कल्याण डोंबिवलीत सोमवारपासून नवे नियम ; आठवड्याभरानंतर पुन्हा आवळला निर्बंधांचा फास

कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते.  मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नविन आदेश नुकतेच जारी केले आहेत.  

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स  यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. 

कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाली 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 

खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. असे 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत.  सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

वृक्ष लागवड करून शंभुदुर्ग प्रतिष्ठाणतर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा या संस्थेने सामाजिक वारसा जपत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शेरे व वेहले या गावालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वृक्षलागवड कार्यक्रमात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील संस्थेच्या शेकडो कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शेकडो झाडांची लागवड केली.

शिवभाळू, जांभूळ, आपटा,चिंच, गुलमोहर, आणि धामण आदी प्रकारची झाडांची लागवड केली असून या झाडांचे संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेने घेतली असल्याचे संस्थेचे संस्थापक आदेश चौधरी यांनी सांगितले. शंभुदुर्ग प्रतिष्ठाण ही संस्था स्थापना काळापासून संपूर्ण ठाणे जिल्हात सतत दुर्गसंवर्धन, सामाजिक उपक्रम, आपत्कालीन मदतीचे उपक्रम,तसेच धार्मिक उपक्रम राबवत असल्याने संस्था कार्याची दखल घेऊन मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी संस्थेच्या संपूर्ण कार्यकारणीला सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

-कुणाल म्हात्रे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्यावतीने वृक्षारोपण

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आणि छ. शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी कल्याण पूर्वेकडील, पत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला.

संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छ. शाहू महाराजांना अभिवादन करून नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  पळस, महोगनी, जांभूळ, सीताफळ, साग, बांबू, पळस, बकुळ आदी प्रकारची ३० रोपे लावण्यात आली.

महा. अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास ‘समता संघर्ष’ संघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, ‘पुरोगामी विचार मंच’चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडे, व्यावसायिक जगदीश ठाकूर, ‘अंघोळीची गोळी’ मोहिमेचे  तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, महा. अंनिस कल्याण, डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, जिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

वृक्षारोपणासाठी जागा निवडणे, खड्डे खोदणे, कार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनी, नियोजनासाठी शरद लोखंडे, दत्ता बोंबे, तानाजी सत्वधीर, शुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली.वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना समजाऊन सांगितली तसेच केवळ वृक्षारोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मधून मधून वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी अंघोळीची गोळी, खिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली.

-कुणाल म्हात्रे

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांवर कौतुकांचा वर्षाव ; मुख्यमंत्र्यांनीही फोनद्वारे केले अभिनंदन

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी देखील आयुक्तांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. समाजातील सर्वच स्तरातून मनपा आयुक्तचे कौतुक होत असुन कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शनिवारी आयुक्तांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव रामचंद्र औटी, माजी अध्यक्ष कालीदास कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ माने हे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक करीत कल्याण डोंबिवली शहराची विकास कामांची प्रगती होत नावलैविक वाढेल अशा शुभेच्छा दिल्या.

कल्याण डोबिवली ठेकेदार आसोशियनचे पदाधिकारी सिद्धार्थ माने यांनी सामाजिक बांधलिकितुन तळागाळातील एका कामगाराचा वर्षभरासाठी विमा काढण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधलिकितुन समाजातुन असे नागरिक पुढे येणे हे सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीच्या या यशामुळे येथे राबविलेले प्रकल्प पाहणी करण्यासाठी  इतर महानगरपालिकांचे आयुक्त देखील येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे