KDMC चा दंडात्मक कारवाईवरच भर ; उपाययोजना कागदावर – मनसे आमदार राजू पाटील

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी क.डों.म.पा. प्रशासनाच्या कामकाजावर असंतोष व्यक्त केला आहे. पालिका प्रशासन फक्त दंडात्मक कारवायाच करण्यावर भर देत असून कोरोनासाठी करावयाचा उपाययोजना फक्त कागदावरच आहेत असे म्हणत राजू पाटील यांनी क.डों.म.पा. ची तुलना नवी मुंबई महानगरपालिकेशी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काही निर्बंध लादले आहेत. शिवाय राज्य सरकारने देखील कठोर निर्बंध लादले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाया करीत आहेत. पोलीस स्थानकात गुन्हे दाखल होत आहेत. परंतु याच बरोबर पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनावर जास्तीत भर द्यावा असे राजू पाटील म्हणत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते हे त्यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे सांगितले आहे.

“कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच सर्वेसर्वा आहेत. हाताशी असलेली यंत्रणा कमी अधिक असू शकते परंतु कामाची पद्धत पण महत्वाची आहे. नवीमुंबईत आरोग्यसेवक भरती करून लसीकरण केंद्र वाढवून कोरोनाशी लढा द्यायचा चाललेला प्रयत्न दिसत आहे. सोबतच पोलिस प्रशासनाला बरोबर घेऊन लोकांच्या हालचाली मर्यादीत करण्यावर तिकडे भर दिला जात आहे. तर आमच्या केडिएमसीत फक्त दंडात्मक कारवाईवर भर दिलेला दिसत आहे. बाकीच्या उपाययोजना फक्त कागदावरच दिसत आहेत. आधीच आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असे करण्यात काय अर्थ आहे ? केडिएमसी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा, उगीचच ‘टार्गेट’ दिल्याप्रमाणे व्यापारी व दुकानदारांना त्रास देऊ नये. पालिकेला हेच ‘टार्गेट’ मध्ये अडकलेले मनुष्यबळ इतर ठिकाणी लसीकरण केंद्र व दवाखान्यात वापरता येतील. लोकांनी पण घालून दिलेले बंधन पाळलेच पाहिजेत व ते आता गंभीरपणे पाळताना पण दिसत आहेत. मग अश्यावेळी आठवड्यातून २/३ दिवस दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला काय हरकत आहे ? त्यानंतरही नियम तोडले गेले तर कडक कारवाई जरूर करावी. परंतु प्रशासनाने प्राधान्याने जास्तीत जास्त लक्ष व वेळ आरोग्यसेवा व लसीकरणावर द्यावा. आता या कोरोनाचा प्रसार लॅाकडाऊन नाही तर लसीकरणानेच कमी करता येईल.”

राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)
नियम मोडल्याने KDMC प्रशासनाने केली छोटी-मोठी दुकाने सील

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोना निर्बंध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने रोज सील केली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी आपापल्या प्रभागात परिस्थितीची पाहणी केली.

‘ब’ प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ६ दुकाने सील करण्यात आली. ‘क’ प्रभागात २ मॅरेज लॉन्स ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात आले आहेत. ‘फ’ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलर अशी २ दुकाने तसेच ९० फुटी रोडवरील ३ दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ‘ग’ प्रभागात सत्यम सोशल क्लब व आणखी २ दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘ई’ प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच २ वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई केली.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा अथक काम करीत असताना या कामात महापालिकेच्या नागरिकांनी देखील कोरोना नियमावलीचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. मात्र नियम मोडल्यास कारवाई अटळ आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेकडोंच्या संख्येने लग्नसोहळा पार पडलेला मॅरेज लॉन्स तसेच संयोजक व आयोजकांवरही पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.