कल्याणच्या गांधारी पुलावरील वाहतूक केली बंद; पुरामुळे पूल डॅमेज ?

कल्याण पडघा मार्गावर असलेला गांधारी पुल आज रात्रीच्या सुमारास वाहतुकीसाठी अचानकपणे प्रशासनाने बंद केला आहे. मागील काही दिवसांत आलेल्या पुरामुळे या पुलाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात असून उद्या PWD द्वारे पुलाची पाहणी होणार आहे.

कल्याणहुन पडघामार्गे नाशिकला जाण्यासाठी गांधारी पुलाचा वापर केला जातो. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. शिवाय स्थानिक गावकऱ्यांना कल्याणकडे येण्यासाठी हा सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावर गांधारी येथे असलेल्या खाडीवर एक मोठा पूल आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे या पुलाच्या पिलरला तडे गेले असल्याचा संशय प्रशासनाला लागून आहे. त्यामुळे कसलीही दुर्घटना टाळण्यासाठी पुलावरील वाहतुक सोमवारी रात्रीच्या दरम्यान प्रशासनाने तात्काळ बंद केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उद्या या पुलाची पाहणी होणार आहे. पाहणी दरम्यान पुलाचे नुकसान झाल्याचे आढळल्यास डागडुजीचे काम सुरू केले जाईल. पुलाच्या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष देखील लागू शकतात अशी शक्यता आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने पर्यायाने भिवंडी मार्गाचा अवलंब वाहनचालकांना करावा लागणार आहे. तसेच आसपासच्या गावातील गावकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार हे निश्चित.

-संतोष दिवाडकर

कल्याण मधील पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत करण्याची कॉंग्रेसने केली मागणी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे कल्याण मधील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. पुराच्या या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून याची भरपाई म्हणून पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत त्वरित देण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी आढाव यांच्यासमवेत कल्याण शहर अध्यक्ष विश्वास चिकणे, कार्याध्यक्ष रवी शिवाळे, सामजिक कार्यकर्ते प्रदीप गवाळे उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे कल्याणच्या विविध परिसरासह प्र.क्रं. १६, मिलिंद नगर घोलप नगर येथे संपुर्ण परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपुर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता. येथील नागरिकांचे व सर्व व्यापारी वर्गाचे खुप नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना काल खंडामध्ये लॉक डाऊन असल्यामुळे सर्व नागरिक हतबल झाले असताना या पुर परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती खुप बिकट झाली आहे. त्यामुळे या पूरपरिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून  प्रत्येकी कुटुंबास २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करण्याची मागणी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीतील कॅप्टन विनय कुमार सचान स्मारकावर भाजपने केला कारगिल विजय दिवस साजरा

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील कॅप्टन विनय कुमार सचान यांच्या स्मारका जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

२६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सरकारने पाकिस्तान सरकारला मान खाली घालण्यास भाग पाडले. त्या कारगिल युद्धामध्ये बरेच जवान शहीद झाले. अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले.

 कारगिल युद्धातील सर्व शहिदांना मनपूर्वक मानवंदना करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

लॉकडाऊनचं आर्थिक संकट आणि कल्याण पूर्वेत व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातील एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जनमत वृत्त संस्थेचे याच भागात वास्तव्यास असणारे पत्रकार आनंद गायकवाड यांनी आपल्या शब्दात एक लेख प्रसिद्ध केला आहे.

पत्रकार आनंद गायकवाड यांचा लेख खालीलप्रमाणे :-

गेली ३० ते ३५ वर्षे अनेक संकटांवर मात करीत आपल्या कुटूंबियांच्या उपजिविकेची समर्थ पणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कल्पाण पूर्वेतील एका प्रिन्टींग प्रेस व्यवसायीकाने लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडल्याने अखेर गळफास लावून आपले जिवन संपवल्याची ह्यदस्पर्शी घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावर सोमवारच्या रात्री घडली आहे . तिसगांव नाक्यावरील मातोश्री इमारती मध्ये रहाणारे बंडू श्रीराम पांडे असे या व्यवसायीकाचे नांव असून अवघ्या ५६ वर्षे वयाच्या या दुदैवी व्यवसायीकाच्या पश्चात पत्नी आशा ( ५१ ) विवाहीत मुली चेतना ( २८ ) , रोशनी ( २६ ) आणि अविवाहीत मुलगी श्रुतीका असा परिवार आहे.

वर्धा जिल्ह्यातील पुलगांव या आपल्या मुळगावाहून ८० च्या दशकात व्यवसाया निमित्त कल्याण पूर्वैत स्थानिक झाल्या नंतर बंडू पांडे यांचा ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिटींग प्रेस चा व्यवसाय मोठ्या जोमात चालला होता. गेल्या ६ ते ७ वर्षा नंतर त्यांनी उल्हासनगर कॅम्प नं . ३ मध्ये आपल्या व्यवसायात जम बसविला होता. या दरम्यान त्यांच्या वर अनेक संकटे आली. अशाही परिस्थितीत त्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपल्या व्यवसायात भरभराट निर्माण केली होती. परंतु गेली १७ ते १८ महिने कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे प्रिटींग प्रेसचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला होता. अशातच उल्हास नगर कॅम्प नं. ३ मधील प्रेस च्या गाळ्याचे भाडेही वाढू लागल्याने त्यांनी गेल्या पंधरा दिवसां पासून प्रिन्टींग प्रेसचे साहित्य विकण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने त्यांनी सोमवारच्या रात्री घरातील एका खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या समयी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुसऱ्या रुम मध्ये होत्या. फाशी घेण्यापूर्वी त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून जिव जात नसल्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी नागरीकांकडून सांगितले जात आहे.

अत्यंत कष्टमय जिवन जगत असतांनाच त्यांनी आपल्या एका मुलीला डॉक्टर केले आहे. त्यांनी काही काळ एका पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणूनही पार्ट टाईम नोकरी केली होती. अखेर लॉकडाउने निर्माण केलेल्या आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमीत मोठ्या शोकाकूल वातावरणात त्यांच्या मुलींनी मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. या समयी समर्थ मित्र मंडळ, तिसाई नागरी सहकारी पतपेढीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखणी :- आनंद गायकवाड (पत्रकार)

लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी क्षेत्रातील लोक सध्या अडचणीत आणि तणावात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सतत लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा परिणाम अनेक व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. यामुळे हसत्या खेळत्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर सुखाची चिन्हे दिसेनाशी होऊ लागली आहेत. कोरोना महामारीमुळे प्रशासनाची नामुष्की असल्याने लॉकडाउन रुपी संकट आ वासून उभे आहे. परंतु आत्महत्या हा यावर मार्ग नसून एका वादळाप्रमाणे सामना करा हे ही दिवस बदलतील. शेवटी जीवनच महत्त्वाचे आहे. संयम ठेवा आत्महत्या करू नका असे आवाहन आमच्या कडून केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

अंगारकी चतुर्थीला टिटवाळा महागणपती मंदिरातील मुखदर्शन राहणार बंद

मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थी असून प्रतिवर्षी आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक गणेश भक्त लांबून लांबून टिटवाळा नगरीत येत असतात. यावेळी मोठ्या प्रमाणांत मंदिर परिसरात गर्दी होत असते.

या वर्षीदेखील  कोरोनाचे सावट असून अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या आवारात भाविकांची खूप गर्दी होण्याची शक्यता आहे . कोरोना महामारीचे संकट हे अद्यापही टळले नसल्याने अंगारकी चतुर्थीला कोरोना प्रतिबंधक नियम भाविकांकडून पाळले गर्दी अभावी पाळले जाणार नाहीत. आणि म्हणूनच मंगळवार दिनांक २७ जुलै रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिराचे आवार पूर्ण दिवस रात्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुखदर्शन देखील बंद राहील असे मंदिर विश्वस्तांकडून  एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगण्यात आले आहे. भाविकांना होणाऱ्या त्रासाबद्दल विश्वस्तांनी  दिलगिरी व्यक्त केली असून ग्रामस्थांनी व्यापारी व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु

दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास कल्याण तहसील कार्यलयाच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे.

      पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्यशासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व तलाठ्यांना दिले आहेत. त्यानुसार आजपासून  पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.   

      कल्याण मधील उंबर्डे, सापर्डे, बारावे, योगीधाम, भवानीनगर, शहाड, बंदरपाडा, वडवली, अटाळी, आंबिवली, म्हारळ, कांबा, वालधुनी आदी परिसरातील आधी घरांमध्ये पाणी शिरलेल्याचे पंचनामे करण्यात येणार असून त्यानंतर शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे