कल्याण-डोंबिवली घडामोडी

स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी डॉ.आंबेडकर उद्यान बाधित ? कल्याणात आंबेडकरी जनतेत संतापाचे वातावरण

कल्याण :- कल्याणातील आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले ते सुभाष चौक मधील २४ मीटरचा ३० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट आहे. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवित आपला निषेध व्यक्त केला. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेने मोर्चे बांधणी करून आंबेडकरी समाज आणि जागृत नागरिकांनी महाराष्ट्र पालिका नियम कलम ४८७ अंतर्गत हरकत वाजण्याची मागणी होऊ लागली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुर्वी मुरबाड रस्ता रुंदीकरणासाठी दोन वेळा या उदयानाची जागा घेतलेली होती. तसेच रुक्मिणीबाई हॉस्पिटलसाठी उदयानाची काही जागा रस्त्यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळेस सदरचे ठिकाणे केडीएमसी विकसित करून देणार होती. परंतु आजपर्यंत सदरचे ठिकाण विकसित केले नाही. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानका बाहेरील परिसर विकसित करण्यात येणार असून त्या अंतर्गत कल्याण पश्चिम मधील महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यँत केडीएमसी २४ मीटरचा ३० मीटर करण्यात येणार असून यात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा घेतली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने हरकती सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी पसरली आहे.

कल्याण पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालया लगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असून या उद्यानातील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी समाजाचे अनुयायी एकत्र येत असतात. तसेच आंबेडकरी चळवळीचे मुख्य ठिकाण असल्याने या उद्यानाशी समाजाची नाळ जुळालेली आहे.

सन १९९६ च्या शहर विकास आराखडया प्रमाणे २४ मीटर रस्ता हा शहरी भागासाठी परिपुर्ण असतानाही केडीएमसी या उदयानाची जागा रस्त्यासाठी घेत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरणात उद्यान बाधित होणार असल्याने कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सोशल मीडियावर जनतेला जागृत करून हरकती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिम मधील आंबेडकर उद्यान मध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवीत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी दलित मित्र आण्णा रोकडे, आंबेडकरी चळवळीतील बाबा रामटेके, भारत सोनावणे, सुदाम गंगावणे, कुमार कांबळे, संजय जाधव, शेखर केदारे, विलास गायकवाड, राजू रणदिवे, रंजना जाधव
आदी प्रमुख कार्यकत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

तर काहीं आंबेडकरी संघटनांनी पालिका मुख्यालय मध्ये धाव घेत लेखी हरकत घेतली. कल्याण शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष महिला मायाताई कांबळे, कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड, रुपेश हुंबरे, ठाणे जिल्हा महासचिव रेखा कुरवारे, सदस्य मनिषा झेंडे, कल्याण पूर्व सचिव देवानंद कांबळे आदी पदाधिकाऱयांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली.

याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील मग पुढील धोरण ठरवले जाईल. तर सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सांगितले की आज हरकती नोंदवत असून उद्या आम्ही आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू. पालिकेने हा प्रश्न हाताळला नाही तर सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शिष्ठ मंडळाला सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगत अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली आहेत.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *