केडीएमसी रुक्मिणीबाई रुग्णालयाचा कायापलट करण्यासाठी दिल्लीतून मंत्रालयात पत्र

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र पाठविले होते. गेल्या महिन्यात झालेल्या या पत्र व्यवहाराची आता दखल घेतली असून केंद्रा कडून महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे मुख्य सचिवांना या बाबतीत विचार करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

कल्याण शहर तसेच येथील शेजारील गाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय महत्त्वाचे आहे. तसेच गोरगरीब नागरिकांनसाठी आसरा आहे. पण सुविधेअभावी लोकांना पुरेसी आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. कधी चिकित्सकांची कमतरता तर कधी अन्य कारणाने नागरिकांना दुसऱ्या शहरात जावे लागत आहे. या रुग्णालयात आधुनिक यंत्र सामुग्री नसल्याने मुंबईच्या आणि ठाण्याच्या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. जर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयचा दर्जा मिळाला तर अत्यआधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध होण्यास मदत होईल आणि कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना औषधोपचारासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची पायपीट थांबणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.

 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबतच केंद्रीय आरोग्य मंत्री यांना पत्र लिहिले. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांकडून तर अद्याप  काहीही  उत्तर आलेले नाहीं. मात्र केंद्राकडून पत्र प्राप्त झालं असून आपल्या पत्राची दखल घेऊन सदर पत्र आरोग्य खात्याचे मुख्य सचिवांना पुढच्या कार्यवाही साठी सादर केलं असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.  आता शासकीय रुग्णालयासाठी मनसे तर्फे योग्य पाठपुरावा केला जाईल आणि कुठल्या ही परिस्थितीत बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाला शासकीय रुग्णालयाचा दर्जा मिळविला जाणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

मलंगगड भागात सलग दुसऱ्या दिवशी बुडुन मृत्यू; चौथ्या दुर्घटनेसह मालिका सत्र सुरूच

कल्याण जवळील मलंगगड भागात पर्यटकांची बुडुन मृत्युमुखी पडण्याची मालिका संपलेली दिसत नाही. शनिवारी एकाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी खरड जवळील बंधाऱ्यात बुडुन एका इसमाला प्राण गमवावे लागले आहेत. मागील दीड महिन्यातील ही चौथी दुर्घटना असून आतापर्यंत सहा जणांचा जीव गेलेला आहे.

वडाळा येथील कमलानगर भागात राहणारा अश्रफ मोहम्मद आरिफ शेख हा २३ वर्षीय तरुण आपल्या ८ मित्रांसोबत मलंगगड येथे आला होता. या दरम्यान तो याच भागातील खरड गावाजवळ असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरल्याची माहिती आहे. आणि याचदरम्यान पाण्यात बुडुन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

पावसाळा सुरू झाल्या नंतर मलंगगडच्या निसर्ग सौन्दर्याकडे शहरी भागातील पर्यटक आकर्षित होतात. शहरापासून जवळ असल्याने येथे शनिवार रविवार पर्यटक गर्दी करतात. यामुळे अनेकदा पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी व परिणामी गुन्हे देखील दाखल होत असतात. मात्र तरीही पर्यटन बंदीचे उल्लंघन करून लोक येतात. मात्र यातील काही पर्यटक हलगर्जीपणा करतात आणि परिणामी प्राणाला मुकावे लागते. मागील दीड महिन्यांत चार घटना घडल्या असून सहा जणांचा समावेश आहे.

१५ जुलै रोजी नेवाळी जवळील तलावात बुडुन दोन अल्पवयीन मुलांनी जीव गमावला होता. शुभम भोईर आणि चांद पाटील अशी त्यांची नावे. यानंतर पुढच्याच आठवड्यात २२ जुलै रोजी मलंगगड जवळील नदीत अतिवृष्टी होत असतानाही पाण्यात उतरलेल्या दोन तरुण मित्रांचा करुण अंत झाला. या घटनेत कल्याणच्या विजयनगर भागातील इशांत मोहडकर आणि विनायक परब या दोघांचा बळी गेला. या दोन घटनेनंतर शनिवारी २८ ऑगस्ट रोजी कुशिवली येथे विवेक मेहरा हा तरुण बुडाला. तर दुसऱ्याच दिवशी रविवारी २९ ऑगस्ट रोजी अश्रफ मोहम्मद आरिफ शेख याचाही बुडुन मृत्यू झाला. या घटना वारंवार सुरू असून ही मालिका थांबणार आहे की पावसाळा संपेपर्यंत आणखीन सुरू राहणार आहे हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

-संतोष दिवाडकर

काटेमानिवली नाका परिसरात कोसळली झाडाची फांदी; थोडक्यात बचावला बाईकस्वार

सोमवार दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ नंतर कल्याण शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. यादरम्यान सव्वा चार वाजताच्या सुमारास काटेमानिवली नाका परिसरात असलेल्या एका झाडाची फांदी कोसळून रस्त्यावर पडली. याच वेळी झाडाखाली एक बाईकस्वार उभा होता. सुदैवाने फांदी एक पाऊल पुढे पडल्याने बाईकस्वार थोडक्यात बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

काळ आला पण वेळ आला नाही असा एक प्रत्यय या घटनेत दिसून आला. फांदी पडायचा वेळी एक बाईकस्वार त्या भागात गाडी थांबवून उभा होता. आणि अचानकच फांदी कोसळून त्याच्या पुढ्यात पडली. यामुळे त्याची दुचाकी देखील रस्त्यावर पडली. यानंतर त्याने भानावर येऊन आपली गाडी उचलली आणि तिथुन पुढची वाट पकडली. अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शी संकेत कपले यांच्याकडून एमएच मराठीला देण्यात आली आहे. यानंतर प्रशासनाने काहीवेळात घटनास्थळी पोहोचून ही फांदी रस्त्यावरून हटवली.

-संतोष दिवाडकर

लाच घेताना कल्याणच्या तहसीलदारांना रंगेहात अटक; महसूल विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर ?

कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे आणि त्यांचे शिपाई मनोहर हरड यांना लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. एकूण एक लाख वीस हजार रुपयांची लाच घेताना ते जाळ्यात सापडले आहेत. या घटनेनंतर महसूल विभागात होत असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे असे दिसत आहे.

कल्याण तालुका वरप गावातील एका कंपनीचे जमिनीबाबतच्या हरकती वरील सुनावणीचे निकाल पत्रक देण्यासाठी तहसीलदार दीपक आकडे यांनी एक लाखाची मागणी केली होती. तर शिपाई मनोहर हरड व इतर स्टाफ करिता २० हजारांची मागणी २६ ऑगस्टला केली होती. या लाचेची रक्कम स्वीकारताना कल्याण तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड यांना ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांच्या टीमने रंगेहात सापळा रचून पकडले आहे. यावरून आज कल्याण महसूल विभागाला मोठा झटका लागल्याचे दिसून आले.

आज दुपारी पावणे एकच्या दरम्यान ही मोठी घटना घडली आहे. यावरून महसूल विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर नक्कीच आला आहे असे दिसते. याबाबत तहसीलदारांची अधिक चौकशी सुरू आहे. पुढे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील स्पष्ट होणार आहे. या संपुर्ण घटनेनंतर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

-संतोष दिवाडकर

मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिरात भाजपाचे शंखनाद आंदोलन

कोरोना निर्बंधांमुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई जरी मरी मंदिर येथे भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे अशा घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील मंदिराचे दार उघडत आत जाऊन पूजा अर्चा केली.

संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर -धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या काळ्या निर्णयाविरेधात आणि मंदिरे-धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्मांचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना यांसह पुरोहित, फुल-प्रसाद विक्रेते एकत्र येत अध्यात्मिक समन्वयक आघाडी च्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे व आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कल्याण पूर्व मंडळाअंतर्गत जागृत देवस्थान तिसाई मंदिर, तिंसगांव, कल्याण पूर्व येथे टाळ, घंटा, शंख वाजवत ‘मंदिर हम खुलवायेंगे। धर्म को न्याय दिलायेंगे।। हा नारा देत मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती माजी सभापती सुभाष म्हस्के, ह.भ.प चंद्रकांत सांगळे महाराज, कल्याण पूर्व मंडल सरचिटणीस नितेश म्हात्रे, अरुण दिघे, संदीप तांबे, पांडुरंग भोसले, गुड्डू खान, नगरसेविका हेमलता पावशे, अॅड. राखी बारोद आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

-कुणाल म्हात्रे

वाहनं चोरणारा अल्पवयीन चोर अडकला कल्याण क्राईम ब्रांचच्या पिंजऱ्यात

शनिवार दि.२८ ऑगस्ट रोजी एक इसम डोंबिवली परिसरात एक चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला त्यांच्या गुप्त माहितगाराच्या मदतीने प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे क्लासिक हॉटेलच्या समोर मानपाडा रोड येथे सापळा रचला. आणि या सापळ्यात पिंजऱ्यात उंदीर फसावा तसा हा चोर अडकला.

या इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने विक्रीसाठी आणलेली रिक्षा ही चोरीची असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्याचे वय १७ वर्षे असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याचबरोबर तो मुंब्रा येथे राहणारा असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. संशयित विधिसंघर्षीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडुन तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. एकुण २,३०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच त्याच्यावर दाखल असल्याच्या गुन्ह्याची तपासणी केली असता एकूण सात गुन्हे ह्या आरोपीवर दाखल असून तीन गुन्हांची उकल कल्याण क्राइम ब्रांचने करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विधिसंघर्षीत बालकास कासावडवली पोलीस ठाणे येथे मुददेमालासह पुढील कायदेशीर कारवाई करिता ताब्यात देण्यात आले. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, दत्ताराम भोसले, मंगेश शिर्के, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

‘मनसे सोबत युती नुकसानकारक, हे मी भाजपाला सांगणार आहे’ – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये आले होते. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवास ते उपस्थित राहिले होते. यावर त्यांना मनसे आणि भाजपा युती बाबत माध्यमांकडून रिपाईची भूमिका काय असेल अशी विचारणा केली होती. त्यावेळी ही युती अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसेची भूमिका ही मराठी माणसाप्रति कट्टर आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेशी युती करणे हे भाजपला परवडणारे नसून या युतीमुळे भाजपचे नुकसान होईल असा तर्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. जर मनसे सोबत युती करण्याचे विचार भाजपा कडून होत असेल तर मी युती न करण्याबाबत त्यांना सांगणार आहे. रिपाई असताना राज ठाकरेंच्या पक्षाची काही आवश्यकता नाही. मुंबईत इतर भाषिक लोक आहेत आणि त्यांचं समर्थन आमच्या युतीला आहे.

आगामी काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील रिपाई भाजपा सोबतच असणार आहे. आमच्या पक्षाला जागावाटपात अधिकाधिक जागा मिळण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. असे आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर राज्यात शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं असाही दावा त्यांनी यावेळी केला.

-संतोष दिवाडकर

पुन्हा येऊ शकतं शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार; कल्याण मध्ये रामदास आठवलेंनी केला दावा

राज्यातील राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण त्या अगोदर अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कल्याण येथे केले। आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आठवले यांनी उद्गार काढले. मलंगगड रोडवरील हॉटेल कशीश इंटरनेशनल येथे आज (दि.२९ ऑगस्ट) या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. दरम्यान यावेळी भाजप शिवसेनेच्या वादात होणारे शाब्दिक चकमक वर भाष्य करीत  प्रतिक्रिया दिली. शिवसेना व नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या वादावरून रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले की, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत हा वाद मिटला गेला पाहिजे.

नारायण राणे यांच्या वरील कारवाई ही सत्तेचा गैरवापर असून  हा  नारायण राणे यांच्यावर अन्याय आहे. असे या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले. अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. शिवसेनेकडून वापरण्यात येणारी भाषाच नारायण राणे  बोलले. ही भाषा ही शिवसेनेची भाषा आहे व यांच्यातच त्यांचे आयुष्य गेलेलं आहे. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे ही शेवटी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले. क.डों.म.पा. निवडणूक काही महिन्यांवर आली असून आरपीआयची देखील तयारी सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही.

-रोशन उबाळे

तथाकथीत महिला पत्रकाराला खंडणी प्रकरणी अटक; हॉटेलच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह

कल्याण डोंबिवलीत खंडणीखोर तथाकथित पत्रकारांमुळे खऱ्या व इमानदार पत्रकारांना नामुष्की सहन करावी लागत आहे. एका तथाकथित महिला प्रतिनिधीला १ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर २० हजार रुपये घेतांना खडक पाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हॉटेल मालकाकडे दरमहिन्याला १ लाख रुपये देण्याची धमकी देत हॉटेल बंद करण्याचा इशारा तिने दिला होता. यानंतर हॉटेल मालकाने तक्रारी नंतर २० हजार रुपये घेताना योगिता जोशी हिला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये युट्युब चॅनल बनवून त्या व्दारे खंडणी वसुलीचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावत असून खऱ्या पत्रकारांना यांच्यामुळे काही प्रमाणात नामुष्की आणि मुसकट दाबी होतांना दिसत आहे.

कल्याण पश्चिमेतील मुक्तीनगर मध्ये  चस्का हॉटेल मालका कडे दरमहा १ लाख रुपये देण्याची धमकी दिली होती. नाही दिले तर हॉटेल चालू देणार नाही अशी बतावणी केली होती. यानंतर मालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रतिनिधी महिला योगिता जोशी हिला २० हजार रुपये घेतांना पोलिसांनी अटक केली. मात्र या चस्का हॉटेल मध्ये असे नेमके काय चालते की मालका कडे युट्युब चॅनल चालवणारी तथाकथित महिला पत्रकार १ लाख मागते याकडे ही सर्व कल्याणकराचे लक्ष गेले आहे. त्यामुळे महिलेच्या चौकशी बरोबरच या हॉटेलच्या कारभाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. योगीता जोशी हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला असल्याने शनिवारी दुपारी खडक पाडा पोलिसांनी तिला अटक केली आहे.

-रोशन उबाळे

मलंगगड भागात डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; दीड महिन्यांत पाचवा बळी

मलंगगड भागातील कुशिवली नदीच्या डोहात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. मागील दीड महिन्यातील बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. या अगोदर चार लोकांचा बळी गेला होता व त्यानंतर आता आणखी एकाला जलसमाधी मिळाली आहे.

डोंबिवली सागाव मधील हा तरुण या ठिकाणी विकेंड निमित्त पर्यटनासाठी आला होता. याचदरम्यान नदीपात्रात पाय घसरून त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने या तरुणाचा बुडून झाल्याचे सांगण्यात येते. विवेक मेहरा असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या एका मित्रासह या ठिकाणी आला होता. दोघेजण विकेंडचा आनंद घेण्यास आले होते मात्र त्यांचा हा आनंद दुःखात परिवर्तित झाला. डोहात बुडून या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. यानंतर हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे मलंगगड भागात या वर्षी मृत्यूंची शृंखला सुरू असल्याचे दिसत आहे. या अगोदर याच भागातील दोन स्थानिक नाबालिकांचा नेवाळी जवळील तलावात बुडून मृत्यू झाला होता. व त्यानंतर कल्याण पूर्वेतील दोन तरुणांचा बंधारा भागात बुडून मृत्यू झाला होता. या दोन घटनांत चार जणांनी प्राण गमावले होते. व त्यानंतर आज अशाचप्रकारची ही तिसरी घटना समोर आली आहे. यामुळे ही मालिका थांबवावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-संतोष दिवाडकर