‘… म्हणून मी कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेत सामील झालो होतो’; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितले कारण

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून २० ऑगस्ट पर्यंत विविध मतदारसंघातुन ही यात्रा जाणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मनसे आमदार राजू पाटील हे कपिल पाटील यांच्या समवेत दिसल्याने पुन्हा मनसे भाजप युतीच्या चर्चांना फोडणी मिळाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटी नंतर सुरू झालेल्या मनसे भाजप युतीच्या चर्चांना अजूनही पूर्णविराम मिळालेला दिसत नाही. प्रत्येक वेळी प्रसार माध्यमांना मिळणाऱ्या सारख्या उत्तराने यांचं नक्की चाललेलंय काय ? असा संभ्रम दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकार आणि महाराष्ट्राला पडलेला आहे. काल डोंबिवलीतील मनसे मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पणात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती असोत किंवा आजची कपिल पाटील यांच्या यात्रेतील मनसे आमदार राजू पाटलांची हजेरी या सर्व गोष्टी युतीचे संकेत देत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनसे आणि भाजप विविध स्थानिक राजकीय कार्यक्रमातुन जवळीक साधत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातून युतीची चाचपणी सुरू आहे का असा संभ्रम निर्माण झालेला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांना जन आशीर्वाद यात्रेनंतर माध्यमांनी पुन्हा युतीचा प्रश्न केला मात्र राजू पाटील यांनी नेहमीप्रमाणेच आपले स्पष्टीकरण देऊ केले. कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांची जन आशीर्वाद यात्रा शीळफाटा हुन कल्याणच्या दिशेने निघाली होती. त्यामुळे ते आमच्या मतदार संघातून घरासमोरून जात असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी मी फक्त आलो होतो असे राजू पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर यामागे कोणतेही राजकारण नसल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर कपिल पाटील यांनीही राजू पाटील यांच्या समवेतचा फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताना सावधानतेने मनसे आमदार असा उल्लेख न करता कल्याण ग्रामीण आमदार असा केला आहे.

-संतोष दिवाडकर

स्वातंत्र्यदिनी महापालिकेला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर? पालिका आवारात कचरा टाकून वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

स्वातंत्र्यदिनी कल्याण डोंबिवली महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर पडल्याची नाराजी दर्शवित पालिका आवारात कचरा टाकून वंचित बहुजन आघाडीने याचा निषेध व्यक्त केला आहे.

रविवारी भारताचा स्वांतत्र्य दिवस संपुर्ण देश साजरा केला जात आसताना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली मुख्यालयाच्या आवारात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. परंतु कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने स्मारकाची स्वच्छता न केल्याने पालिका प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी महानगरपालिकेच्या आवारात  कचरा टाकून जाहीर निषेध व्यक्त केला.

-कुणाल म्हात्रे

महावितरणने केला उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

महावितरणचे कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच कल्याण परिमंडल कार्यालय याठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयात प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कारण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजवंदन कार्यक्रमानंतर कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्षभर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकदाच हा पुरस्कार कामगार दिनाच्या दिवशी देण्यात येतो. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधामुळे गतवर्षीपासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होत आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे म्हणाले, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे जनमित्र हे ग्राहकांसाठी महावितरणचा चेहरा आहेत. जनमित्रांनी अखंडित वीजपुरवठा, वितरित झालेल्या प्रत्येक युनिट विजेची वसुली, सुरक्षा साधनांचा वापर, पारदर्शक व वेळेवर सेवा या पंचसूत्रीचा उपयोग करावा. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 मुख्य अभियंता धंनजय औंढेकर, दिनेश अग्रवाल, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे व दीपक पाटील यांच्यासह अधिकारी, अभियंते व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

पुरस्कार प्राप्त कर्मचारी – राजेंद्र चौधरी, मंगेश अहिरे, महेंद्र अडके, मिलिंद वाघमारे, मुरलीधर बहिराम, भीमराव तायडे, विश्वास मुकणे, भगीरथ चव्हाण, शनिदास हजारी, बाबासाहेब अहिरे, सविता काटे, गणेश अहेर, उखा बोरसे, नंदू पाटील, दीपक भोईर, सुरेंद्र भोईर, राजू राठोड, सुभाष गायकर, ज्ञानेश्वर गुडूप, मंगेश लोभी, मनोज राठोड, रघुनाथ खंडागळे, देवीप्रसाद सिंग, शिवाजी चव्हाण, जयवंत सांबरे, अनिल लगशेट्टी.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं शर्मिला ठाकरेंनी केलं लोकार्पण; भाजप आमदारांच्या उपस्थितीवर बोलले मनसे आमदार

१५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण शर्मिला ठाकरेंच्या हस्ते पार पडले. या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनीही भेट दिल्याने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. आणि याबाबत मनसे आमदारांना राजू पाटील यांना सवाल केला असता त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोनामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच काळात महाराष्ट्रातील आणखी काही महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुका पार पडणार आहेत. अश्या परिस्थितीत मनसे आणि भाजपा या दोन पक्षात युती होण्याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे, मनसे आमदार राजू पाटील यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र मनसेच्या मध्यवर्ती कार्यलयाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील भेट दिली होती. याबाबत हे युतीचे संकेत आहेत का ? असा सवाल माध्यमांनी मनसे आमदार राजू पाटील यांना केला होता. यावर बोलताना त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

मनसे भाजप युती वगैरे असे काही नाहीये. त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे. ते पण आम्हाला निमंत्रण देतात तसे आम्ही त्यांना निमंत्रित केले होते. युती बाबत पक्षप्रमुख राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यानुसार आमचे काम सुरू केले आहे.

