वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी उभारलं सावित्रीबाईंचे तोडलेले घर

कल्याण तालुक्यातील चवरे येथे वनविभागाच्या कारवाईत जमीनदोस्त केलेले सावित्री बबन फसाळे या कातकरी विधवा महिलेचे घर श्रमजीवी संघटनेच्या सावित्रीनी वटपौर्णिमेच्या दिवशी भर पावसात बांधून पूर्ण केले.

पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून बांधत असलेल्या आदिवासी महिलेच्या घरावर वन विभागाने कारवाई करत हे घर जमीनदोस्त केले होते. वनविभागाच्या या कारवाईनंतर श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढत या कारवाईचा निषेध करण्यात आला होता. तसेच संबंधीतांवर कारवाई करत त्या आदिवासी महिलेला घर बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. तर प्रशासनाने घर बांधून न दिल्यास श्रमजीवी संघटना घर बांधून देईल असेही सांगण्यात आले होते.

मोर्चा मध्ये संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर यांनी ठरवल्या प्रमाणे कल्याण तालुक्यातील श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यां घर बांधणी साठी उभ्या राहिल्या व सावित्रीबाई यांच घर एका दिवसात उभ करून दिले. भर पावसात आपला संसार उघड्या वर आलेल्या सावित्रीच्या डोळ्यात यावेळी आपलं घर परत उभ राहील म्हणून आनंदश्रू होते. संघटनेच्या सभासद यांनी श्रमदानंतून हे घर पूर्ण करून दिले.

यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, तालुका कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, जिजा वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे आदी कार्यकर्ते पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

ओबीसी आरक्षणासाठी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांनी केला रास्ता रोको

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाल्याची टीका कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, गणेश भाने, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, नरेद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले, यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  

            ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करणा:या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करुन नंतर सोडून देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणरुपी हक्क हिरावून घेतला, त्याविरोधात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा द्यायला आज श्रीराम चौक, सूचक नाका,  कल्याण पूर्व येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी आम्ही अशाच प्रकारे यापुढे देखील संघर्ष करीत राहू अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. 

-कुणाल म्हात्रे

वीजबिल वसुलीला गती द्या ; अन्यथा कारवाई – महावितरणच्या वाणिज्य संचालकांचा ईशारा

महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.

-कुणाल म्हात्रे

‘क.डों.म.पा.’ला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार ; वाराणसी आणि कल्याण डोंबिवली संयुक्त विजेते

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19  इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना  संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत   25 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये  स्मार्ट सिटी ॲवार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यातील निवडीचे निकष हे मुख्यत: केलेल्या कामाच्या गुणवत्तेशी निगडीत होते.

स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत सन 2016 पासून विविध टप्‍प्यांमध्ये एकुण 100 शहरांची निवड केली होती. यातील पहिल्या टप्प्यात 20, दुस-या टप्प्यात 40, तिस-या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता. या स्पर्धेसाठी टप्पेनिहाय पारितोषिकांसाठी वेगवेगळी संवर्गात निवड प्रक्रिया जाहिर करण्यात आली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंन्ट कार्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने “कोविड इन्होवेशन अवॉर्ड” या गटासाठी नामांकन सादर केले होते. एकुण निवड प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात सर्व शहरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या एकंदरीत कामगिरीसाठी बाद फेरी तत्वाप्रमाणे काही निकष ठरविण्यात आले होते. 

दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड केली गेली होती. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेले हे ॲर्वाड म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे,  कोविड कालावधीत महापालिकेल्या मदत करणा-या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी / कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळयांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपध्दती यापुढीही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

-संतोष दिवाडकर