इंधन दरवाढी विरोधात कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक ; जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

सातत्याने इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत असून यामुळे सर्वसामन्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यासाठीच कल्याणमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेत्तृत्वाखाली इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी सहजानंद चौक येथे केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदारांना निवेदन देत नागरिकांच्या वतीने रोष व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संपूर्ण देशभरात इंधन, घरगुती गॅस सिलेंडर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे तेल तसेच सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सातत्याने इंधन दरवाढ होत असून सर्व सामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. सरकारने इंधन दरवाढ कमी करून देशातील सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

देशातील नागरिकांवर कोरोना महामारीचे संकट आले आहे. त्यामध्ये बहुतांश लोकांनी स्वतःचे रोजगार, नोकऱ्या गमावल्या आहेत. बहुतांश कुटुंबाचे प्रमुख मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे आणि त्यातच केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे सतत दरवाढ करून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे इंधन दरवाढ थांबवून त्यांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा उपासमारीला कंटाळून आपल्या देशातील गरीब आणि सामान्य नागरिक आत्महत्या करतील आणि त्यासाठी पूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचीटणीस संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने कल्याण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन कुलकर्णी, सेवादल अध्यक्ष लालचंद्र तिवारी, काँग्रेसचे जेष्ठ नेते रवी पाटील, माजी गटनेते नंदू म्हात्रे, शारदा पाटील, वैशाली वाघ,लता जाधव,प्रवीण साळवे,विमल ठक्कर,मुन्ना,तिवारी,जपजित माटा, शकील खान आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-शरद शिंदे

डोंबिवलीत मनसेच्या लसीकरण मोहिमेला जोरदार सुरवात

एकीकडे कल्याण  डोंबिवली महापालिकेचे लसीकरण केंद्र लसींचा साठा प्राप्त न झाल्याने बंद आहेत. तर दुसरीकडे मनसे तर्फे आज कल्याण ग्रामीण भागात मोफत लसीकरण सुरू करण्यात आले. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यँत 2  हजार नागरिकांचे   निशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. आज लसीकरणास रिक्षा चालकांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेचे लसीकरण केंद्र तर दहा बारा दिवस बंद राहणार असतील तर कसं काय ब्रेक द चैन काराल, केंद्र सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा जोपर्यंत लसींचा  साठा प्राप्त होत नाही तोपर्यंत नवी मुंबईच्या पार्श्वभूमीवर लस विकत घ्याव्यात, कोव्हीड सेन्टरवर करोडो रुपये खर्च करता मग लसिकरनावर का केला जात नाही असा सवाल केला. तसेच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा ड्राइव्ह घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.  यावेळी राजू पाटील यांच्या आमदार निधीतून कार्डीक रुग्णवाहिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भेट म्हणून देण्यात आली. या रुग्वाहीकेचे लोकार्पण केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते करण्यात आले.     

      यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह केडीएमसी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त रामदास कोकरे, मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेवक हर्षद पाटील, लाल बावटा रिक्षा युनियनचे काळू कोमास्कर, माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे आदींसह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या क.डों.म.पा. युनिटची कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका युनिटची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा मनसे डोंबिवली  शहर अध्यक्ष मनोज घरत तर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    मनसे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष संदिप देशपांडे, कार्याध्यक्ष संतोष धुरी, सरचिटणीस उत्तम सांडव, अखिल चित्रे व राजेश उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाने हि कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र संदीप देशपांडे यांच्याहस्ते देण्यात आले आहे.

    या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष मनोज घरत, कार्याध्यक्ष उल्हास भोईर, सरचिटणीस प्रकाश भोईर, कोषाध्यक्ष चेतना रामचंद्रन, उपाध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे, गणेश खंदारे, चिटणीस हेमंत दाभोळकर, महेश मोरे, सहचिटणीस राजेश दातखीळे, शुभम बांगर, यतीन जावळे यांचा समावेश आहे.