राजू पाटील (आमदार,मनसे)

क.डों.म.पा. च्या नगरसेवकांचा कार्यकाळ हा २०२० मध्येच संपला आहे. त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका खूपच लांबणीवर पडल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई, पुण्यासह आणखी इतर मोठ्या महानगरपालिका निवडणुका होणार असून क.डों.म.पा. देखील तेव्हाच होण्याची शक्यता आहे. व त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीत विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. २००९ साली पदार्पणातच मनसेने स्वबळावर २६ जागा मिळवत विरोधीपक्ष नेतेपद भूषवले होते. यावेळी मनसेला ना भूतो ना भविष्यती असे मतदान झाले होते. पुढे मनसेची हवा कमी झाल्यानंतर सर्वच ठिकाणी मनसेची पराभव मालिका सुरू झाली.

क.डों.म.पा. क्षेत्रात मनसेने २०१५च्या महापालिका निवडणुकीत १० जागा जिंकल्या. शिवसेना भाजपा युती कायम असल्याने पुन्हा विरोधी पक्ष नेतेपद मनसेला मिळाले. त्यात आता मनसेचा आमदार देखील याच महापालिका क्षेत्रात असल्याने मनसेला आणखीन बळ प्राप्त झाले आहे. यात भरीस भर भाजपा युती झाली तर मात्र इंजिनाचा करिश्मा कल्याण डोंबिवलीत दिसू शकतो असे जाणकार मंडळी म्हणत आहेत.

-संतोष दिवाडकर

ऐतिहासिक समाधीस्थळांच्या जीर्णोद्धारासाठी मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्याकडून ५१ हजारांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे सुपूर्द

क.डों.म.पा.चे मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारासाठी आपला खारीचा वाटा पुढे केला आहे. यासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश ‘राजे प्रतिष्ठाण दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य’कडे सुपुर्द केला आहे.

१५ ऑगस्ट देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजे प्रतिष्ठाणने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राजे प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांनी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या समोर समाधी स्थळाचा आराखडा ठेवला आणि संपूर्ण कामाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. छत्रपती शिवरायांना आपले प्रेरणास्थान माननारे नगरसेवक अभिमन्यु गायकवाड यांनी देखील या जिर्णोद्धाराकरिता स्वतः खारीचा वाटा पुढे केला असून ५१ हजार रुपयांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाण कडे सुपूर्द केला आहे. तसेच राजे प्रतिष्ठाणच्या संपूर्ण संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन हे ऐतिहासिक कल्याण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांनी प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्ग संवर्धन तसेच समाधी स्थळांच्या जिर्णोद्धाराचा विडा उचलला आहे. या मोहिमेत आर्थिक पाठबळ असणे देखील तितकेच गरजेचे असून लोकनिधीतून ते निधी जमा करीत आहेत. यासाठी त्यांनी अभिमन्यू गायकवाड तसेच मदत केलेल्या इतरांचेही आभार मानले आहे. याबद्दल MH मराठीने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड तसेच राजे प्रतिष्ठाण प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी MH मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठाणने माझी भेट घेतली. त्यांनी माझ्या समोर महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचा आराखडा ठेवला. अध्यक्ष राहुल महाजन यांनी काही ऐतिहासिक घटना आणि कालांतराने आजची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मुळात आपण या महाराष्ट्रात राहतो असं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत राहतो. या नात्याने आपले काहीतरी कर्तव्य बनते की आपण अशा उपक्रमासाठी नक्कीच पुढाकार घ्यावा. यासाठी आर्थिक पाठबळ देखील महत्वाचे असते म्हणून मी माझा खारीचा वाटा म्हणून एक कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे दिला आहे. माझी अशी इच्छा आहे की लवकरच हे समाधी स्थळ उभं रहावं आणि यासाठी इतरांनीही आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कर्तव्य निधी म्हणून द्यावी.

अभिमन्यू गायकवाड (मा.नगरसेवक,क.डों.म.पा.)

कल्याणचे भूमिपुत्र मा.नगरसेवक अभिमन्यूशेठ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचे ऐतिहासिक समाधीस्थळ कसे असेल याचा आराखडा त्यांना दाखवला. त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व ५१ हजार रुपयांचा एक कर्तव्य निधी स्वराज्य कार्यासाठी अर्पण केला. याबद्दल राजे प्रतिष्ठाण कडून त्यांचे मनापासून धन्यवाद. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान होत. त्यांनी शत्रुसमोर आपली चांगलीच जरब बसवली होती. त्यामुळे आता आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हा समाधी स्थळ जीर्णोद्धाराचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या खोदकाम वगैरे झालेले आहे. पावसाळा संपल्या नंतर पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी ज्याला जसे जमेल तशी मदत तुम्ही करू शकता. मदत नव्हे तर हे स्वराज्यासाठी आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणू.

राहुल महाजन (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य)

संतोष दिवाडकर