मलंगगडच्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ; गावकऱ्यांनी बांबूंचा दिला आधार

खोणी-तळोजा महामार्गाच्या जवळपास असलेल्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सध्या या पुलाचे संरक्षक कठडे कोसळले असून पुलाच्या कठड्यांना बांबूच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने कोसळण्याची भीती व्यक्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या चिरड शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरून नागरिक ये-जा करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचं हे दुर्लक्ष अपघातांना निमंत्रण देऊ शकत असं येथील लोकांचं म्हणणं आहे.

माजी मंत्री शबीर शेख यांच्या कार्यकाळात २६-२७ वर्षांपूर्वी या पुलाचे काम झाले होते. मात्र त्या नंतर या पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम झालं नसल्याने सध्या या पुलावर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. चिरड गाव हा खोणी तळोजा या महामार्गाला लागूंन असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून ये जा होत असते. त्यामुळे या पुलावर अपघात होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बांबुच्या काठ्यांचा आधार दिला आहे. मात्र अधिक पाऊस झाला आणि या पुलामुळे अपघात घडल्या नंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-संदेश दाभणे

“खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे…आपल्याला अशीच माणसं आवडतात” – हिंदुस्थानी भाऊ राज ठाकरेंच्या भेटीला

संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेला व ज्याने समाज माध्यमातून लोकांमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण अशा हिंदुस्थानी भाऊ ने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली व त्यानंतर राज ठाकरेंबद्दल बोलताना त्याने आपल्या शैलीतून उत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणातून रोखठोक मुद्दे मांडत असतात. सध्या एकच आमदार असला तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन खूप अधिक आहे. त्याचबरोबर लोकप्रियता देखील तितकीच लाभली आहे. रोखठोक बोलण्याच्या बाबतीत हिंदुस्थानी भाऊ देखील देशभरात प्रसिद्ध आहे. तोंडातून निम्म्या शिव्या हसडणारा पण चांगल्या वाईटाची पारख असल्याने भाऊला देखील लोकांचे प्रेम लाभले आहे. मुळात पाकिस्तानला भाऊने सळो की पळो करून सोडले आहे. तरी काही प्रमाणात भाऊच्या स्टाईलवर फिदा झालेले फेन पाकिस्तानात देखील आहेत.

कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्या पुढाकाराने मराठी चित्रपट, टीव्ही क्षेत्रातील मान्यवरांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेऊन त्यांना परप्रांतीय युनियनच्या दादागिरीमुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी अमेय खोपकर यांच्या समवेत हिंदुस्थानी भाऊ देखील राज ठाकरेंच्या भेटीला गेला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

हिंदुस्थानी भाऊंनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यानंतर बाहेरील उपस्थित जमावाने भाऊंना भेटीबाबत विचारले असता भाऊने देखील त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. “खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे… आपल्याला अशीच माणसं आवडतात” असे उद्गार त्याने गाडीत बसण्यापूर्वी काढले. सध्या हा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल होऊ लागला आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये राष्ट्रवादीत धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      ३० जानेवारी २०२० रोजी प्रसाद महाजन यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्णता लाकडाऊन लावण्यात आल्याने सर्व कॉलेज शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणे शक्य नव्हते. अशातही महाजन यांनी संपर्कातील राष्ट्रवादी विचारांशी एकनिष्ठ असणारया विद्यार्थ्यांशी संपर्क करुन संघटना बांधणी सुरू केली. विद्यार्थी संघटना वाढीस सुरवात केली.

 या नियुक्तीला कालावधी १६ महीनेही पुर्ण झालेला नसताना अचानकपणे जुन २०२१ मध्ये विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पदमुक्त करण्यात आले. पक्षातील एक धनदांडग्यांचा गट संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील गरिब कार्यकर्ताचा छळ करत अपमानास्पद वागणूक देत सतत हेटाळणी करत असल्याचा आरोप प्रसाद महाजन यांनी केला आहे.

या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे हे जावाबदार असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला असल्याचे महाजन यांचे म्हणणे असून याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून याविषयी सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याचे शाश्वत आश्वासन पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांना विचारले असता, प्रसाद महाजन हा मूळचा शिवसैनिक त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसादकडे असताना संघटनेचे काम असमाधान कारक होते. त्या मुळे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिफारशी वरून सुजित रोकडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात युवा सेनेचा प्रवेश होत असून प्रसाद महाजन हे आरोप जाणीवपूर्वक सुपारी घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे