अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने कल्याण तालुक्यातील भातलावणीला वेग

गेल्या दहा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने बळीराजा मात्र खूप सुखावला आहे. यामुळे भातशेती लावणीच्या कामाची लगबग सुरू झाली  आहे. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात भातलावणीच्या म्हणजे आवणीच्या कामाला जोरात सुरुवात झाली आहे.

कल्याण तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे भाताचे होय. परंतु पेरणी नंतर दहा दिवस पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पावसाने घेतलेल्या उघडीपिमुळे शेतकरी राजा कमालीचा हवालदिल झाला होता. मात्र दोन दिवसांपासून काही प्रमाणात पडत असणारा पाऊस हा शेतीच्या लागवडीसाठी पूरक असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे.  यामुळे शेतीची भात लागवडीचे काम करण्यासाठी शेतकरी राजा शेतात उतरला आहे. 

जागोजागी भातलागवडीची कामे करत असणारा शेतकरी वर्ग दिसून येत आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. परंतु अजून जास्त पावसाची गरज असून जोराचा  पाऊस शेतीला मिळाला तर भाताचे पीक चांगले येत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

-कुणाल म्हात्रे

मावळ : वाघेश्वर शिवमंदिर परिसरातील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात आल्या नंतर येथे पर्यटकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. मात्र त्याचबरोबर या मंदिरात भेट देण्यासाठी आलेल्या एका युवकाचा परिसरातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाघेश्वर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल केल्याने आता बाहेरील लोक देखील मंदिराला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंबंधीत लेख MH मराठीने मागील महिन्यात प्रसिद्ध केला होता. शनिवार,रविवार आणि सोमवार हे तीन दिवस या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मुळातच हे मंदिर पवना धरण क्षेत्रात असल्याने वर्षातून निम्मा काळ हे मंदिर पाण्याखाली असते. आणि जवळच असलेल्या पवना धरणाच्या जलाशयात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

रविवारी पुण्यातील खडकी येथील राहणारा शुभम दुधाळ हा २१ वर्षीय तरुण आपल्या सहा मित्रांसोबत या मंदिराला भेट देण्यासाठी आला होता. मंदिर पाहून त्याने दर्शन केले आणि या मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो देखील घेतले. मात्र मंदिरा जवळ असलेल्या पवना धरणाच्या विहंगम दृश्याने त्यांना मोहित केले. आणि येथूनच पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. दुपारच्या सुमारास शुभम पाण्यात उतरला. मंदिरा जवळील धरण क्षेत्रात ओढ्यातून वाहून आलेला गाळ अधिक प्रमाणात असतो हे स्थानिकांना माहीत आहे. शिवाय येथील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडल्या बाजूस साधारणपणे एक किमी पासून दूरवर असलेल्या भागात ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्याकडून देण्यात आली.

तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह शोधून काढला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. दर्शनासाठी आलेल्या एखाद्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र असे असले तरी भविष्यात आणखी घटना घडतील याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यटनाला गेल्या नंतर निष्काळजीपणामुळे जीव गेल्याच्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. मग पाण्यात बुडुन मृत्यू असो की पाय घसरून खोल दरीत झालेला अपघात. या घटना वारंवार घडत असतात तरीही पर्यटक जीव धोक्यात घालणे काही कमी करीत नाहीत. वाघेश्वर शीव मंदिराला भेट दिल्यानंतर पवनेचा जलाशय जवळपासच असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतू नये यासाठी पुढील वर्षी (मंदिर पाण्यातून बाहेर पडल्यानंतर) स्थानिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना राबवणे प्रशासनाला जास्त गरजेचे असणार आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ७ मोठ्या बीओटी प्रकल्पांच्या नुकसानीची तातडीने चौकशी करावी -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

