व्हिडीओ : कल्याण रेल्वे स्थानकात इमर्जन्सी ब्रेकमुळे थोडक्यात बचावली वृद्ध व्यक्ती

कल्याण रेल्वे स्थानकात आज मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे रूळ ओलांडणार्या एका वृद्ध इसमाला जीवनदान मिळाले आहे. एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडून पलीकडल्या बाजूस जाण्याचा प्रयत्न करीत होती. याच दरम्यान हा अपघात झाला. मात्र वृद्धाचा जीव थोडक्यात बचावला.

कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. इंजिनमधून लोको पायलट एस के प्रधान आणि त्यांचा सोबत असलेले असिस्टंट रवी शंकर हे वेग वाढविण्याच्या तयारीतच होते. मात्र त्यांना समोर काहीतरी हरकत झाल्याची माहिती मिळाली. आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक सीसिस्टिमचा वापर केला. आणि काही सेकंदातच एक्स्प्रेस त्या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊन जागेवर उभी राहिली. मात्र ही वृद्ध व्यक्ती अगदी मधोमध असल्याने इंजिनच्या खाली सापडली. यानंतर मोटरमन आणि फलाटावरील काही लोक खाली उतरले आणि त्यांनी या वृध्द इसमाला सुखरूपपणे इंजिन खालून बाहेर काढले. आज दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली.

प्लॅटफॉर्मवरून उतरून रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे हे नियमबाह्य आहे व त्याशिवाय जीवघेणे देखील आहे. अश्या पद्धतीने रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना केले आहे. उपलब्ध असलेल्या ब्रिजचा वापर करा असे सांगण्यात येते. त्याचबरोबर थोडक्यात बचावलेल्या वृद्ध इसमाला देखील याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आला. नशीब बलवत्तर म्हणून लोको पायलट ने वेळेवर अर्जंट ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

व्हडिओत पहा कसे बाहेर काढले आजोबांना:-

-संतोष दिवाडकर

कल्याण परिमंडळात वीजबील थकवलेल्या ‘इतक्या’ लोकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत

महावितरणच्या कल्याण परिमंडळात थकीत वीजबिलाचा भरणा टाळणाऱ्या ७० हजार ६८६ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे १०५ कोटी रुपये थकीत असून चालू वीजबिलासह थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकेल. याव्यतिरिक्त परिमंडलातील ७ लाख ८३ हजार ग्राहकांकडे मार्च-२०२१ पर्यंतची ४०२ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८ हजार ७७१ ग्राहकांचा (७ कोटी ७ लाख थकीत), ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १४ हजार ९२३ ग्राहकांचा (४९ कोटी थकीत), वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक २७ हजार ५२७ ग्राहकांचा (२८ कोटी ३३ लाख) आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार विभाग वगळून) पालघर मंडलात १९ हजार ४६५ ग्राहकांचा (२० कोटी ७४ लाख थकीत) वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल व पुनर्रजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणाऱ्या व घेणाऱ्या दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील वीज ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘होपमिरर फाउंडेशन’ची ट्रान्सजेंडर लोकांना मदत

होपमिरर फाउंडेशनने कोणत्याही लिंग, जाती, जातीच्या किंवा धर्मातील लोकांमधे भेदभाव न करता लोकांना राशन देऊन, गरजूंना मदत करत असते. टीम होपमिररला बोरिवली पूर्वेतील ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांना आवश्यक वस्तू देण्याची विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत होपमिररच्या वतीने ट्रान्सजेंडर लोकांना अन्नधान्याची मदत करण्यात आली.

होपमिररचे संस्थापक रमजान शेख यांनी आपल्या टीम सदस्यांसह वितरण मोहिमेची योजना आखली आणि अंमलात आणली. आतापर्यंत होपमिरर फाउंडेशनने हजारो कुटुंबांना सक्षम बनविले आहे. अशा अनिश्चित काळामध्ये गरजू सर्वांची सेवा करण्याचे निश्चिततेसह या आशेचे प्रतिबिंबक असण्याचे कार्यसंघाचे लक्ष्य आहे.

