माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वृक्षारोपण आवाहनाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निसर्गाच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहचल्या असून अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन कायम राहण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शाळेच्या एक विद्यार्थी एक झाड उपक्रमाचा शुभारंभही नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नूतन विद्यालयाच्या मैदानात ५ वर्षांपूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी लावलेल्या झाडाचा ५ वा वाढदिवस पवार यांच्याच हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक, पाम, चिंच, कडू लिंब यासह अनेक औषधी वनस्पती असलेल्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणवासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रभागात, सोसायटी व चाळ परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कल्याणकरांनी मोठा प्रतिसाद देत अनेक प्रभागात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते यासर्व ठिकाणी नरेंद्र पवारांनी हजेरी लावून वृक्षारोपण केले.

प्रभाग क्र.३२ सिध्देश्वरआळी येथे  नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. फडके मैदान परिसरात भाजपाच्या प्रिया शर्मा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भावना मनराजा, नम्रता चव्हाण, ज्योतिताई भोईर आदी उपस्थित होते. प्रभाग २ कोलीवळी येथील वृंदावन सोसायटी परिसरात नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय कारभारी, मिलिंद सिंग, मेघनाथ भंडारी, भाऊराव तायडे, नम्रता चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रभाग ४ मध्ये गौरीपाडा येथे भाजपा कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुन म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला मा आमदार नरेंद्र पवार,महिला अध्यक्षा मीरा खरे, वॉर्ड अध्यक्ष महेश केणे, जेष्ठ कार्यकर्ते श्याम केणे आदी उपस्थित होते. प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर नरेंद्र पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण आयोजित केले.

-कुणाल म्हात्रे

उरवडे औद्योगिक वसाहतीत रासायनिक कंपनीला आग ; आगीत १७ जणांच्या मृत्यूची माहिती

पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही घटना घडली. या दुर्घटनेत १५ महिला व दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंपनीचं नाव ‘एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजिस’ असं आहे. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग कशामुळं लागली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

मुळशी मधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला आज दुपारी दोनच्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी पंधरा ते वीस कामगार अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती होती.

या केमिकल कंपनीत सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी १७ लोकं मिसिंग आहेत. त्यापैकी १५ महिला आणि दोन पुरुष आहेत. आतापर्यंत आठ ते दहा मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. आग लागलेली कंपनी आहे त्या कंपनीत सॅनिटायजर तयार केले जाते. सॅनिटायजर सारखा ज्वलनशील पदार्थ असल्याने यंत्रणा कितपत काम करते हे पाहाव लागेल, असं आमदार संग्राम थोपटे म्हणाले.

कंपनीला लागलेली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. केमिकल कंपनीत सॅनिटायझर निर्मिती होत असल्यानं आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याची शक्यता आहे. आग लागलेलं ठिकाण शहरी भागापासून लांब असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं पोहोचण्यास उशीर लागत होता.मात्र सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरएसपी अधिकारी युनिट तर्फे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने कल्याण येथे आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत स्वामी नारायण हॉल ट्रस्टचे दिनेश ठक्कर, रुपेश भोईर यांच्या हस्ते रहेजा कॉम्प्लेक्स, लोक उद्यान, गुरुद्वारा कंपाऊंड या ठिकाणी लिंब, चिंच,पिंपळ, वड या वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने नैसर्गिक ऑक्सिजनची कमी भासत आहे. कोरोनाच्या महामारीत ऑक्सीजन लेवल कमी झाल्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला म्हणून एक मूल एक झाड ही संकल्पना घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरातील मैदानात सोसायटीच्या आवारात रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प करावा व येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी दुर्घटना होऊ नयेत यासाठी या उपक्रमात सर्व बंधू-भगिनी सहभाग घ्यावा असे आवाहन आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांनी केले. स्वामीनारायण ट्रस्टचे दिनेश थक्कर यांनी पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी १०० झाडांच्या रोपांची व्यवस्था केली.

-कुणाल म्हात्रे