“राजसाहेबांच्या बोलण्याचा विपर्यास करून वेगळा अर्थ काढला जातोय” – मनसे आमदार राजू पाटील

नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाच्या नामकरणासाठी सध्या मुंबईत आंदोलन सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. मात्र त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करून वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोर्चात सहभागी होत असल्याचे देखील सांगितले आहे.

“मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला.

राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो.

आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांच्या कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत. त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.

म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.”

– राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)

-संतोष दिवाडकर

सोयीसुविधांचा बोजवारा उडालेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका आयुक्त

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कात टाकणार असून रुग्णालयाला सुसज्ज आणी अत्याधुनिक कसं करता येईल यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी करून घेतली आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असल्यामुळे रेल्वे स्थानकानजिक असलेल्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी दिसून येते. या रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट देवून रुग्णालयाची पाहणी केली. ही पाहणी करतांना त्यांनी रुग्णालयामागे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही भेट देवून तेथिल पाहणी केली.

रुक्मिणीबाई रुग्णालयामागे तळ मजल्यावर ऑक्सिजन प्लँटसाठी राखीव असलेल्या जागेची देखील त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील मेल वॉर्ड, फिमेल वॉर्ड, मॅटर्निटी वॉर्ड यांना भेट देवून तेथे सुधारणा करणेबाबत संबंधितांना सुचना दिल्या. यावेळी त्यांनी पहिल्या मजल्यावर काम सुरु असलेल्या १०  खाटांच्या अतिदक्षता कक्षाची तसेच मॉडयुलर ऑपरेशन थिएटर यांची पाहणी केली.

   रुक्मिणीबाई रुग्णालय हे कल्याण मधील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात मोठया प्रमाणात ओपीडीला गर्दी असते, या रुग्णालयाचे एक वेगळेच महत्व आहे. शास्त्रीनगरच्या धर्तीवर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आजूबाजूस सिटी स्कॅन आणि एम.आय. आर. ची सुविधा कुठे करता येईल, एक सुसज्ज रुग्णालय कसे उभे करता येईल, याचे नियोजन करण्यासाठी रुग्णालयाची पाहणी केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.  

यावेळी वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता भालचंद्र नेमाडे, वैदयकीय अधिकारी समिर सरवणकर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

टिटवाळ्यात आढळला दुर्मीळ ‘सिसिलिअन’ उभयचर जीव

टिटवाळ्यातील  काळू नदीलगत सापासारखा जीव सोमवारी रात्रीच्या सुमारास रोड क्रॉस करताना नागरिकांना आढळून आला. त्याच्या पाठीवर जखम झाली होती त्याला कोणीतरी दगड मारून जखमी केल्याचा अंदाज होता. स्थानिक नागरिकांनी वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या हेल्पलाईनवर फोन करून याची माहीती दिली तेव्हा टिटवाळा टिमचे सर्पमित्र धनुष वेखंडे व सुमित भडांगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर जीव सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. प्रथमदर्शनी हा मांडूळ  असल्याचा भास झाला परंतू कल्याण येथील वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडे संपर्क साधला व ओळख निश्चित करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. वरद गिरी, सरिसृप संशोधक यांची मदत मिळाली.

या जीवाला शास्त्रीय भाषेत  इंग्लिश मध्ये  बॉम्बे सिसिलिअन व मराठीत देवगांडूळ असे म्हणतात. हा उभयचर असून पाणि व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहतो याचे मुख्य अन्न गांडूळ आहे तसेच स्वः संरक्षणासाठी स्वतःच्या शरीरावर चिकट स्त्राव  सोडतो त्यामुळे त्याचे शरीर खुप गुळगुळीत होते म्हणूनच त्याला शिकारीकडून सहज पकडणे सहज शक्य होत नाही. हा जीव प्रमुख्याने पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. टाचणी च्या आकाराचे सहज न दिसणारे डोळे व गोलाकार रिंगण असलेले शरीर यावरून त्याची ओळख निश्चित करता येते. अशा जीवाला वाचविण्यात वॉर रेस्क्यू फाऊंडेशनच्या टिमला यश आले आहे.

हा सिसिलिअन उभयचर जीवाला वनविभागाच्या परवानगीने कल्याण येथील खासगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायभोले यांनी  प्रथमोपचार केला असून तज्ञव्यक्ती व वनविभागाच्या परवानगीने शास्त्रीय नोंदी घेऊन त्याला निर्सगमुक्त करण्यात येईल अशी माहिती   वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार (वन्यजीव अभ्यासक) यांनी दिली.

कल्याण डोंबिवली व टिटवाळ्यातील जैवविविधतेचा परिपूर्ण अभ्यास करून असून वन्यजीव व इतर जीवाची नोंद करणे अत्यावश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य व कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेत जैवविविधता नोंद वही असून त्यात या उभयचर वर्गातील सिसिलिअन (देवगांडूळ) याची नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे  वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगीतले.

-कुणाल म्हात्रे

भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची केली जातेय मागणी

बदलापूरपर्यंत मंजूर केलेल्या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करावा, भिवंडी-कल्याण मेट्रोच्या निविदा काढाव्यात आणि भिवंडी तालुक्यातील ६० गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून सुविधा द्याव्यात, आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांच्याकडे केल्या आहेत. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन श्रीनिवासन यांनी दिले आहेत.

