कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे.
कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात जोराने आदळली.
यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेउ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
क.डों.म.पा. चे मा.नगरसेवक महेश गायकवाड हे आता एका नव्या क्षेत्राकडे निघाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतुन ‘डाव’ हा मराठी चित्रपट उभा राहणार आहे. आणि या चित्रपटाचा महूर्त सोहळा आज कल्याण येथे पार पडला. या सोहळ्याला सिनेमात असणारे कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.
‘नाथ प्रोडक्शन’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘डाव’ चे चित्रीकरण १३ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्यातून निर्माण होणारा जुगार आणि जुगाडाचा डावपेच अशी संपुर्ण मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अनेकसे ट्विस्ट, एक्शन, ड्रामा, कॉमेडी अशी सर्व फोडणी या चित्रपटात घालण्यात आली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नायिकेची भूमिका कोण करणार ? हे मात्र गुपितच आहे. या चित्रपटात खलनायक आणि इतर महत्वाच्या भूमिका कल्याण मधील काही नवोदित कलाकार साकारणार आहेत. याशिवाय भाऊ कदम आणि आणखीन दिगग्ज कलाकार देखील चित्रपटात दिसणार असल्याचे दिग्दर्शक अमित कोळी यांनी या सोहळ्यात प्रेक्षकांशी बोलताना सांगितले आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉंग ने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले. मिलिंद शिंदे यांचे चिरंजीव मधुर शिंदे यांनी हे गाणे आपल्या शिंदेशाही आवाजाच्या शैलीत गायले आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक शकील अहमद यांचेही संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. त्याचबरोबर चंद्रकला दासरी व यशश्री दासरी यांच्या आवाजातील गाणी देखील असणार आहेत. करण आणि दर्शन हे स्वतः चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत आहेत.
बजरंग बादशाह यांची ही कथा असून पटकथा देखील त्यांनीच केलेली आहे. चित्रपटातील संवाद संकेत हेगाणा व राकेश शिर्के यांनी लिहले आहेत. कौशल भारती छायाचित्रण तर विकी बिडकर कला दिग्दर्शक म्हणून असणार आहेत. मुहूर्त सोहळ्याला झी टॉकीज निर्माते अन्वय नायकोडी तसेच अरबाज मोघल देखील उपस्थित होते. याशिवाय निर्मिती प्रबंधक चेतन मुरूमकर, गीतकार अजय वाघमारे आणि चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक युगंधर शिंदे असनार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा कॅमेरा डिपार्टमेंट श्रीनिवास शिंगे आणि राहुल बर्गे पाहणार आहेत. राधा सागर, भाग्यश्री मोटे, नितीन रूपवते, भरत ठाकूर, टिना सोनी, जॉनी रावत, विश्वजीत सोनी हे कलाकार म्हणून दिसणार आहेत.
‘नाथ’ प्रोडक्शनच्या माध्यमातून ‘डाव’ हा चित्रपट पुढे येणार असून त्यामागे अनेक लोकांचे मोठे योगदान असणार आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतला हा चित्रपट असून प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांचे या चित्रपटाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कल्याणचे कॉमेडी किंग आणि गायक बजरंग बादशहा तसेच वैशाली ठाकूर आणि सुजाता पवार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तमाम कल्याणकर आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरच हा नवा ‘डाव’ पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील.
कल्याण कोळसेवाडी भागात काल रात्री एका महिलेला मारहाण झाली होती. या प्रकरणाबाबत कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर गुन्ह्याची नोंद केली असून व्हडीओ मध्ये असणाऱ्या जणांना अटक केली आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला प्रवासीची रिक्षाचालकाने छेड काढल्याचे बोलले जाते. यावरून महिलेला व तिच्या मित्रांना जमावकडून मारहाण झाली होती. या संदर्भात कोळसेवाडी पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून नऊ जणांना आता ताब्यात घेतले आहे. संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास करून कारवाई करणार असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकरणातील दोन्ही बाजू व्यवस्थितपणे उजेडात येतील.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका महिलेला व तिच्या दोन मित्रांना रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने मारहाण केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्यास उशीर होत असल्यावरून स्थानिक आमदारांनी पोलीस ठाण्याला धारेवर धरले आहे.
रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षा प्रवास करीत होती. दरम्यान रिक्षा चालकाने तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे. त्या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे तरुण रिक्षाचालकाला जाब विचारत होते. मात्र यादरम्यान रिक्षाचालक व त्याच्या संबंधित जमावाने त्या महिलेला व तिच्या दोन्ही मित्रांना अमानुषपणे मारहाण केली. शिवाय एका व्यक्तीने पट्टा काढून त्याने मारहाण केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे स्थानीक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या माणसावरच तक्रार दाखल करतात. मागील दोन वर्षांचा रेकॉर्ड काढला तर लक्षात येईल की या पोलीस ठाण्यात क्रॉस कंप्लॅन्ट अधिक प्रमाणात आहेत. दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करून दोघांना अटक करायची व नंतर तोडपाणी करून त्यांना सोडून द्यायचे. पोलिसांच्या या धोरणामुळे या भागात गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”
– गणपत गायकवाड (स्थानिक आमदार)
गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रा अंतर्गत कोळसेवाडी पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला असून त्यांनी या बाबत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. झालेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी आमदारांनी केली आहे.
कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.
तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.
“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”
कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे सदस्य सुदाम पाटील, राजाराम चौधरी, दिनेश जाधव, आनंता जाधव, आत्माराम तारमळे, सुनील जाधव, दर्शना जाधव, सुनंदा देसेकर हे आहेत.
फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, फळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, पोलिस पाटील प्रकाश जाधव, बंचू बांगर, चिमा भोईर, जगन जाधव, उपतालुका प्रमुख बंधू जाधव, माजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक पाच जुलै रोजी एक दिवशीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली सभेत घेण्यात आला.
पाच जुलैला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे पदाधिकारी गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून पाच जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे पत्र शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे. राज्य सरकार शिक्षक-शिक्षकेतर यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. सदर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील आहे या राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक-शिक्षकेतर यांनी सहभाग नोंदवून राज्य सरकारकडे आपला असंतोष व्यक्त करावा असे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना विनाविलंब पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करणे. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा, वीस, तीस वर्षे सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करणे, कोरोनाग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष गरजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरलेल्या 59 शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई करणे. शिक्षण विभागात रिक्त पदे तात्काळ भरणे. शिक्षकेतर यांची पदे पूर्ववत ठेवून याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे. अशा विविध एकतीस मागण्यांचा समावेश असलेले निवेदन देऊन राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे.
डोंबिवली वरून पेंढारकर कॉलेज, ऊस्मा पेट्रोल पंप मार्गे कल्याण शीळ रोडकडे जाणारा मार्ग हा कल्याण शीळ रोड लगत एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईमुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक आणि लोकांचा रहदारीसाठी बंद असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.
या कामामुळे येथून जाणारी येणारी सार्वजनिक बस वाहतूक, लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्या सर्वांना मोठा वळसा घालुन जावे लागत आहे. हे काम पावसाळ्यात करायचे होते तर लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. कारण हा मार्ग वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन याचे नियोजन करणे गरजेचे होते.
जर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने त्याचा फटका अधिक तीव्रतेने येथे होईल. हे काम व्यवस्थित आखणी करून केले असते तर ते चार दिवसात पुरे करता आले असते. आतातरी हे काम लोकांसाठी एमआयडीसीने तातडीने लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली आहे.
ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा चालक मालक असोसिएशन संचलित आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात झाली आहे. यामुळे आता कल्याणकर नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होणार आहे.
शासनाने मुक्त केलेले रिक्षा परवाने यामुळे वाढलेली रिक्षांची अफाट संख्या त्याच प्रमाणात वाढलेली विना लायसन्स बॅच रिक्षाचालंकाची संख्या व कोरोनाचे संकट यामुळे रेल्वे लोकल व वाहतुकीवर असलेले निर्बधं विविध कारणास्तव रिक्षा व्यवसायावर विपरीत परीणाम झालेला आहे.
विना लायसन्स अनाधिकुत रिक्षाचालकांमुळे निर्माण होणार्या समस्या प्रवाशी नागरीकांच्या तक्रारी निराकरण व प्रवाशी नागरीकांना दर्जेदार सुरक्षित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्ध व्हावी व अधिकुत रिक्षाचालकांना शाश्वत रिक्षा व्यवसाय उपल्बधता या करीता रिक्षा संघटनेने ओला उबरच्या धर्तीवर आँटो कँब मोबाईल अँप विकासित केले आहे. कल्याण पश्चिमेतील मोरया हाँल, बैलबाजार येथे प्रातनिधिक स्वरुपात मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा समाविष्टता या करीता रिक्षा चालक नोदंणी अभियान शुभारंभ करण्यात .
याप्रसंगी उपस्थितीत रिक्षाचालकांना मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा भविष्यातील उपयुक्ता व माहीती जितेद्रं पवार व बिनाँय बाबु यांनी दिली. संतोष नवले व प्रतिक पेणकर यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी व प्रवाशी नागरिकांनी मोबाईल अँप रजिस्टर्ड व डाऊनलोड करावे असे आवाहन केले. याप्रसंगी विलास वैद्य, अजगर कुरेशी, विजय डफळ, प्रंशात धनावडे, संजय बागवे, बंडु वाडेकर, बापु चतुर, महीला रिक्षाचालक कल्पना वाघमारे व अन्य रिक्षाचालक उपस्थितीत होते.
दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत 15 दिवस रिक्षाचालक नोदंणी सुरु राहणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून शिवसेनेचा भाग असलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे.
कल्याण पश्चिममधील शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (युवा सेना) कल्याण पश्चिम येथील युवासेना विभाग अधिकारी निखिल कदम, युवासेना उपविभाग अधिकारी रिकी चक्रवर्ती, युवासेना उपशाखा अधिकारी रोहन सोनवणे, समाजसेवक ब्रिजेश कांबळे यांच्यासह युवासेनेच्या गट अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
झालेल्या या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरवात झाली असून निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार कि स्वतंत्र याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिवसेना युवासेनेतील स्थानिक राजकारणाला कंटाळून या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारसरणी पटली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कल्याण मध्ये अधिक प्रमाणात वाढेल यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी यावेळी दिली.