क.डों.म.पा. देणार नागरिकांना रेल्वेपास; तिकीटघरा शेजारी महापालिकेचा कक्ष

कोविड-19 च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिका आयुक्त, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, एसआरपीएफ, सीआरपीएफ, रेल्वे अधिकारी यांच्या समवेत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास देण्याबाबत रेल्वे व्यतिरिक्त इतर विभागांनी करायच्या कामांबाबत नियोजन करण्यात आले.

कोविड लसीकरणाचे 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्‍यासाठी व रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटरजवळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 व दुपारी 3.00 ते रात्री 11.00 या दोन शिफ्टमध्ये महापालिका कर्मचा-यांचे प्रत्येक रेल्वे टिकीट काऊंटर शेजारी स्वतंत्र मदत कक्ष(हेल्प डेस्क) उभारले जाणार आहे.

कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत(प्राधान्याने आधारकार्ड) घेवून आलेल्या नागरिकांची सर्व प्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये सदर कागदपत्रांची पडताळणी होऊन मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी  केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र व ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.

महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या टिटवाळा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, आंबिवली व शहाड या रेल्वे स्थानकामधील रेल्वे टिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची व फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या आगमन आणि बहिर्गमन मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे टिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य राहील. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सदर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील, अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी कल्याण डोंबिवलीकरांनी लावल्या पहाटे पासून रांगा; ‘या’ एका कारणामुळे उडतेय नागरिकांची झुंबड

छायाचित्र :- संदेश दाभणे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दि.१० ऑगस्ट रोजी लसीकरणासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. यासाठी काही नागरिक पहाटे चार वाजल्या पासून रांगेत नंबर लावून बसले असल्याचे समजले आहे. आणि याला एकमेव कारण म्हणजे मुंबई लॉकल ट्रेनचा रेल्वेप्रवास.

कोरोनाच्या दुसऱ्या अनलॉकदरम्यान १५ ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लॉकल ट्रेनचा प्रवास करता येणार आहे. मात्र केवळ लसींचे दोन्ही डोस घेतलेले लोकच या प्रवासासाठी पात्र असतील अशी अट शासनाकडून घालून देण्यात आली आहे. रोजच्या धकाधकीच्या प्रवासाला वैतागलेले कल्याण डोंबिवलीकर आता रेल्वे प्रवासासाठी आसुसले आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घेण्याच्या प्रयत्नात आता कल्याण डोंबिवलीतील चाकरमानी आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात लसीकरणाचा वेग सतत मंदावताना दिसतो. काही खाजगी इस्पितळ तसेच राजकीय नेत्यांच्या शिबिरातुन काही लोक हे डोस घेतात. मात्र कोरोनाने कंबरडे मोडलेले असताना खिशाला न परवडणारे असल्याने काही लोक महानगरपालिकेच्या लसीकरणाची वाट पाहून आहेत. त्यात आज मंगळवारी कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिर व डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोनच ठिकाणी लसीकरण पार पडले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी पहाटे पासूनच रांग लावायला सुरुवात केल्याचे समजले आहे. यामुळे लसीकरणासाठी आता झुंबड उडताना दिसू लागली आहे. कोरोनाने पिचलेल्या लोकांसाठी शासन कितीही प्रयत्नशील असलं तरीही सेवा तोकडी पडताना दिसत आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याण पूर्वेत तरुणीवर अत्याचार; आरोपीला न्यायालयीन कोठडी

कल्याण डोंबिवलीत महिलांवर अत्याचारांच्या घटना कोरोना महामारीत देखील थांबलेल्या नाहीत. कल्याण पूर्वेतील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली मध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या २२ वर्षीय तरुणाने परिसरात राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून धमकावले आहे. तरुणीला आपल्या मोह जाळात अडकवून आपल्या सहकाऱ्याच्या घरात आणि इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात न्याय मिळण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीवर भा.द.वि. कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान पोलीस तपास अधिकारी एस एच बोचरे यांनी माहिती देताना सांगितले की आरोपीला अटक केली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

