अवघ्या काही तासांत पोलिसांनी शोधला चार वर्षांचा हरवलेला मुलगा

आज दि.२४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास खडेगोळवली कल्याण पूर्व येथून एक चार वर्षांचा मुलगा हरवला होता. पोलिसांना खबर दिल्या नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या मुलाचा शोध लावला आणि त्याला पालकांच्या हवाली केले.

वेदांत अनिल सिंग हा ३ वर्षे ११ महिन्यांचा मुलगा सायंकाळी पाऊने सहाच्या दरम्यान खडेगोळवली परिसरातून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, विचारपूस केली मात्र तो कुठेही सापडला नाही. वेदांतला कुणी तरी पळवून नेले असावे असा संशय त्यांना बळावला आणि भेदरलेल्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, क्राईम पोलीस सर्जेराव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे आणि सर्व टीमने आपले संपर्क वापरून नागरिकांना याबाबत अवगत केले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. आणि काही तासानंतर शोध घेताना हा हरवलेला बालक सापडला. त्यानंतर या बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी कमी वेळात घेतलेल्या या शोधाचे निश्चितच कौतुक होणे साहजिक आहे.

-संतोष दिवाडकर

“… तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव देखील राहणार नाही” – आमदार गणपत गायकवाड

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सिडको येथे आज भूमिपुत्रांकडून आंदोलन केले गेले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले.

बहुजनांचे नेते म्हणून दि.बा.पाटील यांनी लढा दिला होता. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले होते. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला देण्यात यावे याकरिता भूमिपुत्रांनी एल्गार पुकारला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहिले होते. कल्याण पुर्वेचे गणपत गायकवाड हे देखील आपल्या समाजासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव असेल. उद्धव साहेबांनी त्याच्या आड येऊ नये. स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आगरी,कोळी,कुणबी आणि आणखी काही समाज तसेच धर्मातील लोकही समाविष्ट आहेत. त्यामुळे ही सर्वांची एकजुटीने केलेली मागणी आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रच आहेत. जर हे सर्व भूमिपुत्र तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव देखील राहणार नाही. अशी घणाघाती टीका आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केली. दि.बा.पाटील यांच्या नावासाठी कल्याण पूर्वचे आमदार आधीपासूनच आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत विनंती देखील केली आहे.

-संतोष दिवाडकर

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ; संपादकाने केला दावा

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणायचे असतील, तर या देशाला हिंदु राष्ट्र करण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’, या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यू-ट्यूब आणि ट्वीटर यांवर ३,२०२ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.

 महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास शिकवला जात नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रशासनाची ‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था’ अर्थात् एन्.सी.ई.आर्.टी. अर्ध्या पानांपेक्षा अधिक इतिहास शिकवायला सिद्ध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरातमध्ये, तर येडीयुरप्पा यांच्यामुळे कर्नाटक राज्यात थोडासा इतिहास वाढवला गेला आहे; मात्र देशात शिवछत्रपतींचे विचार संपवण्याचे कारस्थान चालू आहे. देशाची शासनव्यवस्था ‘छत्रपती शिवराय हे आदर्श हिंदू राजे होते’ हे देशातील तरुणांना शिकवू देत नाही. आज देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेण्यापूर्वी जशी स्थिती होती, तशी स्थिती आहे. केवळ शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु साम्राज्य दिन साजरा करून उपयोग नाही. काशी-मथुरा मुक्त करण्याचा शिवरायांचा संकल्प होता असे देखील सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.

या वेळी बोलतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी पाच इस्लामी आक्रमकांचा निःपात करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी राज्याभिषेक करून भाषा पुनरुज्जीवित केली. स्वतःचा राज्यव्यवहारकोश संस्कृत भाषेत आणला. राज्य संस्थापनेला त्यांनी धर्म संस्थापनेचे स्वरूप दिले. याउलट वर्ष १९४७ मध्ये आपणास स्वातंत्र्य मिळाले; पण राज्य संस्थापना झाली नाही, असे म्हणावेसे वाटते; कारण ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना दडपण्यासाठी आणलेला वर्ष १८६०  चा ‘इंडियन पिनल कोड’ अद्याप लागू आहे. भारतावर कायमस्वरूपी राज्य करण्यासाठी आणलेला ‘इंडियन गव्हर्नन्स अ‍ॅक्ट १९३५  हा राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच अंतर्भूत केला आहे.  गुरुकुल परंपरा बंद पाडण्यासाठी कायदा करून चालू केलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती अद्याप चालू आहे. अरबी, इंग्रजी आक्रमकांनी आपल्या रस्ते-वास्तूंना दिलेली नावे आपण पालटलेली नाहीत.

४५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कोणाला विचारायला गेले नव्हते. औरंगजेब, आदिलशाह, कुतबशाह आदी मुघल राजांची अनुमती घेतली नव्हती. मुठभर मावळ्यांना एकत्र करून शपथ घेतली. नंतर स्वत:चे सैन्य, शस्त्रागार, आरमार, हिंदूंची पाडलेली मंदिरे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तो आदर्श हिंदूंनी घ्यायला हवा. आजही आपण या एका ध्येयाने संघटित झालो, तर या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करू शकतो. हे करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास  यावेळी विश्‍व हिंदु परिषदेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य विवेक सिन्नरकर यांनी व्यक्त केला.

-कुणाल म्हात्रे

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची झाली निवड

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी कल्याणमधील सुजित रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रीय सरचिटणीस, कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र रोकडे यांना दिले आहे.

       राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मान्यतेने सुजित रोकडे यांची कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी तर आदित्य चव्हाण यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा रोकडे यांच्या नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.

       सुजित रोकडे हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सक्रीय असून कल्याणमध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य असे अनेक उपक्रम पक्षाच्या माध्यमातून राबविले आहेत. पक्षाने आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुजित रोकडे यांनी यावेळी सांगितले.

-कुणाल म्हात्रे