ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर म्हणून नोंद ; मुंबई विद्यापीठाकडे तक्रार प्राप्त

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर दाखविले आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.  अश्या काही विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे आली अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.

   विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांची भेट घेत संबंधित विषयावर चर्चा केली व पत्रव्यवहार करत  विद्यार्थ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं असे आव्हान विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा जया गणाई यांनी केले.

    परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांनी तक्रार आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे डिटेल्स मागवून त्या महाविद्यालयातील जबाबदार पदाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी दिली.

विद्यापीठासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा असे आवाहन विद्यार्थी भारतीच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. 9321638034 / 8097834167 / 8104571787

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व कर्पेवाडीतील शाळेची जीर्ण इमारत महापालिकेने केली जमीनदोस्त

कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातील जे प्रभाग क्षेत्रातील कर्पेवाडी येथील द्वारका शाळा ही इमारत ३० वर्षापूर्वीची असून या इमारतीतील शाळा गेल्या १० वर्षापासून बंद आहे. हि इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीत गर्दुले व समाज कंटक बसत असून त्यांचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी केडीएमसीकडे प्राप्त झाल्या होत्या. 

या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे या शाळा इमारतीच्या मालकांस नोटीस बजावून इमारत निष्कासीत करणेबाबत कळवूनही संबंधितांनी ही इमारत निष्‍कासीत केली नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार व विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागक्षेञ अधिकारी वसंत भोंगाडे यांनी जे प्रभागातील अतिक्रमण निमुर्लन पथक, महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपअभियंता सुनिल वैदय, कनिष्ठ अभियंता धर्मेद्र गोसावी यांच्या मदतीने व 1 जेसीबी, 1 ब्रेकर,1 गॅस कटरचा वापर करून काल दिवसभर सदर धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई केली असून आज हि कारवाई पूर्ण करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

अखेर दीड वर्षांनंतर कल्याण डोंबिवलीच्या सर्वात मोठ्या कोविड सेंटरला महापालिका आयुक्तांनी ठोकले टाळे ; टाटा आमंत्रा बंद

टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला.  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्या-या डॉक्टर्स,  नर्सेस,  वॉडबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभात बोलतांना त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. 

टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले,  हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणा-या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ,  प्रमोद मोरे, डॉ. दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले.

 टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

        महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलासॉफर, गाईड,  फ्रेन्ड आहेत.  त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.  भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणा-या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले.  आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत, असेही पुढे ते म्हणाले.

        कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती.  अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत 40 हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.  त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळीउपायुक्त  रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत शेकडो बुलेट सायलेन्सरवर फिरवला रोडरॉलर ; आता गॅरेज वाल्यांची धरणार गचंडी

मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून यापुढे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या वतीने १०३ मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करत हे मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर ठाकुर्ली येथील ९० फुट रोड, म्हसोबा चौक येथे रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

डोंबिवली शहरातील काही दुचाकी स्वार, आपल्या दुचाकीस कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असतात यामुळे ध्वनिप्रदुषण होत असून, आवाजामुळे सामान्य जनता विशेष करून वयोवृध्द नागरीक, रूग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.

या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहा पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, पोलीस उप निरीक्षक नवनाथ चव्हाण, वाहतुक पोलीस अंमलदार, यांनी डोंबिवली शहरात विशेष मोहिम राबवून एकुण ८३ मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच कोळसेवाडी वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिरसाट, पोलीस उप निरीक्षक काशीनाथ चौधरी व वाहतुक पोलीस अंमलदार कोळसेवाडी यांनी कोळसेवाडी वाहतुक शाखेची हद्दी मध्ये २० मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेले एकुण १०३ सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत आर.टी.ओ.कडून खात्री केली असुन, हे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशिर असल्याने त्याचा परत कोणाकडून वापर होऊ नये यांकरीता ते आज म्हासोबाचौक, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व या रस्त्यावर मांडुन त्यावर रोलर फिरविण्यात आला.

यापुढेही वाहतूक पोलिसांच्या वतीने मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्यात येणार असून हे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण पश्चिम विधानसभेत केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राजकीय पक्ष आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता केल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे यासाठी नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या प्रभागात कोरोनामुक्तीसाठी जोमाने काम करायचे आहे असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला आहे.

      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई व कार्याध्यक्ष उदय जाधव यांच्यावतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नियुक्तीपद वाटप कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी येथील  माळी समाज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.  यावेळी राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे,  सरचिटणीस प्रशांत माळी, विधानसभा युवक अध्यक्ष योगेश माळी,  ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे, क प्रभाग अध्यक्ष दिनेश परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

      पक्षाच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमेतील सर्व वार्डचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाची तिसरी लाट येत असून यापासून बचावासाठी कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करून प्रभागातील नागरिकांचे देखील कोरोनापासून रक्षण करा. कोरोनाची तिसरी लाट आलीच नाही पाहिजे, यासाठी  मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियम पाळा असा सल्ला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिला. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेल्या पुरस्कारात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा देखील वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तर आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढवतील असेही सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या लोकवस्तीत आढळले अजगर आणि घुबड

नैसर्गिक अधिवासात घुसखोरी केलेल्या काँक्रीटच्या जंगलांमुळे वन्य जीवांची घालमेल होऊ लागली आहे. पशु आणि पक्षांचा अशा काँक्रीटच्या जंगलात स्वैरसंचार होऊ लागला असून अशाच भरकटलेल्या अजगरासह कावळ्यांच्या तडाख्यातून एका शृंगी घुबडाची प्राणी-सर्पमित्रांनी सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे.

 रविवारी दुपारच्या सुमारास कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या भाल गावातल्या गावदेवी मंदिराजवळ तेथिल तरूण ओमकार घुले याला साप आढळून आला. ओमकार याने मदतीसाठी कळविल्यानंतर मुंबई पोलिस दल व मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलिस शिपाई मुरलीधर जाधव हे त्यांचे सहकारी सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांच्यासह भाल गावात गेले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर जाधव आणि कुलदीप चिखलकर यांनी तेथे असलेल्या दोन फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात आले. इंडियन रॉक पायथोन जातीच्या या अजगराला पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अजगराला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

तर माणेरे गाव रोडला असलेल्या साईकृपा नगरात एका घुबडाच्या मागे कावळ्यांचा थवा लागला होता. हा प्रकार पाहून निसर्गप्रेमी निखिल गवई या तरुणाने कावळ्यांच्या तडाख्यातून या घुबडाला वाचविले. त्या निमित्ताने परिसरातील रहिवाश्यांना प्रथमच सर्वात मोठे घुबड पहायला मिळाले. डोळ्यावर असलेल्या शिंगासारख्या पिसांमुळे शृंगी घुबड म्हणतात. हे घुबड दिवसा किंवा रात्री कधीही उडू शकते. त्यामुळे इंग्रजी भाषेत त्याला ईगल आऊल असेही म्हणतात. याच्या आहारात उंदीर, साप, छोटे प्राणी यांचा समावेश असतो. या घुबडाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर वन विभागाने त्याची निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तता केली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण ग्रामीणमधील भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम ; शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उप चेअरमान लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां सह शिवसेनेत प्रवेश केला.

 यावेळी लता लक्ष्मण भोईर यांची पळसोली महिला उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश प्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदन पाटील, भिवंडी पंचायत समिती माजी उपसभापती प्रकाश भोईर, विष्णु चंदे, तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर,  तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोष सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच  विभागातील  शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी  युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे याबाबत सूचना केल्या तसेच येत्या काही दिवसांत कल्याण ग्रामीण ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्याबाबत माहिती दिली. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सूचित केले.

-कुणाल म्हात्रे

‘अंघोळीची गोळी’ संस्थेने काढले वडाभोवती गुंडाळलेले धागे

नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागेदोरे बांधण्यात येतात तसेच इतर साहित्य देखील ठेवण्यात येते.  यामुळे वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ‘अंघोळीची गोळी’ संस्था पुढे सरसावली असून त्यांनी वडाची झाडे धागेदोरे मुक्त करत वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ केला आहे.  

अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने नुकतेच कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या वडाच्या झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच वडाच्या झाडांना धागेदोरे मुक्त करण्यात आले. भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांना देखील संवेदना असतात हे स्पष्ट करून दाखवले आहे. त्यामुळे नागरिकांची कळत नकळत होणारी कृती झाडांना हानीकारक ठरत असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील वडाचे प्रत्येक वृक्ष कसे सुरक्षित राहील यांची खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. पुजेसाठी वडाच्या फांद्या अनधिकृतपणे तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई  व्हावी तसेच वडाच्या झाडांना कचरा टाकण्याचे ठिकाण बनवले जावु नये यांसाठी आमचा प्रयत्न चालु असल्याचे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या पाच वर्षात भारतातील सव्वा लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे, त्यातंच वडाचे महत्व सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

वडाच्या झाडाच्या संरक्षणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक वडाच्या झाडावर करडी नजर ठेवावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी झाडांना होणार नाही यांसाठी संबंधित विभागाने पोलीस विभागाची मदत घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास महानगरपालिकेच्या माध्यमाने पुजेसाठी महिलांना मोफत वडाच्या रोपट्यांचे वाटप देखील संबंधित विभागाला करता येवु शकते ही अभिनव संकल्पना देखील संस्थेने सुचवली आहे. यावेळी दत्ता बोंबे, भुषण राजेशिर्के, अक्षदा वाऊळ, धनश्री वाळंज उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

शिवकन्या प्रतिष्ठानचे गरीब नागरिकांना कपडे वाटप व वृक्षारोपण

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना गोर गरीब, हातावर पोट असणाऱ्या जनतेचे अन्न व वस्त्र या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जिकिरीचे झाले होते. अशातच शिवकन्या प्रतिष्ठानच्या वतीने ढोलेवाडी, नाशिक येथील गरीब आणि गरजू जनतेसाठी कपडे कपडे वाटप करण्यात आले.

यामध्ये लहान मुलांचे कपडे, महिलांसाठी साडी तसेच युवक वर्गासाठी शर्ट आणि पँट वाटप करण्यात आले. ढोलेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक रमेश दोंदे यांच्याकडून शाळेची माहिती घेऊन शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी शिवकन्या प्रतिष्ठानच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरी, वाडा नगरपंचायतच्या नगरसेविका नयना चौधरी, मीनल चौधरी, आरंभ प्रतिष्ठान रणरागिणी कक्ष जिल्हाध्यक्षा माही चौधरी, आरंभ प्रतिष्ठान तालुका प्रमुख ओंकार कोळी, संपर्कप्रमुख देवेश चौधरी, कुणाल भोईर आणि दिवेश पष्टे उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत सोमवारपासून नवे नियम ; आठवड्याभरानंतर पुन्हा आवळला निर्बंधांचा फास

कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते.  मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नविन आदेश नुकतेच जारी केले आहेत.  

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स  यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. 

कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाली 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 

खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. असे 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत.  सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे