ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर म्हणून नोंद ; मुंबई विद्यापीठाकडे तक्रार प्राप्त

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देऊनही गैरहजर दाखविले आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.  अश्या काही विद्यार्थ्यांची तक्रार विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे आली अशी माहिती विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.

   विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांची भेट घेत संबंधित विषयावर चर्चा केली व पत्रव्यवहार करत  विद्यार्थ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावं असे आव्हान विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा जया गणाई यांनी केले.

    परीक्षा विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांनी तक्रार आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे डिटेल्स मागवून त्या महाविद्यालयातील जबाबदार पदाधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले असल्याची माहिती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी दिली.

विद्यापीठासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा असे आवाहन विद्यार्थी भारतीच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. 9321638034 / 8097834167 / 8104571787

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व कर्पेवाडीतील शाळेची जीर्ण इमारत महापालिकेने केली जमीनदोस्त

कल्याण डोंबिवली महापलिका परिसरातील जे प्रभाग क्षेत्रातील कर्पेवाडी येथील द्वारका शाळा ही इमारत ३० वर्षापूर्वीची असून या इमारतीतील शाळा गेल्या १० वर्षापासून बंद आहे. हि इमारत जीर्ण झालेली आहे, या इमारतीत गर्दुले व समाज कंटक बसत असून त्यांचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी केडीएमसीकडे प्राप्त झाल्या होत्या. 

या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीट नुसार ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे या शाळा इमारतीच्या मालकांस नोटीस बजावून इमारत निष्कासीत करणेबाबत कळवूनही संबंधितांनी ही इमारत निष्‍कासीत केली नाही. यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार व विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रभागक्षेञ अधिकारी वसंत भोंगाडे यांनी जे प्रभागातील अतिक्रमण निमुर्लन पथक, महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपअभियंता सुनिल वैदय, कनिष्ठ अभियंता धर्मेद्र गोसावी यांच्या मदतीने व 1 जेसीबी, 1 ब्रेकर,1 गॅस कटरचा वापर करून काल दिवसभर सदर धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई केली असून आज हि कारवाई पूर्ण करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

अखेर दीड वर्षांनंतर कल्याण डोंबिवलीच्या सर्वात मोठ्या कोविड सेंटरला महापालिका आयुक्तांनी ठोकले टाळे ; टाटा आमंत्रा बंद

टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला.  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्या-या डॉक्टर्स,  नर्सेस,  वॉडबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी निरोप समारंभात बोलतांना त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. 

टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले,  हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणा-या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ,  प्रमोद मोरे, डॉ. दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले.

 टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.

        महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलासॉफर, गाईड,  फ्रेन्ड आहेत.  त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुस-या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.  भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणा-या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले.  आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत, असेही पुढे ते म्हणाले.

        कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती.  अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत 40 हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.  त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळीउपायुक्त  रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत शेकडो बुलेट सायलेन्सरवर फिरवला रोडरॉलर ; आता गॅरेज वाल्यांची धरणार गचंडी

मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून यापुढे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या वतीने १०३ मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करत हे मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर ठाकुर्ली येथील ९० फुट रोड, म्हसोबा चौक येथे रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

डोंबिवली शहरातील काही दुचाकी स्वार, आपल्या दुचाकीस कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असतात यामुळे ध्वनिप्रदुषण होत असून, आवाजामुळे सामान्य जनता विशेष करून वयोवृध्द नागरीक, रूग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.

या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहा पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, पोलीस उप निरीक्षक नवनाथ चव्हाण, वाहतुक पोलीस अंमलदार, यांनी डोंबिवली शहरात विशेष मोहिम राबवून एकुण ८३ मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तसेच कोळसेवाडी वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिरसाट, पोलीस उप निरीक्षक काशीनाथ चौधरी व वाहतुक पोलीस अंमलदार कोळसेवाडी यांनी कोळसेवाडी वाहतुक शाखेची हद्दी मध्ये २० मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेले एकुण १०३ सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत आर.टी.ओ.कडून खात्री केली असुन, हे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशिर असल्याने त्याचा परत कोणाकडून वापर होऊ नये यांकरीता ते आज म्हासोबाचौक, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व या रस्त्यावर मांडुन त्यावर रोलर फिरविण्यात आला.

यापुढेही वाहतूक पोलिसांच्या वतीने मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्यात येणार असून हे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे