भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ; स्वातंत्र्य दिनाचे साधले औचित्य

स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ८७ आणि प्रभाग क्र. १०३ मधील पाण्याची समस्या सुटणार असून २८ लाखांच्या आमदार निधीतून हि कामे होणार आहेत. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,  कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक मनोज राय,  माजी सभापती सुभाष म्हस्के तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसगाव नाका येथील तिसाई हाउस या कार्यालयाठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर १३ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.८७ मधील गावदेवी रोड वरील पराग व्हिला बिल्डींग पासून ते शंकर कॉम्प्लेक्स पर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ शंकर कॉम्प्लेक्स, गावदेवी मंदिर रोड, कल्याण पूर्व येथे करण्यात आला. या परिसरात २ ते ३ दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबत परिवहन सदस्य तथा भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी या कामासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार याठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

 तर १५ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.१०३ ओम शिव गंगा कॉम्प्लेक्स, खडेगोळवली, कल्याण पूर्व परिसरात पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शंकर पावशे रोड, कल्याण पूर्व याठिकाणी करण्यात आला. येथील बहुतांश परिसर हा चाळींचा असल्याने या ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना जाणवत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी पाण्याची लाईन टाकण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत हे काम मार्गी लावले आहे.   

-कुणाल म्हात्रे

जोपर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंसमोर माजी आमदार नरेंद्र पवारांचा शासनाला इशारा

जो पर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू करत नाही तोपर्यंत राज्यात निवडणूका होऊ देणार नाही असा इशारा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शासनाला दिला. ओबीसी व इतर मागासवर्गीय समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्यात पवार बोलत होते.

भाजपाने कायद्याने मिळविलेले आरक्षण राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे रद्द झालं असून ओबीसी इतर मागासवर्गीय तसेच मराठा समाजावर राज्य सरकारने अन्याय केला असल्याची टीकाही भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.

 यावेळी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा  मुंडे, मेळाव्याचे आयोजक व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, राज्यातील माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर,  माजी मंत्री आ. अतुल सावे, आमदार रमेश अप्पा कराड,  भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ. तुषार राठोड, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रे, माजी आमदार विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार पाशा पटेल, बब्रुवान खंदाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भटके विमुक्त प्रदेश सहसंयोजक देविदास राठोड, डॉ गुलाबराव सांगळे, ऍड भाग्यश्री ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खडवली महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती; मनसे च्या मागणीला मिळाले यश

गेल्या वर्षभरापासून महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता हे पद रिक्त होते. त्यामुळे, व्ययस्थापणा अभावी नागरिकांना विजेच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही महिन्यांपासून, हे रिक्त पद भरण्यात यावे, यासाठी मनसे तर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. पाठपुराव्यासाठी खडवली पंचक्रोशीतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टिटवाळा महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या खडवली कार्यालयातील कनिष्ठ अभियंता पदावर अलंकार म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या मंगळवार पासून ते कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या अनुभवानुसार आणि व्यवस्थापन कौशल्याने लवकरच विजेच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

-कुणाल म्हात्रे

वीजबिल वसुलीला गती द्या; कल्याण परिमंडळ प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालकांचे निर्देश

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या जवळपास दीड वर्षांपासून वीजबिल वसुलीचा आलेख सातत्याने खालावत गेला आहे. परिणामी महावितरणला दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. ही बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू विजबिलासह थकबाकी वसुलीला गती देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.

कल्याण परिमंडलात बदलीवर रुजू झालेले मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण परिमंडलातून मुख्य कार्यालयात वीज खरेदी विभागात बदलून गेलेले मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता औंढेकर, कल्याण परिमंडलातून बदलून मुख्य कार्यालयात गेलेले मुख्य अभियंता अग्रवाल, नाशिक परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता फारुख शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनासह निसर्ग व तौक्ते चक्री वादळाच्या नैसर्गिक आपत्तीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जीवाची बाजी लावली. परंतु वेळेवर वीजबिल भरून ग्राहकांकडून या सेवेचे मोल झाले नाही. मोबाईल, डिश टीव्ही आदी सेवांचे पैसे वेळेवर भरले जात असताना उधारीवर दिलेल्या विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष झाले. ग्राहकांना अत्यावश्यक असलेल्या विजेचे बिल वेळेत भरण्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रभारी सहव्यावस्थापकीय संचालक रेशमे यांनी व्यक्त केली.

कल्याण परिमंडलातून बदली झालेल्या अधीक्षक अभियंता सुनील काकडे, ज्ञानेश कुळकर्णी, प्रवीण परदेशी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, विशाल भवर यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा स्टॅण्ड तातडीने सुरु करा; रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची मागणी

कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटीस कामाला सुरूवात झाली असून यामुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. हि वाहतूक कोंडी रेल्वेने बंद केलेले मुख्य तिकीट घरासमोरील व एस.टी. स्टॅण्ड समोरील होम फ्लॅटफॉर्म नं.१ येथील दोन रिक्षा स्टॅण्ड तात्पुरत्या स्वरूपात तातडीने सुरू करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह संघटनेच्या प्रतिक पेणकर, जितु पवार, संतोष नवले, बंडु वाडेकर, जगन्नाथ भागडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्टेशन परिसरातील बंद रिक्षा स्टॅण्डची पाहणी केली.  

 कल्याण स्टेशन परीसरात स्मार्टसिटी अंतर्गत सॅटीस उड्डाणपुलाच्या कामास सुरूवात झालेली आहे. या कामामुळे स्टेशन परीसरात प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुक नियोजन, उपाययोजना, निर्णय न घेतल्यास संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुककोंडीमुळे प्रवासी नागरीकांना अनेक समस्या व असुविधा तक्रारी निर्माण होतील. वाहतुक कोंडी विरहीत वाहतुक व्यवस्था याकरीता नियोजन व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

या संदर्भात १२ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन प्रबंधक कल्याण यांच्या दालनात रेल्वे डायरेक्टर, इतर अधिकारी रेल्वे पोलिस, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व वाहतुक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्तिक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सॅटीस काम दिलेल्या मुदतीत होण्यासाठी ववाहतुक व्यवस्था नियोजन याकरीता आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करणे, एकेरी वाहतुक व्यवस्था, नो एण्ट्री करणे, तसेच स्टेशन समोरील रिक्षांची गर्दी कमी करण्याकरीता रेल्वेने नियोजित मॉल प्रवाशी सोयीसुविधा प्रकल्प या करीता बंद केलेले दोन रिक्षा स्टॅण्ड सद्यस्थितीत रिकामी असलेली रेल्वे हद्दीतील जागा तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा स्टॅण्ड करीता तातडीने दयावी अशी मागणी करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे