कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसारत हायटेन्शन वायर असून यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत भाजपाच्या एका महिला पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनाच निवेदन देत येथील नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
योगीधाम परिसरातून काही इमारतीपासून खूप कमी अंतराने लागूनच मध्य रेल्वेची ३५ केवीए हायटेन्शन वायर गेली असून वायर खालून लोकांचा वापर असलेले रस्ते सुद्धा आहेत. उन्हाळ्यात या तारा प्रसरण पावतात व खाली लोंबकळतात व पावसाळ्यात सुद्धा खालून चालताना किंवा वाहन चालवताना नागरिकांना भीती वाटते. तसेच अमृतधाम प्रोजेक्टचे क्लब हाऊस व योगीधाम क्लब हाऊस चे अंतर सुद्धा या वायरिंग पासून खूप कमी आहे.

ब्रेकडाऊनसाठी वायरी पासून ५० मिटर जमिनीचे क्षेत्र मोकळे सोडण्यात यावे, असा नियम आहे. परंतु याठिकाणी केडीएमसी पालिका प्रशासनाकडून सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकामांना परवानगी देण्यात आली व प्रोजेक्टना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सुद्धा देण्यात आला. यामुळे हजारो लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले आहेत. सध्या याच परिसरात योगीधाम फेज ५ अजमेरा ब्लीस नावाच्या प्रोजेक्टचे काम सुरू असून वरच्या वायरला हातातील लोखंडाच्या रोडचा स्पर्श होऊन काम करणारा तरुण दगावला. अशाप्रकारे लोकांचे जीव टांगणीला लागले असून, या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी एका महिला भाजपा पदाधिकारीने केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.
-कुणाल म्हात्रे
