सरकारच्या या मदतीपासून वंचित असलेल्या रिक्षाचालकांच्या खात्यात लवकरच मदत जमा होईल या परिवहन उपायुक्तांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

      कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद असल्याने रिक्षा चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे या रिक्षा चालकांना मदत म्हणून राज्य सरकारने १५०० रुपये प्रत्येक रिक्षा चालकाला मदत म्हणून जाहीर केली. मात्र कित्येक महिने झाले तरी बरेचसे रिक्षाचालक या मदतीपासून वंचित राहिले आहेत. अशा या रिक्षा चालकांना मदत मिळण्यासाठी भाजपा वाहतूक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबत गुरवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण, जेष्ठ कर्मचारी रवींद्र कुलकर्णी, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड, ठाणे जिल्हा अध्यक्ष वाल्मिक सोनार उपस्थित होते.

तानाजी चव्हाण यांनी रिक्षाचालकांना १५०० रुपयांच्या अनुदानासाठी संगणक प्रणाली मध्ये येणाऱ्या अडचणी बाबत महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त संदीप चव्हाण यांच्याशी मोबाईल द्वारे चर्चा घडवून आणली. २० जुलै  रोजी डेमो तयार होईल व २३ जुलै  पासून ज्या रिक्षाचालकांना अद्याप अनुदान मिळाले नाही अशा रिक्षा चालकांसाठी कल्याण आरटीओला रिक्षाचालकांचे नोंदणी क्रमांक, रिक्षा क्रमांक, आधार कार्ड, ज्या बँकेत पैसे हवेत त्या बँकेच्या पुस्तकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत किंवा चेक वर नाव असलेले झेरॉक्स प्रत, लायसनची झेरॉक्स प्रत आणून द्यावी. लवकरात लवकर रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास मदत होईल असे आश्वासन संदीप चव्हाण यांनी दिलं आहे.

परिवहन उपआयुक्त यांच्या आश्वासनानंतर तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांच्या विनंतीनुसार शुक्रवारी होणारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. तरी सर्व रिक्षाचालकांनी कल्याण आरटीओला आपले पेपर सादर करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *