“मला कोविड सेंटरमध्ये बिनपगारी काम द्या” – पत्रकाराची प्रशासनाकडे अजब मागणी

मुरबाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरम्यान याच तालुक्यातील पत्रकार जीवन शिंदे यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्याची मागणी प्रशासनाकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. मला मानधन दिले नाही तरी चालेल पण सेवेत घ्या असेही त्यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. मात्र पत्रकार जीवन शिंदे यांच्या या अजब मागणीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याचबरोबर मृत्युदर देखील चिंतेचा विषय बनू लागला आहे. व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर या सर्व समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मुरबाडचे पत्रकार जीवन शिंदे यांनी मुरबाड तहसीलदार, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये काम मिळावे अशी मागणी केली आहे. याचबरोबर मी विना मोबदला काम करायला तयार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. एक पत्रकार कोविड हॉस्पिटलमध्ये विना मोबदला काम करण्याची का इच्छा करतोय ? या विचारात प्रशासनातील एक वर्ग पडला असल्याचे सध्या दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्तर प्रशासनाने जीवन शिंदे यांना अध्याप दिलेले नाही. पत्रकाराची मागणी ही प्रशासना समोर एक प्रकारचे आव्हानच असेल असा सूर समाज माध्यमांवर लावला जातोय.

मृत्यू दर वाढण्याला ‘या’ दोन गोष्टी कारणीभूत; भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली क.डों.म.पा. आयुक्तांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज क.डों.म.पा. क्षेत्रातील काही रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या नंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मृत्यू दर वाढण्याबाबत कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते सांगितले. त्याचबरोबर राज्यसरकारवर टीकास्त्र डागले.

क.डों.म.पा. क्षेत्रात कडक निर्बंधांनंतर कोरोना काहीसा आटोक्यात येत असल्याचे आकडे सांगत आहेत. मात्र मागील महिन्याभरा पासून मृत्यू दर हा काहीसा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णांना जाणवणाऱ्या समस्यां बद्दल त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा ५०% होत आहे आणि रेमडेसिवीरचा पुरवठा २५% होत आहे. ही दोन कारने मृत्यू दर वाढण्याला जबाबदार आहेत असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज (दि.२९ एप्रिल २१) रोजी १० रुग्ण दगावले आहेत. तर ८३५ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याच बरोबर १५४६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या आकडेवारी नुसार सध्या महापालिका क्षेत्रात एकूण १२७३४ संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

वांगणीच्या मयुरची कल्याण पूर्व आमदारांनीही घेतली भेट

मागील काही दिवसांपूर्वी स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान मुलाचे प्राण वाचवणारा युवक आज देशभरात गाजत आहे. मयूर शेळके या युवकावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव अजूनही सुरूच आहे. कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील आज मयुरची भेट घेतली. तसेच त्याला बक्षीस स्वरूपात एक धनादेश देखील सुपूर्द केला.

एक अंध महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन वांगणी प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानकपणे तो लहानगा ट्रेक वर पडला. त्याचवेळी एक एक्स्प्रेस तिथून जात होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ड्युटीवर असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने या मुलाचे अतिशय फिल्मी स्टाईल प्राण वाचवले. काही सकेंद कमी जास्त झाले असते तर अनर्थ घडला असता. मात्र अशाही परिस्थितीत मयूरने त्याचे प्राण वाचवले.

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी आज मयुरची भेट घेतली. त्याने केलेल्या कामगिरी बद्दल स्वतः आमदारांनी त्याची भेट घेऊन त्याच्याशी बातचीत देखील केली. तसेच त्याचा सन्मान करीत त्याला शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान आमदारांनी मयूरला एक धनादेश बक्षीस म्हणून सुपूर्द केला. अश्या माणसांचे कौतुक करावे तितकेच कमी अशी भावना कल्याण पूर्व आमदारांनी भेट नंतर व्यक्त केली.

“मयूर शेळके याने केलेले धाडस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्याने केलेल्या शौऱ्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत. मयुरचा या अद्भुत कामगिरी आणि पराक्रमाबद्दल त्याची भेट घेऊन त्याला सन्मानित करण्यात आले.”

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)

मयूर शेळके याला रेल्वे कडून देखील ५०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील फोनद्वारे त्याच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मयुरची भेट घेत सन्मान केला. जावा कंपनीने देखील मयुरला एक बाईक गिफ्ट केली आहे. व त्यानंतर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील मयुरला सन्मानित केले आहे. त्यामुळे मयूरच्या सन्मानासाठी सर्वच राजकीय पक्ष, उद्योजक तसेच संस्था पुढे सरसावताना पाहायला मिळाले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आठवड्याभरात कोरोनाने ‘इतके’ मृत्यू

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पुन्हा उसळी घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या आठवड्यात रविवार दि.१८ एप्रिल ते शनविवर दि.२४ एप्रिल पर्यंत ५८ रुग्ण कोरोनाने दगावल्याची नोंद झाली असून ही चिंतेची बाब बनली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यसरकारने ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रभर कडक निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी विशेष काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, इंजेक्शन आणि आता तर लसींचाही तुटवडा भासू लागलेला आहे. अशातच क.डों.म.पा. क्षेत्रात मृत्यू दर देखील हळूहळू वाढू लागला आहे. कोरोना आजार बरा होण्याचे प्रमाण जास्त असले तरी नागरिकांनी लक्षण जाणवताच फार वेळ न घालवता चाचणी करून उपचार सुरू करावे असे आवाहन आता काही डॉक्टर देखील करीत आहेत.

साधारण वर्षभरापासून महानगरपालिका क्षेत्रात दिवसाला ५ पेक्षा कमी रुग्ण दगावत होते. काही दिवशी एखादा रुग्ण तर काही दिवशी पाच. तर असेही काही दिवस होते ज्यादिवशी एकही रुग्ण दगावला नसेल. मात्र आता दिवसाला १० पेक्षा अधिक रुग्ण दगवण्याचे चित्र दिसू लागले आहे.

आठवड्याभरात दगावलेले रुग्ण :-

दि.१८ रविवार – ५ रुग्ण
दि.१९ सोमवार – ७ रुग्ण
दि.२० मंगळवार – ६ रुग्ण
दि.२१ बुधवार – ८ रुग्ण
दि.२२ गुरुवार – ९ रुग्ण
दि.२३ शुक्रवार – १२ रुग्ण
दि.२४ शनिवार – ११ रुग्ण

क.डों.म.पा. क्षेत्रात याच आठवड्यात जितक्या लोकांना कोरोनाची लागण झाली तितकेच प्रमाण बरे होणाऱ्या रुग्णांचे देखील आहे ही बाब दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

दिलासादायक ! कल्याण डोंबिवलीत चार दिवसांत ७५२२ रुग्णांना डिस्चार्ज

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा आकडा कडक निर्बंधांनंतर काहीसा वधारलेला दिसत आहे. दिवसाला २ हजारांपर्यंत जाणारी रुग्णसंख्या साधारण १२०० पर्यंत आटोक्यात येत आहे. याहून दिलासादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७५२२ रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र भरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना व सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नेमून दिलेली वेळ देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश प्रशासनाला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा अधिक होत आहे.

मागील चार दिवसांत एकूण ७५२२ रुग्ण बरे झाले आहेत. या तुलनेत ५५७३ नव्या रुग्णांची नोंद चार दिवसांत करण्यात आली आहे. तर कोरोनाने महापालिका क्षेत्रात ३० लोकांचा जीव याच चार दिवसांत गेला आहे. या सर्व आकड्यांबरोबर आजच्या घडीला महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४२५१ रुग्ण आता उपचार घेत आहेत. अनावश्यक कारणासाठी फिरणे टाळा, मास्क आणि सेनीटायजरचा वापर करा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन क.डों.म.पा.च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

१ एप्रिल पासून २० दिवसांत क.डों.म.पा. ने मास्क कारवाईत जमावाला लाखोंचा दंड

क.डों.म.पा. ने १ एप्रिल ते २० एप्रिल या २० दिवसांत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे. २० दिवसांच्या या कालावधीत २४१३ लोकांवर ही कारवाई झाली आणि या लोकांकडून महानगरपालिका प्रशासनाला रु.१२,०६,५००/- रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे.

कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत आहे. असे असताना अजूनही काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अगदी बेजबाबदारपणे मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देखिल एकुण १२६ व्यक्तीकडून रु.६३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

राज्यभरात लसीकरण केंद्र सुरू करा ; मनसे आमदार राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अश्या परिस्थितीत रुग्णांना इंजेक्शन पासून बेड पर्यंत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी वेकसिनेशन होणे खूप गरजेचे आहे. याकरिता राज्यभरात पातळी पातळीवर लसीकरण केंद्र उभारावीत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

राजू पाटील यांनी पत्राद्वारे केलेली मागणी :-

केंद्र सरकारने दिनांक १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला राज्यातच हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिलेली आहे. व आता राज्यांनाही थेट उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याला कोरोना लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल अशी शक्यता असून लसीकरणही वेगाने होईल. परंतु राज्य सरकारने त्यासाठी युद्धपातळीवर पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा,तालुका व अगदी ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण हाती घ्यावे लागेल. या लसीकरणकेंद्रांचा जिल्हा, महानगरपालिका, तालुका पातळीवर संयुक्त डॅशबोर्ड तयार करावा व लस उपलब्धतेबाबत माहिती उपलब्ध करुन प्रत्येक तासाला सोशल मिडियासह विविध चॅनलवर द्यावी. तसेच ज्या व्यक्तीने लसीसाठी नाव रजिस्टर केले असेल त्यालाही द्यावी. जेणेकरुन त्याचाही वेळ वाचेल व लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

कोरोना महामारीमध्ये कोविड सेंटर, रुग्णालये महत्त्वाची आहेतच परंतु त्याच बरोबर लसीकरणही तेवढेच वेगवान केल्यास कोरोनाच्या संकाटावर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी राज्यात लसीकरण गतीमान करण्यासाठी आधीच पूर्वतयारी व नियोजन केल्यास खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये ‘लस उत्सव’ साजरा होऊ शकतो. तरी कृपया आपण राज्यभरात जिल्हा, तालुका, महानगरपालिका व ग्राम स्तरावर नवीन लसीकरण केंद्रे उघडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.

खासदार श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा कोविड पोजिटिव्ह ; हॉस्पिटलमधून व्हडिओद्वारे साधला संवाद

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आता दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात काम करताना अनेक लोकांशी संपर्क होत असल्याने कोरोनाने दोन महिन्या नंतर पुन्हा श्रीकांत शिंदेंना ग्रासले आहे. सध्या श्रीकांत शिंदे यांची प्रकृती ठीक असून ते बरे होत असल्याचे त्यांनी रुग्णालयातुन व्हडिओ द्वारे सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या खासदार शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

व्हडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=313468003465846

नवा नियम ; सकाळी ११ नंतर जीवनावश्यक सेवांची दुकान बंद !

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. यासाठीच राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र या बरोबर हे निर्बंध आता आणखीनच कठोर करावे लागले आहेत. जीवनावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी ११ पर्यंतच सुरू राहणार राहणार असून त्यानंतर सर्व काही बंद असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निकषावर चर्चा करण्यात आली. किराणा खरेदीच्या नावाखाली लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात व त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडचण होत आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. ‘ब्रेक द चेन’ या मिशन नुसार राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक केले आहेत.

सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जीवनावश्यक सेवांची दुकाने जसे की किराणा, दूध डेअरी, चिकन-मटण, मासे अशी सर्व दुकाने फक्त चार तास खुली ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र आता हीच वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्यात आली असून ४ तासांतच खरेदी विक्री करता येणार आहे. तर रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन बाबतही विचार करण्यात आला आहे. यानुसार काही तासांत राज्यभरात कडक लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ; क.डों.म.पा. आयुक्तांची घेतली भेट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मृत्यू दर देखील वाढताहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सीजन मिळत नाही. व्हेटीलेटर मिलत नाही. या गंभीर परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बिकट झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांना केल्या आहेत. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी राजू पाटील यांनी दर्शविली. लसीकरण काही केंद्रावर सुरु आहे मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होत आहेत. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. त्यानंतर डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही.

मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. मात्र क.डों.म.पा. मध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच आहेत. महापौर पद अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.