खासदार कपिल पाटील यांनी आयुक्त श्रीनिवासन यांची काल भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एमएमआरडीच्या क्षेत्रातील प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहरासाठी मेट्रो मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचा अद्यापि सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केलेला नाही. बदलापूरहून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या नागरीकांना रस्तेमार्गाने वाहतूककोंडी व लोकलने गर्दीचा सामना करावा लागत आहे. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कल्याण ते भिवंडी मार्गाच्या निविदा अद्यापी काढण्यात आलेल्या नाहीत. या मार्गाचे काम वेगाने झाल्यास लोकलसेवेवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांची सुविधा होईल, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधून कामाच्या निविदा काढण्याची मागणी केली. एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या ६० गावांतील कामांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करावा. तसेच या गावांना जोडणारा रिंग रोड तयार करून पिण्याचे पाणी, पथदिवे, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात आदी मागण्या खासदार कपिल पाटील यांनी केल्या आहेत.

-कुणाल म्हात्रे

पगार न मिळाल्याने केडीएमसी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर चौकात कामगारांनी एकत्र येऊन कचरा गाड्या रस्त्यावर उभ्या करत कचरा उचलण्यास नकार दिला. केडीएमसीमध्ये घंटागाड्यांवर  सुमारे २५० कामगार काम करत असून त्यापैकी ५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. तर याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास उद्या हे आंदोलन चिघळण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

       कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रातील ३ प्रभागात खासगी कंत्राटदारामार्फत कचरा उचलण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र संबंधित कंपनीकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देण्यासह अर्धवट पगार मिळत असल्याचे सांगत आज सकाळी या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले. कल्याण पश्चिमेतील या ३ प्रभागातील कचरा न उचलता त्याशेजारी कचऱ्याच्या गाड्या नेऊन उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे तिन्ही प्रभागात सकाळपासून रस्त्यावर कचरा तसाच पडलेला होता.

       महापालिका कर्मचाऱ्यांइतकेच काम करूनही आम्हाला कंत्राटदाराकडून वेळेमध्ये योग्य प्रकारे पगार दिला जात नाही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांमधील वादामुळे हे आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. कामामध्ये अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड केला. ज्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली, जी अत्यंत चुकीची बाब आहे. यापूढे असे प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

विकृत मुलाने वयोवृद्ध आई बापावर केला लाठीमार ; आईचा मृत्यू तर बाप जखमी

रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा उजेडात आली आहे. शिरूर तालुक्यातील एका विकृत मुलान आपल्या जन्मदात्या वयोवृध्द आई वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत उपचारादरम्यान त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर जखमी वडिलांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे संपूर्ण जग फादर डे साजरा करीत होत तर शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मात्र एक विकृत आपल्या जन्मदात्या आई बापावर काठीने हल्ला करीत होता. बाबासाहेब खेडकर असं या विकृत मुलाचं नाव आहे. ज्या आई बापाने या बाबसाहेबाला वाढवलं, मोठं केलं त्याच आई बापांना हा मुलगा इतक्या क्रूरतेने मारताना या व्हडीओ मध्ये दिसतोय.

७० वर्षीय शहाबाई खेडकर आणि ७५ वर्षीय त्रिंबक खेडकर जिवाच्या आकांताने घाव सोसत विव्हळत होते. “धावा धावा पांडुरंगा” अशी आर्त साद त्याचे वडील घालत होते. मदतीसाठी ते दुरून पाहणाऱ्या जमावाला हाक मारत होते. जवळपास गावकरी शेजारीपाजारी जमले होते. मात्र कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हता. त्यातीलच एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले. जर कुणी पुढे गेला असता आणि सैतानी वृत्तीच्या त्या निर्दयी मुलाला थांबवलं असत तर त्याला जन्म देणाऱ्या माऊलीचा जीव नक्कीच वाचला असता. मात्र जो पर्यंत गावकऱ्यांनी मध्यस्थी केली तोपर्यंत उशीर झाला होता. मारहाण झालेल्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दुर्दैवाने त्या माउलीला मृत घोषित करण्यात आले. तर पित्यावर अद्याप उपचार सूरु आहेत.

बीड रिपोर्टर डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार या घटने विरोधात पोलीस ठाण्यात भा द वि कलम 302 307 आणि 323 अनव्ये गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. शिवाय आरोपीला देखील जेरबंद करन्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा हा मानसिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जाचाला कंटाळून पत्नी देखील माहेरी निघून गेली असल्याची माहिती मिळाली आहे. या विकृतीचे आई वडील देखील आपल्या लेकीकडे राहतात. मात्र आपल्या लेकाला कोरोना झाल्याचे समजल्याने जीवाची पर्वा न करता दोघेही आपल्या मुलाला भेटायला घरी परतले होते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गुम्ह्णाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरोक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत

आई वडील जन्म देतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना वाढवतात आणि काही विकृत मुलं त्याचे असे पांग फेडताना दिसतात. जन्मदात्या माता पित्यांना मारहाण करण्यासाठी यांचे मन आणि हात कसे धजावतात हे समजायला कठीणच. पण गुन्हा घडला आहे आणि आता अशा विकृतांना धडा शिकवला जाणं ही काळाची गरज बनू लागली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ

-संतोष दिवाडकर