कल्याण डोबिंवली महापालिकेत सन २००५ ते २००८  दरम्यानच्या काळात  सात मोठे बीओटी प्रकल्प मंजूर करण्यात आले,  पण यामधील एकही प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या प्रकल्पांची चौकशी झाली व यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढला होता. तसेच या प्रकरणात २४ अधिका-यांवर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु सत्ताधा-यांनी ही चौकशीची फाईल लाल फितीत अडकून ठेवली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची  मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे, माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण- डोंबिवली महापालिकेतील कल्याण स्पोर्ट्स क्लब, सावळाराम महाराज क्रीडा व व्यापारी संकुल, आधारवाडी व्यापारी संकुल, लाल चौकी समाजमंदिर व व्यापारी संकुल, रुक्मिणीबाई पुनर्विकास व्यापारी संकुल, विठ्ठलवाडी मंडई व पार्किंग मॉल, दुर्गाडी पार्किंग संकुल असे सात मोठे प्रकल्प असुन या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रविण दरकेर यांनी केली.

   या प्रकल्पांमधील एकही प्रकल्प गेल्या १५ वर्षात पूर्ण झालेला नाही. कल्याण- डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. ये प्रकल्प गेली काही वर्षे रखडल्यामुळे कल्याणकरांना विकासासाठी वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे हे  रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी राज्यसरकारकडे केली असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

   राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, नगरविकास मंत्री ठाण्यातील आहे, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री आहेत, कल्याणमध्ये शिवसेनेचा खासदार व आमदार आहेत, महापालिकेमध्येही शिवसेनेची सत्ता आहे, पण एवढे सगळे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वया अभावी कल्याण डोंबिवलीची परिस्थिती सुधारलेली नाही. या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही, अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत, अशी टिका दरेकर यांनी केली.

   कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घरे व आस्थापनांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यासाठी आकारण्यात येणारे दर अथवा उपयोगकर्ता शुल्क तात्काळ दर रद्द करावेत अशी मागणी दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारकडे  केली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचरा संकलनासाठी  नव्याने रहिवाश्यांना वार्षिक रु.६०० प्रति घर तर व्यापारी वर्गाला वार्षिक रु.१८००० अवाजवी कर भरावा लागत आहे. कोरोना संकट काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असुन यातच अवाजवी कर आकरण्यात येत असून हा कर रद्द करावा किंवा कमी करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

   अन्य महापालिकेच्या तुलनेत येथील लसीकरण धीम्या गतीने सुरु आहे. गेले दोन आठवडे महापालिकेची लसीकरण केंद्र बंद आहेत. फक्त खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. मग त्यांना लस कुठुन उपलब्ध होत आहे. फक्त केडीएमसीतच लस तुटवडा आहे का?  असा सवाल करतानाच केडीएमसीमध्ये कोरोना संसर्ग रोखायचा असेल लसीकरण सूरू होणं मत्त्त्वाचे आहे. लवकरात लवकर हे लसीकरण सुरु करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

     ज्या नागरिकांच्या लसीचे दोन डोस झाले आहेत अश्या नागरिकांना कर्जत ते ठाणे असा रेल्वे प्रवासाची परवानगी देणे गरजेचे होते. कल्याण परिसरातून आपल्या उपजिविकेसाठी  मुंबईला दरदिवशी प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत. उपनगरीय लोकल सेवा बंद अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद असल्यामुळे त्या नागरिकांना  रस्ते मार्गाने कामावर जाण्या येण्यास एकूण ४ ते ५ तास प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे कल्याणकर हैराण झाले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारची अनुकुलता असेल तर  मुंबईची रेल्वे सेवा लवकरात लवकर सूरू करण्याची तयारी दर्शविली आहे. यापार्श्वभूमीवर रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

  महावितरणची अवाजवी बिले कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना येत आहे. सध्या कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. जे ग्राहक वीज बिल भरु शकत नाही, त्यांचीही वीज जोडणी सरसकट कापली जात आहे, त्यामुळे वीज ग्राहकांची वीज न कापता त्यांना महावितरणने सवलत अथवा टप्प्या टप्यात वीज बिल भरण्याकरीता मुभा द्यावी अशी मागणी दरेकरांनी केली.

-कुणाल म्हात्रे