-कुणाल म्हात्रे

पिंपरी चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्त व पदाधिकाऱ्यांची केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पांना भेट

पिंपरी चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्त व पदाधिकाऱ्यांची केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पांना भेट दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रात शुन्य कचरा मोहिम राबवून आधारवाडी येथील डंम्पीग ग्राऊंड बंद केले आहे. आता महापालिका क्षेत्रातील ओल्या कच-यावर बारावे व उंबर्डे घनकचरा प्रकल्पात थेट प्रक्रिया केली जाते. यापूर्वी महापालिकेत फार कमी म्हणजेच सुमारे २ टक्के इतक्या कमी प्रमाणात कच-याचे वर्गिकरण होत होते. परंतू आता जवळ जवळ ९० टक्के वर्गिकरण केले जाते.

महापालिकेच्या शुन्य कचरा  मोहिमेच्या अनुषंगाने राज्याच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी राज्‍यातील १५ महापालिका आयुक्तांसमोर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुन्य कचरा  मोहिमेबाबत सादरीकरण  केले. हे सादरीकरण पाहून काही आयुक्तांनी महापालिकेच्या या कार्यप्रणालीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली.

 त्यानुसार गुरुवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व इतर स्थायी समिती सदस्य, पक्षनेता नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आधारवाडी डंम्पींग ग्राऊंड, बारावे घनकचरा प्रकल्प तसेच विविध इमारतींमध्ये केल्या जाणा-या खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली आणि महापालिकेत कच-याचे कशा प्रकारे वर्गिकरण केले जाते याची माहिती घेतली. महापालिकेचे हे प्रकल्प पाहून आपण प्रभावित झालो असून पिंपरी चिंचवड महापालिकेतही अशाप्रकारे शुन्य कचरा मोहिम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

कोविड रुग्णांचे आशीर्वाद हाच आपला सर्वात मोठा अवॉर्ड – क.डों.म.पा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कोविड साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिका रुग्णालयात उपचार घेऊन  बरे झालेल्या कोविड रुग्णांचे आशीर्वाद हेच आपले सर्वांत मोठे अवॉर्ड आहे असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरच्या वर्षापूर्तीचे औचित्य साधून आज सायंकाळी महापालिकेत आयोजिलेल्या हॉस्पिटल मॅनेजर्सच्या छोटेखानी सत्कार समारंभात बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

 महापालिकेतील इंजिनियर्स, डॉक्टर्स इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांनी एकत्रितरीत्या टीम म्हणून केलेल्या कामामुळे महापालिकेस आज राष्ट्रीय पातळीवरील कोविड १९ इनोव्हेशन अवॉर्ड प्राप्त झाला, परंतु आपल्या रुग्णालयातुन बरे  झालेल्या रुग्णांचे आशीर्वाद हेच खरे अवॉर्ड, त्यामुळे सर्वांचे काम हे कौतुकास पात्र आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने अभिमान वाटावा असेच काम केले असे आयुक्त पुढे म्हणाले. कोविड मध्ये काम केलेल्या प्रत्येकाला पुढे अभिमानाने सांगता येईल की मी कोविडमध्ये न घाबरता काम केले, यासाठो प्रत्येकाने आपल्या कामाचे अनुभव लिहून ठेवावे त्याचे एक आपण  पुस्तक बनवूया असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या छोटेखानी  कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील ,कोविड कालावधीत आर.आर. रुग्णालय, निऑन रुग्णालय,  होली क्रॉस या रुग्णालयांचे नियोजन करणारे  कार्यकारी अभियंता तरुण जूनेजा, कोविड रुग्णालयांच्या उभारणीसाठी काम करणारे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, साई निर्वाण कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके, टाटा आमंत्राचे हॉस्पिटल मॅनेजर तथा कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, सावळाराम कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता किरण वाघमारे, पाटीदार कोविड सेंटरचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता सुरेंद्र टेंगळे, वसंत व्हॅली, आर्ट गॅलरीचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता भालचंद्र नेमाडे, जिमखाना कोविड समर्पित रूग्णालयाच्या हॉस्पिटल मॅनेजर तथा उपअभियंता रोहिणी लोकरे, रुक्मिणी प्लाझा रुग्णालयाचे हॉस्पिटल मॅनेजर तथा उप अभियंता  श्रीकांत मुंडे, सर्व कोविड सेंटरमध्ये विद्युत यंत्रणा उभारणारे  कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सर्व कोविड रुग्णालयातील खानपान व्यवस्था सांभाळणारे महापालिका सचिव संजय जाधव, सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, शहर अभियंता यांचे स्वीय सहाय्यक   भागवत यांचा भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-संतोष दिवाडकर