होपमिरर फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी मानवतेच्या उन्नतीसाठी सामाजिक कल्याणाच्या दिशेने कार्य करते. कोरोनाने लाखो लोकांचे जीवनमान गमावले, ट्रान्सजेंडर समुदायावर आर्थिक परिणाम झाला आहे. यासाठी या समाजातील लोकांना 50 पेक्षा जास्त रेशन किट वितरीत करण्यात आले.

“पहिल्या लॉकडाऊनपासून आम्ही आपले सर्व उत्पन्नाचे स्त्रोत गमावले आहेत. आम्हाला मदतीची  आवश्यकता होती. कठीण काळात अडचणीत आलेल्या वंचितांना मदत करणाऱ्या  होप मिरर फाउंडेशनबद्दल आम्हाला माहिती मिळाली. आम्ही मदतीसाठी संस्थेशी संपर्क साधला असता  फाउंडेशनच्या रमझान शेख यांनी आमच्या समुदायाला रेशन किट पुरवले असल्याची प्रतिक्रिया सलमा यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

शहाड येथील लसीकरण केंद्रावर एकाच दिवशी झाले ‘इतक्या’ लोकांचे यशस्वी लसीकरण

कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात लसीकरण अभियान प्रभावीपणे राबवली जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशाचप्रकारे शहाड परिसरात सुरु केलेल्या लसीकरण केंद्रावर काल एकाच दिवशी तब्बल ४३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

       लसीकरण मोहिमेला सुरवात झाल्यापासून शहाड परिसरातील नागरिकांना लस घेण्यासाठी लांब जावे लागत होते. त्यामुळे शहाड परिसरातच लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. नागरिकांची हि मागणी लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे पाठपुरावा करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला  शहाड परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.

       या मागणीला पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहाड येथील मोहन लाल देडिया इंग्लिश स्कूल याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या या आदेशानंतर भाजपाचे वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर यांनी या लसीकरण केंद्रावर मंडप आणि इतर साहित्याची स्वतः व्यवस्था करत लसीकरण केंद्र सुरु केले. हे केंद्र सुरु होताच एकाच दिवशी तब्बल ४३० नागरिकांचे लसीकरण याठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान शहाड परिसरात लसीकरण केंद्र सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण परिमंडळात २०% ग्राहकांचा ३० युनिटपर्यंत वीजवापर; विशेष तपासणी मोहिमेत होणार पडताळणी

महावितरणच्या कल्याण परिमंडलात दरमहा ३० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. परिमंडलात तब्बल २० टक्के ग्राहकांचा वीजवापर ३० युनिटपेक्षा कमी असून या सर्व ग्राहकांच्या वीज वापराची पडताळणी करण्यात येणार आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून महसूल वाढीच्या उद्देशाने ३० जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. 

मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार ३० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या परिमंडलातील ३ हजार ग्राहकांची नुकतीच पडताळणी करण्यात आली. यात बहुतांश ठिकाणी नादुरुस्त किंवा बंद वीजमीटर, मीटरचे सील तुटणे, मीटर घराच्या आत असणे, मीटरशी छेडछाड किंवा वीजचोरी, वीज भारात बदल, चुकीचे रिडींग आदी बाबींमुळे वीजवापर कमी असल्याचे आढळून आले. परिणामी होणारे नुकसान टाळण्यासाठी ३० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या सर्वच ४ लाख ४४ हजार २३८ ग्राहकांची पडताळणी करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ८० हजार ८४९, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग व उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत १ लाख ३ हजार ४३५, वसई व विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडळ कार्यालयांतर्गत सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६६१ आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार वगळून) पालघर मंडळात १ लाख ३ हजार २९३ ग्राहकांचा दर महिन्याचा वीज वापर ३० युनिटपेक्षा कमी आहे. 

