परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क.डों.म.पा. क्षेत्रात दि.२ व ३ जून रोजी लसीकरणाची विशेष सुविधा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्रपणे कोविशिल्ड लसीकरणाची व्यवस्था उद्या दि.२ जून व ३ जून रोजी आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.

परदेशात शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विदयार्थ्यांनी कोविशिल्ड लसीकरणासाठी येताना काही कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत.

  • शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्ट यापैकी एक)
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)
  • १२० फॉर्म अथवा डीएस १६० फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विदयापीठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक.

वरील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर आणावयाची आहेत. झेरॉक्स प्रती लसीकरण क्रेंदावर जमा करुन घेतल्या जाणार आहेत. परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विदयार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे क.डों.म.पा. तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेत लस उपलब्ध न झाल्यामुळे परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांना आणि इतर सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद असणार आहे.

– संतोष दिवाडकर

दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन ; संबंधीतांवर कारवाई करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

सोमवारी दुर्गाडी येथील नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव बंदीचे आदेश असतानाही शिवसेना भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून संचारबंदी, जमावबंदी नियमांचे उल्लघन केल्याने त्यांच्यावर कोरोना माहामारी नियम कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

देशात, राज्यात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत असून त्यामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोनाची साखळी मोडण्या करीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बध लावलेली आहेत. राज्यात संचारबंदी, जमावबंदी असताना देखील मुख्यमंत्री यांच्या मंत्रीमंडाळातील मंत्री, खासदार आमदार, पक्षाचे पदाधिकारी हे सर्रास्स पणे संचारबंदी व जमावबंदीचे नियम मोडताना दिसत आहेत.

लॉकडाऊनमुळे नागरीक घरा बाहेर निघु शकत नाहीत. अनेक नागरीकांचे, व्यावसायीकांचे रोजगार तसेच उद्योग धंदे बुडालेले आहेत. काहींवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. जर एखादा व्यक्ती काही कारणस्तव घरा बाहेर आला तर त्याच्यावर पोलीस, पालीका यंत्रणे मार्फत कारवाई केली जाते. तसेच अनेक व्यावसायीक दुकानांवर कारवाई करून सिल केली आहेत.

असे असतांना दुर्गाडी नविन पुलाचे उद्घाटन करते वेळी त्या ठीकाणी राजकीय मान्यवराची गर्दी झाली. तसेच त्यांच्या सरंक्षणा करीता पोलीस कर्मचारी, महा नगरपालीका तसेच ईतर प्रशासकीय कर्मचारी यांची गर्दी झाली होती. यांच्यापैकी एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल आप ने उपस्थित केला आहे.  

 कायदा नियम हे फक्त सामन्य जनतेसाठीच असतात, राजकीय नेत्याना त्यातून वगळले जाऊन सूट दिलेली आहे का असा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. तरी कायद्या हा सर्वासाठी एकच आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी सबंधितांवर संचारबंदी, जमावबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

– कुणाल म्हात्रे

दुर्गाडी पुल लोकार्पण दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती सेना भाजपच्या झेंड्यांचा वेढा ; शिवप्रेमींमध्ये नाराजी

कल्याण भिवंडी रोडवरील नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गीकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगलीच चढाओढ रंगली होती. यासाठी पुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. श्रेय घेण्याच्या अट्टहासात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती पक्षाच्या झेंड्यांची झालर लावली होती. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास अशाप्रकारे राजकीय प्रदर्शन केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.  

अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना आपल्या श्रध्दा स्थानी मानतो. अशा युग पुरुषांच्या स्मारका ठिकाणी आपल्या पक्षीय प्रेमा पोटी विद्रुपीकरण करणे कदापी  महाराष्ट्रातील शिवप्रेमी सहन करणार नाही. या प्रकाराचा, निष्क्रिय प्रशासनाचा आणि शासनाची  यासंबंधी नियमावली असताना काम चुकारपणा करणार्या केडीएमसी प्रशासनाचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमी सुभाष गायकवाड यांनी दिली.

महाराजांच्या पुतळ्याभोवती अशाप्रकारे राजकीय झेंडे लावणे हे निंदनीय असून, या प्रकाराबाबत संबंधित प्रभाग अधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवप्रेमी श्याम आवारे यांनी दिली.

– कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता

महाराष्ट्रभरात लोकडाऊन १५ जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली असून मॉल आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ ५ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोवीड रुग्णसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आता केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. १ जुन सकाळी ७ वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल. दुपारी ३ नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार. कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.

कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यँत सुरू राहतील. दुपारी २ नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे २  नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने (मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार असून  यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील असे आदेश केडीएमसी प्रशासनाने काढले आहेत.

  • कुणाल म्हात्रे