खासदार कपिल पाटिल केंद्रीय मंत्रिमंडळात ; कल्याणमध्ये भाजपचा जल्लोष

भिवंडी लोकसभेचे खासदार तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील यांचा  केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खडकपाडा येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला.

    खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने   भिवंडी तालुक्यातील त्यांच्या अंजूर दिवे गावात व भिवंडी लोकसभा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.  कपिल पाटील हे देशातले पाहिले आगरी समाजाचे नेते आहे की ज्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. आम्ही ह्या देशातल्या सर्व आगरी समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ पातकर, माजी नगरसेवक अर्जुन भोईर,  अर्जुन म्हात्रे, पंकज उपाधय, संजय कारभारी,  शत्रुघ्न भोईर, वैशाली पाटील, प्रिया शर्मा, पुष्पा रत्नपारखी, प्रीती दीक्षित आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

मलंगगडच्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ; गावकऱ्यांनी बांबूंचा दिला आधार

खोणी-तळोजा महामार्गाच्या जवळपास असलेल्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सध्या या पुलाचे संरक्षक कठडे कोसळले असून पुलाच्या कठड्यांना बांबूच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने कोसळण्याची भीती व्यक्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या चिरड शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरून नागरिक ये-जा करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचं हे दुर्लक्ष अपघातांना निमंत्रण देऊ शकत असं येथील लोकांचं म्हणणं आहे.

माजी मंत्री शबीर शेख यांच्या कार्यकाळात २६-२७ वर्षांपूर्वी या पुलाचे काम झाले होते. मात्र त्या नंतर या पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम झालं नसल्याने सध्या या पुलावर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. चिरड गाव हा खोणी तळोजा या महामार्गाला लागूंन असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून ये जा होत असते. त्यामुळे या पुलावर अपघात होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बांबुच्या काठ्यांचा आधार दिला आहे. मात्र अधिक पाऊस झाला आणि या पुलामुळे अपघात घडल्या नंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-संदेश दाभणे

“खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे…आपल्याला अशीच माणसं आवडतात” – हिंदुस्थानी भाऊ राज ठाकरेंच्या भेटीला

संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेला व ज्याने समाज माध्यमातून लोकांमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण अशा हिंदुस्थानी भाऊ ने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली व त्यानंतर राज ठाकरेंबद्दल बोलताना त्याने आपल्या शैलीतून उत्तर दिले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणातून रोखठोक मुद्दे मांडत असतात. सध्या एकच आमदार असला तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन खूप अधिक आहे. त्याचबरोबर लोकप्रियता देखील तितकीच लाभली आहे. रोखठोक बोलण्याच्या बाबतीत हिंदुस्थानी भाऊ देखील देशभरात प्रसिद्ध आहे. तोंडातून निम्म्या शिव्या हसडणारा पण चांगल्या वाईटाची पारख असल्याने भाऊला देखील लोकांचे प्रेम लाभले आहे. मुळात पाकिस्तानला भाऊने सळो की पळो करून सोडले आहे. तरी काही प्रमाणात भाऊच्या स्टाईलवर फिदा झालेले फेन पाकिस्तानात देखील आहेत.

कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्या पुढाकाराने मराठी चित्रपट, टीव्ही क्षेत्रातील मान्यवरांनी राजसाहेब ठाकरेंची भेट घेऊन त्यांना परप्रांतीय युनियनच्या दादागिरीमुळे भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी अमेय खोपकर यांच्या समवेत हिंदुस्थानी भाऊ देखील राज ठाकरेंच्या भेटीला गेला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

हिंदुस्थानी भाऊंनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यानंतर बाहेरील उपस्थित जमावाने भाऊंना भेटीबाबत विचारले असता भाऊने देखील त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. “खुलेआम मारतो तो राजसाहेब ठाकरे… आपल्याला अशीच माणसं आवडतात” असे उद्गार त्याने गाडीत बसण्यापूर्वी काढले. सध्या हा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल होऊ लागला आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये राष्ट्रवादीत धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये धनदांडग्यांच्या गटाकडून गरिब कार्यकर्त्यांचा छळ सुरु असून आपल्याला विश्वासात न घेता पदमुक्त केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कल्याण डोंबिवली माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

      ३० जानेवारी २०२० रोजी प्रसाद महाजन यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच संपूर्ण देशभर कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्णता लाकडाऊन लावण्यात आल्याने सर्व कॉलेज शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणे शक्य नव्हते. अशातही महाजन यांनी संपर्कातील राष्ट्रवादी विचारांशी एकनिष्ठ असणारया विद्यार्थ्यांशी संपर्क करुन संघटना बांधणी सुरू केली. विद्यार्थी संघटना वाढीस सुरवात केली.

 या नियुक्तीला कालावधी १६ महीनेही पुर्ण झालेला नसताना अचानकपणे जुन २०२१ मध्ये विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पदमुक्त करण्यात आले. पक्षातील एक धनदांडग्यांचा गट संघटनेत काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील गरिब कार्यकर्ताचा छळ करत अपमानास्पद वागणूक देत सतत हेटाळणी करत असल्याचा आरोप प्रसाद महाजन यांनी केला आहे.

या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे हे जावाबदार असून त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला असल्याचे महाजन यांचे म्हणणे असून याबाबत पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असून याविषयी सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याचे शाश्वत आश्वासन पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांना विचारले असता, प्रसाद महाजन हा मूळचा शिवसैनिक त्यामुळे त्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये. कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रसादकडे असताना संघटनेचे काम असमाधान कारक होते. त्या मुळे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अप्पा शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिफारशी वरून सुजित रोकडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात युवा सेनेचा प्रवेश होत असून प्रसाद महाजन हे आरोप जाणीवपूर्वक सुपारी घेऊन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

मलंगगड भागातील ओढ्यात असंख्य खेकड्या माश्यांचा मृत्यू ; ओढ्यात मिसळले गेले प्रदूषित पाणी

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील ओढ्यात प्रदूषित किंवा रासायनिक पाणी सोडल्याने ओढ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. इतक्या माशांचा मृत्यू कसा झाला असावा ? हा प्रश्न पाहता या गंभीर प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कल्याण जवळील मलंगगड परिसरात असलेल्या करवले कुंभार्ली येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले आहेत. विशेष म्हणजे पाण्याला देखील तेलसदृश तवंग आणि पांढरा फेस आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पोल्ट्री फार्म आणि कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हे मृतावस्थेत असलेले मासे आणि खेकडे या परिसरातील आदिवासींनी उल्हासनगर, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांसह ग्रामीण भागात देखील विक्रीसाठी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे हे मासे जर कुणी खाल्ले तर विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सध्या या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुढील काही दिवस परिसरातील नागरिकांनी नदीमधील मासे खाऊ नयेत असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

मलंगगड हा अंबरनाथ तालुक्यातील एक ग्रामीण भाग आहे. कल्याण पासून जवळ असल्याने कल्याणकर देखील मोकळी हवा घेण्यासाठी या भागात येतात. कारण हा भाग संपूर्णपणे निसर्गाने नटलेला आहे. परंतु आता या भागात काही ठिकाणी जीन्स बनवण्याचे कारखाने बनवले गेले आहेत. ज्यातून प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते. ओढ्यातून जाणाऱ्या शुद्ध पाण्यात हे पाणी मिसळल्याने या भागात जल प्रदूषण वाढीस लागले आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

-संदेश दाभणे