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु असून तपासणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विभाग व उपविभागीय स्तरावर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मोहिमेच्या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. या मोहिमेत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी परिमंडलातील ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे

सरकारच्या मदतीपासून वंचित रिक्षा चालकांच्या खात्यात लवकरच जमा होणार मदत

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद असल्याने त्यांना मदत म्हणून राज्य सरकारने प्रत्येक रिक्षा चालकाला १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र या मदतीपासून अद्यापही अनेक रिक्षाचालक वंचित असून याबाबत लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र सरकारच्या या मदतीपासून वंचित असलेल्या रिक्षाचालकांच्या खात्यात लवकरच मदत जमा होईल या परिवहन उपायुक्तांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

      कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद असल्याने रिक्षा चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे या रिक्षा चालकांना मदत म्हणून राज्य सरकारने १५०० रुपये प्रत्येक रिक्षा चालकाला मदत म्हणून जाहीर केली. मात्र कित्येक महिने झाले तरी बरेचसे रिक्षाचालक या मदतीपासून वंचित राहिले आहेत. अशा या रिक्षा चालकांना मदत मिळण्यासाठी भाजपा वाहतूक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबत गुरवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण, जेष्ठ कर्मचारी रवींद्र कुलकर्णी, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विल्सन काळपुंड, ठाणे जिल्हा अध्यक्ष वाल्मिक सोनार उपस्थित होते.

तानाजी चव्हाण यांनी रिक्षाचालकांना १५०० रुपयांच्या अनुदानासाठी संगणक प्रणाली मध्ये येणाऱ्या अडचणी बाबत महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त संदीप चव्हाण यांच्याशी मोबाईल द्वारे चर्चा घडवून आणली. २० जुलै  रोजी डेमो तयार होईल व २३ जुलै  पासून ज्या रिक्षाचालकांना अद्याप अनुदान मिळाले नाही अशा रिक्षा चालकांसाठी कल्याण आरटीओला रिक्षाचालकांचे नोंदणी क्रमांक, रिक्षा क्रमांक, आधार कार्ड, ज्या बँकेत पैसे हवेत त्या बँकेच्या पुस्तकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत किंवा चेक वर नाव असलेले झेरॉक्स प्रत, लायसनची झेरॉक्स प्रत आणून द्यावी. लवकरात लवकर रिक्षाचालकांच्या खात्यात पैसे जमा होण्यास मदत होईल असे आश्वासन संदीप चव्हाण यांनी दिलं आहे.

परिवहन उपआयुक्त यांच्या आश्वासनानंतर तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांच्या विनंतीनुसार शुक्रवारी होणारे एक दिवसीय धरणे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. तरी सर्व रिक्षाचालकांनी कल्याण आरटीओला आपले पेपर सादर करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होतायेत जमीनदोस्त; आयुक्तांना माहिती मिळताच आता तत्काळ चालतो बुलडोझर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अलिकडल्या काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम निष्कासित होताना दिसत आहे. आरक्षित भूखंडावर होत असलेले अतिक्रमण गांभीर्याने लक्षात घेत. आशा बांधकामांना मुळासकट उखडायचे आदेशच जणू महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत अशी चर्चा रंगू लागल्या आहेत.

क.डों.म.पा. चे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठीचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून गेल्या काही काळापासून महापालिकेचा बुलडोझर चांगलाच कामाला लागला आहे. आरक्षित भूखंड तसेच अनधिकृत इमारती आता निष्कासित केल्या जात आहेत. त्याचबरोबर जीर्ण झालेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या धोकादायक इमारती देखील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून जमीनदोस्त करण्यात येत आहेत. आयुक्तांच्या कारवायांमुळे भूमाफिया आणि काळी काम करणारी मंडळी अक्षरशः रडकुंडीला आली आहेत असेच म्हणावे लागेल.

“ड” प्रभागातील काटेमानिवली येथील ६० फुटी रस्त्याच्या लगत असणाऱ्या मनपाच्या आरक्षित भुखंडावर मोबाईल टाँवरच्या अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत ड प्रभागक्षेत्र आधिकारी यांना माहिती मिळाली. प्राप्त माहिती नुसार दखल घेत प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, १ जे सी बी या फौज फाट्यासह काटेमानेवली रोड परिसरातील आरक्षित भुखंडवर सुरू असलेले अनाधिकृत मोबाईल टाँवरचे बांधकाम शुक्रवारी जमीनदोस्त केले. कारवाई बाबत “ड”प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, क.डो.मपा.आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनाधिकृत बांधकाम, आरक्षित भुखंडावर होणारे आतिक्रमणे याबाबत तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. याबाबत प्रभावीपणे अमंलबजावणी करीत सदर काम निष्कासित केले.”

क.डों.म.पा.च्या ‘इ’ प्रभागातील, नांदिवली येथील गणेश नगर मध्ये चालू असलेले (तळ + १) इमारतीचे अनाधिकृत बांधकाम पिलर, मुळासकट काढून पूर्णपणे निष्कासित करण्याची कारवाई ‘इ’ प्रभागक्षेञ अधिकारी भारत पवार यांनी आज केली. हि कारवाई १ जेसीबी मशिन,१ कॉम्पप्रेसर व महापालिकेचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या ‘अ’ प्रभागातही प्रभागक्षेञ अधिकारी राजेश सावंत यांनी मोहने येथील यादव नगर मधील विराट क्लासिक या इमारतीच्या समोर चालू असलेले अनाधिकृत बांधकाम, १ जेसीबी, महापालिका कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासित करण्याची धडक कारवाई काल दिवसभरात केली.

-कुणाल म्हात्रे

संकलन – संतोष दिवाडकर

भाऊ कदम आणि राणा दा ने ठोकला कल्याणमध्ये तळ; ‘गेम डाव स्टार्ट’ चित्रपटाचं शुटिंग झालं सुरू

मराठी सिनेसृष्टीत ‘गॅम डाव स्टार्ट’ हा नवा चित्रपट पुढील काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता कल्याणमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटातुन कॉमेडी किंग भाऊ कदम आपल्याला खलनायक म्हणून दिसणार आहे. तर राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटाचा नायक आहे.

कल्याण मधील कशीश इंटरनेशनल हॉटेलमध्ये ‘गॅम डाव स्टार्ट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच हॉटेलमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘गॅम डाव स्टार्ट’ या नावानुसार हा चित्रपट म्हणजे जुगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर आधारित असणार आहे. बाकी यात कॉमेडी,एक्शन,ट्विस्ट अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत.

या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत राना दा म्हणजेच हार्दिक जोशी असणार आहे. तर खलनायकाची भूमिका भाऊ कदम करीत आहेत. त्याचबरोबर कल्याण मधील काही नवोदित कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. त्यातीलच नितीन रुपणवर हे देखील भाऊ कदम यांच्या समवेत सहखलनायक म्हणून भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या नायिकेबद्दल अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. नायिका कोण आहे ? हे अद्याप कुणालाही माहीत नाही. मात्र ही नायिका दाक्षिणात्य असेल अशी एक चर्चा सुरू आहे.

कल्याण मधील प्रसिद्ध कॉमेडी आर्टिस्ट, गायक बजरंग बादशाह यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. नाथ प्रोडक्शनच्या माध्यमातून हा चित्रपट बनवला जात आहे. वैशाली ठाकूर, सुजाता पवार, बजरंग बादशाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांच्या नजरेतून होत आहे. चित्रपटाची संकल्पना महेश गायकवाड यांची आहे तर संजय गायकवाड यांचे देखील योगदान चित्रपटाला लाभले आहे. कल्याण शहरातील कशीष हॉटेल मधून चित्रीकरण सुरू झाले असून पुढील काही दिवस कल्याण शहरातील काही भागात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असणार आहे. व त्यामुळे भाऊ कदम आणि राणा दा कल्याणमध्ये तळ ठोकून असणार आहेत.

चित्रपटाचे शुटिंग तसेच भाऊ आणि राणाची मुलाखत पहा खालील लिंकवर :-

-संतोष दिवाडकर

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट ? तर मग १०० कुटुंब होतील बेघर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता बनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत  पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.

 त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अंमलबजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणात आयुक्तांनी  लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या 10 प्रभागात एकुण 419 शौचालयात4292 सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय(एकुण 249 सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी 28 शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित 10 शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे. जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते.

सदर संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या सदयस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्‍या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून सदर निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात पे ॲण्ड युज ची एकुण 26 शौचालये(एकुण 235 सिट) असून सदर शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.

विभागीय उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे