कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी क.डों.म.पा. सज्ज ; राबवणार ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना

कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज होत असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत. तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-19 ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळाच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल. याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील  कोविड-19 संसर्गाची लागण होणा-या 8 ते 12 वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैदयकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विदयालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.

त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विदयालये,  खाजगी प्राथमिक व माध्यमिक विदयालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव,मेल आयडी, व्हॉटॲप क्रमांक,शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.

यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक‍ विदयालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुलक्षून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणा-या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विदयालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे  महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणानंतर भांडी चिकटतात या दाव्याची अखेर पोल खोल

कोविडशिल्ड लस घेतल्यानंतर शरीरात विशिष्ट चुंबकीय शक्ती संचारते व त्यामुळे ज्या ठिकाणी लस घेतली आहे त्या भागात व त्या आजूबाजूला चुंबकत्व आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. अशा प्रकारचा दावा करून एकप्रकारे बुवाबाजीला समर्थन केल्यासारखे होत आहे. याची पोल खोल शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी केली आहे.

लसीमुळे अंगात चुंबकीय शक्ती येऊन फक्त घरातील उथळ भांडे, चमचे, कॉईन हे चिपकत असतील तर अर्धा किलो ते एक किलोचे वजन ही चिपकायला हवे. तसेच दुकानात असलेले मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारे ५० ग्राम पासून पुढे सर्व वजने ही चिपकायला हवीत फक्त स्टेनलेस स्टील चिपकलेले दिसत आहेत. विज्ञान निरीक्षण, अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग यांवर विश्वास ठेवते. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे कोणत्याही प्रकारची साधना व दैवी शक्ती नाही हे समजुन घ्यायची गरज असल्याचे स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

चमत्कार मागे हातचालाखी किंवा विज्ञान ह्या दोन गोष्टी असतात. ह्याच विज्ञानाचा आधार घेऊन चमत्कार केले जातात ज्याला दैवी शक्तीचं नाव दिले जाते. मानवी शरीर हे मलमूत्रची गटार आहे. विविध मार्गातून शरीरातील द्रव्ये ही बाहेर टाकली जातात. त्याचप्रमाणे घामामध्ये “सिबम” नावाचा चिकट द्रव्य असतो. तो घामावाटे शरीरातून बाहेर पडतो व त्वचेवर राहतो. जर खरोखरच अंगामध्ये चुंबकीय शक्ती असेल तर जमिनीवर ठेवलेल्या वस्तू ही बोटाने स्पर्श करून उचलता यायला हव्यात. तसेच अंगात चुंबकीय शक्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी घरात थांबू नये कारण घरातील किंवा आसपासच्या सर्व वस्तू अंगावर येऊन चिपकतील. तरीही डोळस होऊन एखाद्या चमत्कारामागील कारणमीमांसा समजुन घ्यायला हवी असेही शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन व जागर विज्ञानाचा कार्यक्रम शाहिर स्वप्नील शिरसाठ हे ठिकठिकाणी सादर करत असतात त्यात ते विविध चमत्कारांची उकल ही करत असतात. बुवाबाजी विरोधात संघर्ष करणाऱ्यांनी स्वतःवर ठाम विश्वास ठेवायला हवा. भूलथापांना बळी पडू नये चिकित्सक होऊन एखाद्या गोष्टींमगील कारणे शोधली पाहीजेत. स्वतःला व इतरांनाही बुवाबाजी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. कारण संतांनी समाजसुधारकांनी त्यासाठीच आपले आयुष्य वेचले होते असेही ह्यावेळी शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

मुरबाड तालुक्यात अतिवृष्टी मुळे अनेक घरांचे नुकसान

हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली असून गरीब कुटुंबांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे.

मुरबाड तालुक्यात अनेक आदिवासी खेडी पाडी असून त्यातील बहुतांश गावातील लोकांची घरे ही आजही कौलारू आहेत. निसर्गाचाच्या बदलांचा फटका या भागाला नेहमीच बसत असतो .बहुतांश या भागातील लोक हे भात शेतीवर अवलबून आहेत. इतर वेळी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातील काही गावांमध्ये लोकांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले.

अशीच एक दुर्घटना शुक्रवारी धसई जवळील महाज गावा मध्ये घडली असून आनंद नागवंशी यांचे घर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊन मुळे कामधंदे नसल्या कारणाने पुन्हा घर कसे उभे करायचे हा प्रश्न सध्या आनंद नागवंशी याच्या पुढे येऊन ठेपलाय. स्थानिक प्रशासनाकडे त्यांनी अनेक वेळा घरकुल योजनेसाठी पाठ पुरावा केला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांना या योजेने पासून आजही वंचित ठेवण्यात आले असल्याचे ते सांगतात. सदर घराची मी घरपट्टी भरत असून देखील मला घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही या उलट जे गावात कित्येक वर्षापासून राहत नाही अश्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप नागवंशी यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे. सदर घटनेचा स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून मला तत्काळ आर्थिक मदत शासना कडून मिळवून द्यावी एवढी माफक अपेक्षा नागवंशी यांनी केली आहे.