-रोशन उबाळे

श्रेयवादाची लढाई : मनसे आमदारा नंतर भाजप आमदारावर शिवसेनेची टीका

कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित विधानसभा क्षेत्रात एमएमआरडीए कडून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. मात्र या निधीच्या श्रेयवादावरून शिवसेना, मनसे आणि आता भाजपा अश्या तिन्ही पक्षांत चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. यातून खासदार विरुद्ध आमदार असे एकप्रकारे संघर्ष चित्र पहायला मिळत आहे.

एमएमआरडीए कडून मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या निधीमधील १२३ कोटी हे कल्याण पूर्वेतील रस्त्यांसाठी तर २७ कोटी हे मानपाडा भागा साठी मंजूर झाले आहेत. याचवरून मागील दोन दिवस कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली होती. राजू पाटील यांनी मानपाडा रस्त्याच्या निधीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन श्रेय लाटू नका असे म्हटले होते. हा विषय संपतो ना संपतो तोच आता कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेत जुंपल्याचे समोर आले आहे. माझ्याच जुन्या कामांना नवीन नावे देऊन निधी मंजूर केल्याचे दाखवले आहे असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केला होता. यावर बोलताना शिवसेना पदाधिकारी गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, आमदारांनी काहीही कामे केली नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अथक प्रयत्न करून, अधिकाऱ्यां समवेत भेटी करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील प्रस्तावित रस्त्याला निधी नेमका कुणाच्या प्रयत्नाने मिळाला आहे ? यापेक्षा हे रस्ते लवकरात लवकर बनावे अशी अपेक्षा करदाते नागरिक करीत आहेत. लांबणीवर पडलेली क.डों.म.पा. निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक खासदार आहे. तर भाजपचे दोन आणि शिवसेना मनसेचे प्रत्येकी एक एक आमदार या महानगरपालिका क्षेत्रात येतात. त्यामुळे सुरू झालेल्या राजकीय वातावरणावरून निवडणुकीचा आभास आतापासूनच निर्माण होऊ लागला की काय असे वाटू लागले आहे.

-संतोष दिवाडकर

आमदार गणपत गायकवाड यांची वचनपूर्ती; विधान सभा क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात.

कल्याण पुर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळात आपल्या मुलाच्या लग्नाचा अवास्तव खर्च टाळून त्या खर्चातून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली आहे. हि मोहीम तीन दिवसीय असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या लसीकरण मोहिमेला मिळत आहे.

कोरोना काळात सर्वत्र लसीकरण सुरु असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रावरील लसीकरणावर पुरेसा साठा होत नाही. तर दुसर्या बाजूस विविध खाजगी इस्पितळात आपल्या खिशातले सातशे ते आठशे रुपये खर्च करून लोकांचे लसीकरण होत आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळातील निर्बंधामुळे त्यांच्या मुलाचा अवास्तव खर्च टाळून स्व खर्चातील काही भाग म्हणून कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुण दिली. आणि याचप्रकारे आमदार गणपत गायकवाड यांनी वचनपूर्ती करुन सर्वसामन्य नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. सोमवारी या लसीकरणाचे उद्घाटन आमदार गणपत गायवाड यांनी केलं.

लसीकरण प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मंडळचे अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक मनोज राय, यांच्यासह इतर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हि मोहीम 3 दिवसीय असून ही लस दिव्यांग व्यक्ती, पत्रकार, रिक्षा चालक, तृतीय पंथीय, नाभिक व्यवसायिक, विधवा महिला यांना देण्यात येणार आहे.या मोहिमेत नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. यानंतर मोहिमेत टप्पा टप्याने १००० असे नागरिकांचे लसीकरण राबिवण्यात येणार आहे व या पुढे देखील अश्या प्रकारे लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी दिले.

-संतोष दिवाडकर